



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-907591311
बीड(दि.18फेब्रुवारी):-‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई आणि वडिलांना दैवतांसमान मानले. आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांचे फळ म्हणजे स्वराज्य. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन त्यांना स्वराज्य कामी लावले. हा छत्रपती शिवरायांचा बाणा होता. अपराध केलेल्या स्वजातीय आणि नात्यातील लोकांनाही त्यांनी कठोर शिक्षा दिल्या. महिलांचा आदर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांचा आदर केला. एवढेच काय आपल्या शत्रूलाही मृत्यूनंतर सन्मान दिला.
रयतेच्या कल्याणासाठी, मानवतेसाठी स्वतःच्या सैन्यातील सरदारांच्यासुध्दा चुका छत्रपती शिवाजी महाराजांनी खपवून घेतल्या नाही. त्यामुळे राजे अनेक आहेत पण जगदवंदनीय असे फक्त शिवाजी महाराज. आज वर्तमान कालीन युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करावे तीच खरी शिवजयंती आहे’ असे मत युवा व्याख्याते, अभ्यासक राहुल गिरी यांनी व्यक्त केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या ‘शिवजन्मोत्सव’ कार्यक्रमात ‘शिवचरित्र आणि वर्तमान परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर लक्ष केंद्रित करून महाराजांचे अलौकिक कार्य कशा स्वरूपाचे होते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले.
राहुल गिरी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा व्याख्याते असून अट्टल महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी समाजकार्य विषयात सेट आणि पीएचडी पूर्व परीक्षा पेट उत्तीर्ण केल्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्या सत्काराचा व्याख्यानाचा कार्यक्रम प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थी समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पुरी, प्रबंधक बाप्पा साहेब पिंपळे, कार्यालयीन अधिक्षक भागवत गवंडी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी समिती प्रमुख समाधान इंगळे यांनी केले. प्रा. शरद सदाफुले यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. सिद्धेश्वर सटाले यांनी आभार मानले.रांगोळीतून स्वराज्य प्रतिमा साकार केलेली विद्यार्थिनी कोमल काकडे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सदस्य डॉ. प्रदीप दहिंडे, प्रा. अरुण भराडे, प्रा. किरण मदुरे, प्रा. गणपत काकडे, डॉ. वृषाली गव्हाणे, प्रा. सुहास मचे, सुदर्शन निकम, अशोक पावनपल्ले आदींनी परिश्रम घेतले.


