



✒️नवनाथ आडे ( जिल्हा प्रतिनिधी बीड) 9075913114
बीड प्रतिनिधी( दि. 25 फेब्रुवारी):-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पालकमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध उर्वरित राष्ट्रवादी असे काहीसे चित्र आहे. त्या उर्वरित राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष बदल हा देखील अजेंड्यावरील विषय होता. आमदार प्रकाश सोळंके व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला यश आले आणि राजेश्वर चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.
राजेश्वर चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. विशेष म्हणजे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या व दुसऱ्या फळीतील मूळ राष्ट्रवादीतील असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी राजेश्वर चव्हाण हे एक आहेत. तसेच, पवारांना थेट बोलू शकणारे राजेश्वर चव्हाण हे हजरजबाबी, विनोदी आहेत. २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून त्यांची पवारांशी थेट ओळख आहे. त्यामुळे उर्वरित राष्ट्रवादी गोटाने राजेश्वर चव्हाण यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे काढले होते.
जिल्हास्तरावरील शासकीय समित्यांच्या प्रलंबित निवडी, जिल्हा नियोजन समितीमधील हक्काचा निधी, मतदारसंघात बाहेरच्या लोकांना कामे दिल्याने त्यांची वाढलेली लुडबूड, कोविड काळातील उधळपट्टी, अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी विश्वासात घेतले न जाणे आणि देवस्थान जमिन घोटाळ्यातील कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नाही, अशा अनेक तक्रारी उर्वरित राष्ट्रवादी गोटाच्या आहेत. सध्या या गोटाचे नेतृत्व आमदार प्रकाश सोळंके करत आहेत. त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आदी मंडळी आहे. या मंडळींनी आपल्या तक्रारींचे पाढे थेट बारामतीला जाऊन शरद पवारांजवळ मांडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्याजवळही त्यांना विषय मांडला. याच विषयात बजरंग सोनवणे यांची टर्म संपल्याने त्यांच्या ऐवजी राजेश्वर चव्हाण यांची निवड करण्याचा विषयही होता. साडेतीन महिन्यांपासून लवकरच निवड होईल, असे सांगितले जात होते. नव्या निवडीबाबत धनंजय मुंडे मात्र ‘नरो वा कुंजरो वा’ अशा भूमिकेत होते. कारण, बजरंग सोनवणे एकेकाळी त्यांचे कट्टर आणि राजेश्वर चव्हाण देखील मतदारसंघातील आहेत. जिल्हाध्यक्ष निवडीचा विषय मात्र मार्गी लागला असून, इतर विषयांवर पक्षातील वरिष्ठ निर्णय घेऊन कळविणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीत आज राजेश्वर चव्हाण यांना राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, सभापती अशोक डक उपस्थित होते. यानंतर चव्हाण यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अमरसिंह पंडित, अशोक डक सोबत होते.





