Home महाराष्ट्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाच्या भेटीमागे आरएसएसची विखारी विचारधारा पेरण्याचा प्रयत्न!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाच्या भेटीमागे आरएसएसची विखारी विचारधारा पेरण्याचा प्रयत्न!

223

विश्‍वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे आरएसएसचे पिट्टू भिकू तथा दादा इदाते यांच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आणून स्मारकाला भेट देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक दादा इदाते, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलेले विचार हे आरएसएसचे होते. त्या विचारांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी काहीच साधर्म्य नव्हते. एकदंरीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगाव आंबडवे येथील भेटीच्या कार्यक्रमा आडून आरएसएसची विखारी विचारधारा पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.आपण सुरूवातीला प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलेले दादा इदाते यांच्या विचारांचा पोस्टमॉर्टम करू. इदाते यांनी आपण सावित्रीमाई शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. या शिक्षण प्रसारक मंडळाचे ब्रीदवाक्य काय आहे याची त्यांनी माहिती दिली. ज्ञान,विज्ञान, स्वावलंबन आणि चारित्र्य असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. ज्ञानाचे प्रतिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर,विज्ञानाचे प्रतिक सी.व्ही.रमण,स्वावलंबनाचे प्रतिक कर्मवीर भाऊराव पाटील आणि चारित्र्याचे प्रतिक डॉ.केशव हेडगेवार आहेत असे इदाते यांनी सांगितले.

ज्ञानाचे प्रतिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वावलंबनाचे प्रतिक कर्मवीर भाऊराव पाटील हे बरोबर आहे. मात्र विज्ञानाचे प्रतिक सी.व्ही.रमण आणि चारित्र्याचे प्रतिक डॉ.केशव हेडगेवार आहेत असे बोलणे म्हणजे काजव्याला सूर्य संबोधण्यासारखे आहे. खरं म्हणजे विज्ञानाचे प्रतिक तथागत गौतम बुद्ध आहेत. जगातील पहिले वैज्ञानिक बुद्ध आहेत. बुद्धांना ६६ वैज्ञानिकांनी आपला गुरू मानला. आईनस्टाईनपासून ते आजच्या अमर्त्य सेन यांच्यापर्यत. जगातील पहिल्या क्रमांकाचे कुशल संघटक बुद्ध होते. त्यांनी पहिली केडर बेस ऑर्गनायझेशन भिक्खू संघ बनवला. बुद्धांच्या भिक्खू संघाची कॉपी आरएसएसने केली. आरएसएसमधील शेवटचा एस हा संघ आहे. म्हणजे आरएसएस चोर संघटना आहे. सारे काही बुद्धांकडून घेतले आहे. आणखी एक त्यांनी खुलासा केला तो म्हणजे चारित्र्याचे प्रतिक डॉ.केशव हेडगेवार आहेत. हे तर अजबच झाले. डॉ.हेडगेवार यांच्यासारख्या ब्राम्हणांकडे चारित्र्य कधीपासून आले? बहुजनांना गुलाम बनवणे हे चारित्र्य आहे का? बहुजनांना गुलाम बनवण्यासाठीच आरएसएसची स्थापना करण्यात आली आहे. ब्राम्हणांकडे न्यायिक चरित्र वा चारित्र्य नाही असे इंग्रजांनीच म्हटले आहे. मग डॉ.हेडगेवार यांच्याकडे चारित्र्य कुठून आले?

याचे उत्तर इदाते देऊ शकतील का? इदाते यांनी चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बोलताना सांगितले की, सुभेदार रामजी सकपाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक संस्कार केला होता. ते प्रत्येक दिवस रामायण, महाभारत, पांडव प्रताप यावर चर्चा करायचे. किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा आहे. परंतु इदाते यांनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला. जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रामायण, महाभारत, पांडव प्रताप यावर दरदिवस चर्चा करत असायचे तर त्यांनी रिडल्स इन हिंदूइझम या ग्रंथात राम आणि कृष्णावर कोडे विचारले असते का? याचे उत्तर इदाते यांनी दिले तर बरे होईल.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेच्या वर्गखोलीत बसू देत नव्हते, परंतु त्यांनी वर्ग खोलीच्या बाहेर राहून शिक्षण घेतले. डॉ.आंबेडकरांना शाळेच्या वर्गखोलीत कोण बसू देत नव्हते?. याचा खुलासा केला असता तर बरा झाला असता. याच ब्राम्हणांनी डॉ.आंबेडकरांना शिक्षण घेऊ दिले नव्हते हे मात्र इदाते यांनी सांगितले नाही. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हा कार्यक्रम ज्ञानाचे प्रतिक असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबधित असताना इदाते यांनी राष्ट्रपतींना भेट देताना गणपतीची मूूर्ती का दिली. आता बोला, ज्ञानाचा आणि गणपतीच्या मूर्तीचा काय संबंध? गणपतीच्या काल्पनिक मूर्तीतून ज्ञान येत नाही तर पुस्तकातून येते. मग प्रतिकात्मक पुस्तक भेट म्हणून द्यायला नको का?.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते. त्यांनी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कलियुगातील अवतार म्हणून घोषित केला. कोश्यारी म्हणतात की, ‘आगे जाकर कलियुग का अवतार न कहे लग जाये लोग’. ‘हिंदुस्थान में अवतार जल्दी बनाते है’ यह अच्छा भी होगा. अवतार, पाप-पुण्य, स्वर्ग, नरक या थोतांडी कल्पना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारल्या आहेत. कारण त्यांनी बुद्ध धम्म स्विकारलेला आहे. बुद्ध धम्मात असल्या ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या कल्पनांना स्थान नाही. परंतु कोश्यारी यांनी डॉ. आंबेडकरांना अवतार मानावे असे सूचित केले आहे. अवतार म्हणून देवत्व बहाल करणे याचा दुसरा अर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्याला व क्रांतीला ते कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कमी का लेखत आहेत तर डॉ.आंबेडकरांची क्रांती ही ब्राम्हणवादा विरोधातील होती. आणखी दुसरी बाब म्हणजे राज्यपाल असलेल्या कोश्यारी यांच्यासारख्या व्यक्तीला या देशाचे नाव भारत आहे हे माहित नाही का? माहित आहे. मात्र भारत असा उल्लेख न करता त्यांनी हिंदुस्थान असा जाणीवपूर्वक शब्दप्रयोग केला. संविधानातील पहिलेच आर्टीकल आहे, ‘इंडिया दॅट इज भारत’. डॉ.आंबेडकरांनी हिंदुस्थान असा उल्लेख केलेला नाही. भारताचा उल्लेख हिंदुस्थान म्हणून करणार्‍या कोश्यारींवर गुन्हा दाखल करायला हवा. कारण असा उल्लेख करणे म्हणजे संविधानाच्या विरोधात काम करणे होय. अर्थात संघिष्ट लोकांना संविधानाच्या विरोधात काम केल्याशिवाय हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राम्हण राष्ट्राचे स्वप्न साकार कसे करता येईल? म्हणून ते जाणीवपूर्वक हिंदुस्थान असा उल्लेख करतात.
या कार्यक्रमात शेवटी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भाषण झाले. त्यांच्या भाषणातही संघिष्ट विचारधारा दिसून येत होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव स्फूर्तीभूमी म्हणून ओळखले जाते. ते सर्वार्थाने सार्थक आहे. त्यापुढे राष्ट्रपती म्हणतात ‘स्फूर्तीभूमी के आदर्श अनुरूप समरसता और सौहार्दता आधारित ऐसी समाजव्यवस्था होनी चाहिए’. कुठल्याही लक्ष्याचा पाठलाग करताना ‘समानता और समरसता की ओर आगे बढना चाहिए’. या गावातील व क्षेत्रातील लोक ‘प्रगती आणि समरसता की ओर प्रस्तुत करेंगे’. अशाप्रकारे राष्ट्रपतींनी तीनवेळा समरसता असा शब्दप्रयोग केला. म्हणजे या संघिष्ट लोकांना संविधानात अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय नको आहे तर समरसता हवी आहे. समरसता हा शब्दप्रयोग आरएसएसचे लोक वापरतात. समरसता म्हणजे तुम्ही आमच्यात समरस व्हा. तुम्ही आमच्यात समरस व्हा म्हणजे आम्ही जे काही बहुजनांवर अन्याय-अत्याचार करत आहोत, त्यांचे हक्क व अधिकार नाकारत आहोत ते निमूटपणे सहन करा. एका बाजूला संविधाननिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट द्यायची आणि संविधाना विरोधात काम करायचे असा संघिष्टांचा खाक्या राहिला आहे. कोविंद यांनी संविधाना विरोधात काम करण्याचा सपाटाच लावला आहे. त्याची अनेक उदाहरणे आहेत. केवळ एकच उदाहरण देतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगारमंत्री असताना त्यांनी कामगार कायदे बनवले होते. कामगार हिताचे कायदे होते. मात्र तेच कामगार आता बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती या नात्याने कोविंद यांची स्वाक्षरी झाल्या शिवाय दुसरे कायदे कसे काय बनतील? त्यांची स्वाक्षरी झाल्यामुळे कामगार कायदे बदलले गेले आहेत. म्हणजेच हे संविधान विरोधी काम आहे.

आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे डॉ.आंबेडकरांच्या स्मारकाला भेट देताना तेथील स्थानिक स्मारक कमिटीच्या प्रतिनिधीला बोलण्याची संधी द्यायला हवी होती, मात्र ती दिली गेली नाही. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली नाही हे आपण समजू शकतो. मात्र स्थानिक स्मारक कमिटीने राष्ट्रपतींना बुद्धांची मूर्ती व संविधान भेट देण्याचा संकल्प केला होता, मात्र हा कार्यक्रमच इदाते यांच्या शैक्षणिक संकुलात झाल्याने ती भेट काही देता आली नाही. म्हणजेच हा कार्यक्रम पूर्णत: आरएसएस प्रायोजित होता. या कार्यक्रमात संघिष्ट लोकांची पोपटपंची ऐकली तर केवळ त्यांची विखारी विचारधारा व खोटा इतिहास लोकांच्या माथी मारण्यासाठीच या कार्यक्रमाचा खटाटोप केला असावा अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कार्यक्रमांना मूलनिवासी बहुजनांनी हुरळून जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.

✒️लेखक:-दिलीप बाईत(मंडणगड जिल्हा रत्नागिरी)मो:-९२७०९६२६९८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here