Home महाराष्ट्र मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?

मुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?

126

कामगार चळवळीत काम करीत असल्यामुळे आणि नियमितपणे विविध विषयावर लिहत असल्याकारणाने अनेकांना वाटते कि माझ्याशी चर्चा करून समस्या आणि अडचणी कशा सोडाव्यात याबाबत बोलावे,लिहावे.कारण कामगार कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मुलामुलीचे शिक्षण,नोकरी व लग्न ह्या समस्या आणि अडचणी असतात.उच्चपदस्थ सुरक्षित नोकरी करणारे आणि सुरक्षित सोसायटी प्लॉट बंगल्यात राहणाऱ्याकडे पैसा भरपूर असतो. त्यामुळे ते नेहमीच नातलगा,समाजापेक्षा स्वताला वेगळे समजतात.त्यामुळेच त्यांची मानसिकता विचारसरणी आणि आचरण वेगळेच असतात.मग हा प्रश्न निर्माण होतो.मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..?माझ्याकडे एक रेल्वेचे अधिकारी पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग धरत नाही, महिना २०-२५ हजार कमवण्याचा ही आत्मविश्वास राहिला नाही. का झाले असावे असे? मुलांच्या एकंदर सर्व बाबींचे मानशास्त्रीय विश्लेषण केले आणि हा लेख लिहावासा वाटला,जेणेकरून सर्वसामान्य पालकांच्या जीवनात प्रकाश पडेल.त्यासाठी आजच्या या धावपळीच्या व धकधकीच्या जीवनात तणाव अपरिहार्य आहे. अशा तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?. ह्या बद्दल मुंबईचे प्रसिद्ध Soft Skills Trainer & Psychologist श्री निलेश मंडलेचा व प्रज्ञा मंडलेचा यांनी केलेले मार्गदर्शन कायम मला प्रेरणादायी असते. त्यांचे प्रथम मनपूर्वक आभार मानतो.

कर्मचारी अधिकारी लोकांचे पोर उद्योगपती होत नाही.डॉक्टर,प्राध्यापक पोलीस अधिकारी उद्योगपती सहसा होत नाही.पण इंजिनियर बरेच यशस्वी उद्योजक कोट्याधीश होतात, शेकडो इंजिनिअर्सना आपल्याकडे नोकरीस ठेवतात,पण अशा यशस्वी उद्योजकांचे बालपण कोमेजून गेलेले असते, त्यांना कॉन्व्हेंट व इतर ऐषोराम लहानपणापासून किंवा कॉलेज जीवनात खूप मिळालेले असतात. ज्यांना संपूर्ण सुखसोयी मिळतात ते यशस्वी होत असतात. ज्यांना ते मिळत नाही ते आयुष्यात अनेकदा अपयशी होतात, पण ज्यांना फुटकळ सुध्दा सुविधा मिळत नाहीत व ज्यांचे बालपण खडतर असते असे लोक यशस्वी बनतात असे का, याचे मानशास्त्रीय विश्लेषण शास्त्रीय भाषेत खूपच क्लिष्ट आहे, तुम्हाला सहज समजावे म्हणून गरुड व पोल्ट्रीच्या कोंबडीचे उदाहरण घेतले आहे.गरुड हे स्वयंभू व शून्यातून आयुष्याची सुरवात करतो. हे स्वत:च्या हिंमतीवर जगणाऱ्या यशस्वी व उद्योजक व्यक्तीचे प्रतीक आहे, तर पोल्ट्रीची कोंबडी ही ज्यांना लहानपणापासून सर्व गोष्टी आयत्या मिळाल्या व शेवटी स्वत:कोणतीही शक्ती खर्च न करता मिळाल्या असतात. त्यात आत्मविश्वास नसतो तर गर्व असतो. तो वडिलांच्या पुणाई ने यशस्वी उद्योजक किंवा उद्योपती होतो.कामगार कर्मचारी अधिकार वर्गांच्या मुलामुलीचे असेच असते, असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.

आज श्रीमंत पालक मुलांच्या भवितव्यासाठी अमाप पैसा खर्च करतात. पूर्वी शिक्षण एक वर्षासाठी २/३ हजारात व्हायचे,आज तो खर्च ३०/३५ हजारात नव्हे तर लाखात गेला आहे. मुलांना कॉन्व्हेंट शाळा, सकाळी बिस्किट,मॅगी,केक,स्कूल बस,घरी परत आल्यावर हातात जेवण,पुस्तके व गाईड्स,क्लासेस,पॅरेंट मीटिंग,लॅपटॉप त्यावर शैक्षणिक माहिती,पालकही अभ्यास घेतात,मुलांना वार्षिक सहल,गृहपाठ, प्रोजेक्ट,अजून बरंच काही. मुलं बिचारी रोबोटप्रमाणे या सर्व घडणाऱ्या गोष्टींतून पुढे चालत राहतात, जसे मुंबईत गर्दीतून माणस पळत राहतात. त्यानंतर हायस्कूलला असतानाच २०-२५ हजाराचा मोबाईल मिळतो. कॉलेजला गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक मिळते. विदेशात एमबीए करण्यासाठी पालक १०-१५ लाख भरतात व मुलगा फॉरेन रिटर्न होतो. तोपर्यंत सर्व काही आनंदात चाललेले असते. आपला मुलगा म्हणजे खूप हुशार,हिरो, मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे बनणार इत्यादी चर्चा, प्रशंसा सर्व नातेवाईक करत असतात. परंतु लवकरच दुर्दैवाने तो भ्रमाचा भोपळा फुटतो. मुलगा जेव्हा खऱ्या कॉर्पोरेट मार्केटमध्ये येतो, तेव्हा त्याचे स्थान शून्य असल्याचे कळते. १० ते १५ हजाराची नोकरीही मिळत नाही.

उद्योजक व व्यवसाय करावा, तर वास्तवाचे कोणतेही ज्ञान नसते. यासाठी मोठ्या कंपनीच्या कॉलनीत डोकावून पहा अनेक कर्मचारी अधिकारी वर्गाच्या मुलांवर कोणते संस्कार झालेले असतात. आणि विशेष किती अपघातात गेले किंवा अपंग झालेत. म्हणूनच मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..? हे पालकांनी ठरविले पाहिजे.कर्मचारी अधिकारी वर्गांच्या मुलांचे कष्टकरी कामगार,शेतकरी पालकांचे मुले नेहमीच लढाऊ कार्यकर्ते नेते बनतात आणि समाजाचे नेतृत्व करतात.पोल्ट्रीच्या कोंबडीप्रमाणे ऐतखाऊ व लाडात वाढलेल्या अशा मुलाची मार्केटमधले गरुड एक मिनिटात शिकार करू शकतात व असा मुलगा व्यवसायात अपयशी होतो. काय चुकले असेल या पालकांचे? एवढा पैसा खर्च केला शिक्षणावर, मग मुलं अपयशी का? पालकांचे काय चुकत गेले, तर शाळेत असतानाच त्याला २०-२५ हजाराचा मोबाईल दिला. त्याला मोबाईल कोणतेही श्रम व तसदी न घेता मिळाला, पण ते २०-२५ हजार कमवायला बाहेर किती मेहनत करावी लागते ह्याचे ज्ञान तुम्ही त्याला दिले का? कॉलेजमध्ये गेल्यावर १ ते १.५ लाखाची बाईक घेवून दिली, पण ते पैसे कमवण्यासाठी किती महिने,वर्षे कष्ट उपसावे लागतात हे मुलांना कधी सांगितले का?. जसे पोल्ट्रीच्या कोंबडीला पिंजऱ्यात बसवले जाते, रोज समोर खाद्य टाकले जाते. पण त्या कोंबडीला हे माहित नसते,की हे खाद्य शोधण्यासाठी शेतात किती फिरावे लागते, ते धान्य व खाद्य गोळा करण्यासाठी व मिळवण्यासाठी पंखात बळ असावे लागते, चालण्यासाठी पायात ताकद असावी लागते. ते पंखातील बळ व पायात ताकद ह्या कोंबडीत कधी येतच नाही. तसेच कष्टकरी कामगार,शेतकरी,शेतमजुरांच्या मुलामुलीचे असते.त्यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागतो.मग त्यात मोर्चा,आंदोलन आणि पोलीस स्टेशन हे आलेच…..

याउलट कर्मचारी अधिकारी वर्गांच्या मुलांचे असते.मला अनेक यशस्वी उद्योजक भेटतात, ज्यांची सुरवात शून्यातून झाली व आज करोडोचे मालक आहेत. लहानपणी शाळेची पुस्तके जुनी,फाटलेली,मित्रांची किंवा भावाची वापरली.शाळा घरापासून २-३ किलोमीटर होती, शाळेत जायला साधी सायकलही नव्हती. पाटी, दप्तर पाठीला अडकवायचे व मित्रांसोबत चालत जायचे. जेवणाच्या डब्यात आईने दिलेली भाजी व भाकरी खायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी तेल लावलेली चपाती मिळायची. केक,मॅगी काय असते आणि ते जेवणाच्या डब्यात देतात हे माहितही नव्हते. शाळा सुटल्यावर स्वतःच अभ्यास करायचा, गृहपाठाबद्दल मित्रांना विचारायचे, नाही जमलं तर मास्तरांचा मार खायचा नाहीतर बाकड्यावर उभे राहण्याची शिक्षा आणि सुट्टीच्या दिवशी आईला घरकामात व शेतात मदत करायची. कधी कधी पारलेचा बिस्कीटचा पुडा मिळायचा यांच्यासाठी तोच केक.एक रुपयाचा रंगीत कागद आणायचा, झाडाचा डिंक काढायचा, बांबूच्या काड्या,दोन रुपयाची दोऱ्याची गुंडी व अशा तऱ्हेने हाताने बनवलेला पतंगाचा खेळ सुरू व्हायचा. (आज मुलांना २० हजाराचा मोबाईल पालक देतात, ते ५ रुपयात मिळणारी पतंगाची क्रिएटीव्हिटी कशी शिकवणार व तो मुलगा कल्पक उद्योजक कसा होणार?) कसे बसे बारावीपर्यंत शिक्षण करायचे. शिकण्याची इच्छा असते, इंजिनिअर व्हावे, पुण्या,मुंबईला जावे, परदेशात जावे, पण वडिलांनी साफ सांगितले, आपली तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. आता कमवायला लागा आणि शिकायचेच असेल तर कमवत शिका. १२ वी नंतर छोटी मोठी कामे व खाजगी क्लासेस, थोडी फार शेती करायची व आपण कमावलेल्या पैशातून पुढचे शिक्षण पूर्ण करायचे. नोकरी कामधंदा व व्यवसाय स्वतःच शोधायचा.

अशी मुलं पुढे होतात गरुड… कारण त्यांना लहानपणापासून खेळणी विकत घेण्यासाठी पटकन ५०० रुपये मिळत नाहीत. ती मुलं स्वत: विटीदांडू व पतंग बनवतात. त्यांच्यात क्रिएटीव्हिटी वाढीस लागते. ज्यांना पालकांकीडून फटक्यात पैसे मिळतात, तो डोके चालवायची तसदीच का घेईल? शाळेत असताना ज्यांना घरची शेती, घरकाम, दुकानातील काम करावे लागते, त्यांना काम केल्याशिवाय पैसा मिळत नाही हे कळते. गरुडाप्रमाणे त्यांच्या पंखात बळ येते. व्यावहारीक वास्तव त्यांना खूप कमी वयात कळते. १२ वी नंतरच स्वत:च्या हिंमतीवर जगल्यामुळे गरुडाप्रमाणे स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी स्वतः शिकार करायला शिकतात. अशी मुलं प्रचंड आत्मविश्वास असणारी असतात, त्यांच्यात प्रचंड व्यावहारिक ज्ञान असते. ते स्वत:चा निर्णय स्वतः घेतात. गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्याची त्यांची जिद्द असते. ह्या मुलांना सांगावे लागत नाही, ती प्रगतीच्या दिशेने सुसाट वेगाने सुटतात. जेव्हा ढगांचा गडगडाट होतो, तेव्हा कोंबड्या खुराड्यात लपून बसतात, पण गरुड मात्र ढगाच्या वरती जाऊन हवेत उडत असतो. जेव्हा अशा गरुड मुलांची स्पर्धेच्या जगात कोंबड्याप्रमाणे वाढवलेल्या मुलांशी भेट होते, तेव्हा गरुड मुलं ह्या कोंबड्याची शिकार करतात व यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतात. पालकांनो स्वत:ला विचारा तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनायचे आहे गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत होते शिक्षण हे वाघिणीचे दुध असले पाहिजे.ते घेतले तरच गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत त्यासाठी त्यांनी स्वत मेहनत करून वाचन अभ्यास करावा.हातात गंडा दोरा बांधून किंवा पायी पदयात्रा करून ते सात जन्मात यशस्वी होऊ शकत नाही.त्यात एकाच विशिष्ट जातीचे शंभर टक्के आरक्षण आहे.ते तुम्ही हिराऊ शकत नाही.आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे,राजर्षी शाहूमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेतलेले लेखक नेहमीच असे विचार मांडण्याचे काम करतोय,ज्यांना पटते त्यांनी घ्यावे,नाही पटत सोडून द्या.ज्यांना योग्य वाटते ते वृतपत्र प्रसिद्धी देतात ज्यांना पचत नाही त्यांना आमची कोणतीही हरकत नाही.पण आम्ही लिहत राहणार आणि पाठवीत राहणार.कामगार,कर्मचारी अधिकारी,शेतकरी,शेतमजूर यांनी मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी..? हे ठरविलेच पाहिजे.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here