पंकज रामटेके (घुगूस प्रतिनिधी)
घुग्घुस (दि.24 फेब्रुवारी):- शनिवारी रात्री 10:45 च्या सुमारास जुन्या वादातून कादिर जमालुद्दीन शेख राहणार बँक ऑफ इंडिया जवळ घुग्घुस या २५ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली.
दिनांक २३ फेब्रुवारी रोजी रात्री धानोरा फाटा परिसराच्या रस्त्यावर कादिर शेख हत्याकांडातील शिवा गोनेवार रा.नकोडा, राजन्ना कंकटवार, अतुल वनकर, तेजा व एक अल्पवयीन रा.घुग्घुस या आरोपीस अटक करण्यात अली. यापुर्वी दिनांक २० फेब्रुवारी रोजी अविनाश वनकर व सद्दाम शेख यांना अटक करण्यात आली होती.
हत्येच्या घटनेने घुग्घुस शहरात एकच खळबळ उडाली. मृतक कादिर शेख शनिवारी रात्री बँक ऑफ इंडियाजवळील जुना बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात आरोपींनी जुन्या वैमनस्यातून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून हल्ला चढविला व हल्लेखोरांनी त्याचा गळा चिरून हत्या केली व हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मृताच्या समर्थकांनी घटनास्थळी गर्दी केली जमावाने बँक ऑफ इंडिया जवळील एका एसयूवी वाहनास आग लावली.
पो. नि. बी. आर. पुसाटे यांनी पोलीस पथकासह दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठविला.
अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासचक्र फिरवून आरोपींना अटक केली.
दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घुग्घुस येथे भेट दिली व पाहणी केली.


