Home महाराष्ट्र शिवज्योत रॅलीच्या माध्यमातून राजेंना अभिवादन…

शिवज्योत रॅलीच्या माध्यमातून राजेंना अभिवादन…

89

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.21फेब्रुवारी):– येथील शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शिवज्योत रॅली व कोरोनाचे लसीकरण करून राजेंचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारत सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत त्यांचे पालन करून कोरोनाचे लसीकरण शिबीर घेण्यात आले. तत्पूर्वी भदाणे सिस्टर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले. या कोरोना लसीकरण शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांचे सहकार्य लाभले. “साने पटांगण” कोट बाजार येथे भगवे ध्वज, फुलांची आरास, रोषणाई, बॅनर, महाराजांची प्रतिमा – मूर्ती अशा प्रकारे शिवमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक शिवप्रेमींनी यावेळी शिवरायांना पुष्पांजली अर्पण करून वंदन केले.

जिजाऊंच्या लेकी व शिवप्रेमी यांनी शिवज्योत रॅलीच्या माध्यमातून राजेंना अभिवादन केले. शिवज्योत रॅलीची सुरवात शिवजयंतीचे खरे जनक तात्यासाहेब महात्मा फुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून करण्यात आली. धरणी चौकातून कोट बाजार परिसरात येत असतांना सर्व महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. रॅलीच्या सुरवातीला जिजाऊ – सावित्रीच्या लेकी व त्यांच्या मागे पुरुष बांधव उपस्थित होते. साने पटांगण या ठिकाणी रॅली आल्यानंतर शिवज्योत रॅली आल्यानंतर राजेंना अभिवादन करण्यासाठी सर्व थांबले. गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रथमेश प्रशांत फुलपगार या शिवरायांच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्याने पोवाड्यातून राजेंचे कर्तृत्व वर्णन केले. यावेळी सर्व शिवप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट व घोषणांच्या माध्यमातून प्रतिसाद दिला. शिवज्योत रॅली पुढे निघाल्यानंतर लाल बहादूर शास्रींच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. लांडगे गल्ली, परिहार चौक, गायत्री जनरल, चेतन मोबाईल कडून मुख्य रस्त्यावरून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून ग्रामीण रुग्णालय येथून शिवज्योत रॅली छत्रपतींच्या स्मारकाजवळ आली. या ठिकाणी युवती व महिलांनी ४ मोटारसायकल गोलाकार पध्दतीने फिरवून राजेंना मानवंदना दिली. तद्नंतर सर्व महिला भगिनींनी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण केले. याच ठिकाणी शिवज्योत रॅलीचा समारोप झाला, येथून सर्व शिवप्रेमी साने पटांगण या ठिकाणी परतले.

छत्रपतींचे पूजन करून तसेच शिवरायांचे कर्तृत्व मांडणाऱ्या गीतांच्या माध्यमातून राजेंचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड, नारी शक्ती ग्रुप, शिव कन्या पथक यांमधील युवती व महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच गावातील सर्व समाज बांधव व युवकांचा देखील प्रतिसाद उत्साहवर्धक होता. कार्यक्रमाला धरणगाव पोलीस स्टेशनचे पीआय शंकर शेळके साहेब व त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले. राजेंच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here