



[बप्पी लाहिरीजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण विशेष]
बप्पी लहिरी, बप्पीदा उर्फ अलोकेश लहिरी हे हिंदी सिनेजगतातील प्रसिद्ध संगीतकार होत. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. इ.स.१९८०च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड होती. त्यांना ‘डिस्को किंग इन इंडिया’ म्हणून ओळखले जाते. त्यांना शराबी चित्रपटासाठी सन १९८५मध्ये फिल्मफेअरच्या सर्वोतम संगीतकार पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्याविषयी अल्पशा माहितीच्या रुपाने श्री.एन. के.कुमार जी. यांची शब्दसुमने बाप्पीदांना अर्पूण विनम्र आदरांजली… बप्पी लाहिरीजींचा जन्म दि.२७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमधील जलपाइगुडी येथे झाला. येथील शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात ते जन्मले. ते १९ वर्षांच्या तरुण वयात संगीत दिग्दर्शक बनले. त्यांचे वडील अपरेश लाहिरी एक प्रसिद्ध बंगाली गायक होते आणि त्याची आई- बसारी लाहिरी संगीतकार आणि गायिका होत्या. शास्त्रीय संगीत आणि श्यामा संगीतात त्या पारंगत होत्या. वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. ८०च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळे त्यांना ‘डिस्को किंग इन इंडिया’ असे म्हटले जात होते. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केले.
मायकल जॅक्सन भारतात आले तेव्हा बप्पी लाहिरीजींची त्यांच्याशी भेट झाली होती. त्या भेटीचा किस्साही त्यांनी अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितला, की मायकल जॅक्सन बाळासाहेब ठाकरेंच्या घरी आले त्यावेळी ते तेथेच होते. बाळासाहेबांनी स्वतः येऊन आपली त्यांच्याशी ओळख करून दिली, “हे बप्पी लाहिरी आहेत आणि ते संगीतकार आहेत.” त्यावेळी मायकल जॅक्सने म्हटले, की हो आपण त्यांचे गाणे ऐकले आहे. डिस्को डान्सरच्या ‘जिमी जिमी’ गाण्याबाबत मायकल जॅक्सन बोलत होते, असेही बप्पीदांनी सांगितले होते.सन १९९०मध्ये बप्पी लाहिरीजींनी ‘डोक्याला ताप नाही’ नावाच्या मराठी सिनेमाला संगीत दिले होते. तर सन २०१८ साली ते एका मराठी सिनेमासाठी गायलेही होते. बॉलिवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बप्पीदांनी सांगितले होते, की ते बॉलिवुडच्या करियरमध्ये खुपच बिझी झाले. त्यांना मराठी सिनेमात योगदान देण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु आता संजय जाधव यांच्या ‘लकी अँड आय’ या सिनेमाद्वारे ते मराठीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण करणार होते आणि त्यासाठी ते खुप उत्साही होते. मराठी चित्रपटसृष्टी आणि तेथील कलावंत यांच्याशी त्यांचे विशेष प्रगाढ नाते होते.
त्यांनी ७०च्या दशकात करिअर सुरू केले. मात्र त्यांना सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या भूमिका असलेल्या महाराष्ट्रातील राजा ठाकूर यांच्या ‘जख्मी’ चित्रपटाने नावलौकिक मिळवून दिले होते. तेव्हापासूनच त्यांना मराठी चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा होती. परंतु तोवर त्यांना मराठी सिनेमासाठी संगीत द्यायला सन १९९० उजाडले होते. ‘डोक्याला ताप नाही’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले असल्याचेही बप्पीदांनी म्हटले होते. गाणे नेमके तेच सांगते-
“तुने मारी एन्ट्रीयाँ!
दिल में बजी घंटीयाँ!!”
सन १९७० आणि ८०च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरीजींनी संगीत दिले होते. चलते-चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांतीली त्यांची गाणी खुपच गाजली. शराबी चित्रपटासाठी बप्पीदांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसेच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सन २०२० साली आलेल्या बागी ३ सिनेमातील ‘भंकस’ हे त्यांचे शेवटचे गाणे ठरले. डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचे वैशिष्ट्य होते. डिस्को डान्सर सिनेमाचे आय अॅम अ डिस्को डान्सर, थानेदार सिनेमाचे तम्मा-तम्मा, द डर्टी पिक्चरचे ऊह लाला ऊह लाला, साहेबमधील यार बिना चैन कहाँ रे ही गाणी गाजली.
बप्पी लाहिरीजींनी मे २०१४मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लाट असल्याचे ते त्यावेळी म्हणाले होते. २००४मध्ये त्यांनी काँग्रेसचाही प्रचार केला होता. भाजपमध्ये प्रवेश करताना ते म्हटले होते, की दहा वर्षांपूर्वी काँग्रेसची लाट होती. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह होते. बप्पी लहरी पश्चिम बंगालमध्ये पक्ष मजबूत करतील असं राजनाथ सिंह यांनी म्हटले होते. सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बप्पी लाहिरी यांनी हुगळी जिल्ह्याच्या श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला होता. तरीही गीताप्रमाणे-
“मितवा भूल न जाना।
मुझको भूल न जाना।।
मैने ये वादा किया,
धरती जब तक रहेगी,
अंबर जब तक रहेगा।
तब तक तुझसे प्यार करूँगा।।”
बप्पीदांना सोने का बरे आवडायचे? बप्पीदांच्या गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, हातात अंगठ्या असे मोठ्या प्रमाणावर सोने त्यांनी नेहमी परिधान केलेले असे. सोने आपल्यासाठी लकी आहे असे त्यांना वाटत असल्याचे यामागचे कारण सांगत. बीबीसीबरोबर बोलताना बप्पीदांनी सोने परिधान करण्यामागचे कारण सांगितले होते, की सुरुवातीला त्यांच्या गळ्यात दोन चेन होत्या. त्यानंतर सोने त्यांच्यासाठी लकी आहे, असे त्यांना जाणवू लागले होते. हिरे मात्र त्यांना लकी नाहीत. हे त्यांना कळले होते. तसेच बप्पीदांच्या हातात एक कडेही असे. तेही लकी असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ‘जख्मी’ हा पहिला चित्रपट हिट झाला, तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी सुवर्ण मंदिर इथून घेऊन त्यांना ते कडे घातले होते, असे त्यांनी एका शोमध्ये सांगितले होते.बप्पी लाहिरीजींची शेकडो गाणी हिट झालेली आहेत. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांची सिलव्हर ज्युबिली झाली आहे. एवढ्या गाण्यांत बप्पीदांचे सर्वात आवडते गाणे म्हणजे-
“चलते चलते मेरे ये गीत याद रखना,
कभी अलविदा ना कहना!”
हे होय. एका मुलाखतीमध्ये बप्पीदांनी त्यांच्या सर्व गाण्यांपैकी हे सर्वात आवडते गाणे असल्याचे म्हटले होते. जगभरात कुठेही म्युझिक कॉन्सर्ट किंवा कार्यक्रम झाला, तरी त्याचा शेवट याच गाण्याने करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. किशोर कुमार यांना ते किशोर मामा म्हणायचे. त्याचे कारण म्हणजे किशोर कुमार नात्याने त्यांचे मामा लागत होते. ‘चलते-चलते हे गाणे गाताना किशोर मामांना अश्रू अनावर झाले होते, अशी आठवण बप्पीदा यांनी सांगितली होती. त्यामुळे आपल्या जीवनात हे गाणे अत्यंत महत्त्वाचे असे त्यांना वाटत असे.
गेला महिनाभर बप्पीदा आजारी असल्याने रुग्णालयात होते. मुंबईतील क्रिटीकेअर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आदल्या दिवशीच प्रकृतीत सुधारणा झाली म्हणून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. गेल्यावर्षी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाने प्रसिद्ध संगीतकार-गायक बप्पी लाहिरीजींचे मुंबई येथे दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले, तेव्हा ते ६९ वर्षांचे होते.त्यांच्या जाण्याने देशातील अखिल चाहती जनता व संगीतप्रेमी शोकसागरात बुडाले आहेत. सिनेसृष्टीवर दुःखाचे आणखी एक डोंगर कोसळले आहे. त्यांच्या गीताच्या ओळीनेच शोक-
“याद आ रहा हैं तेरा प्यार।
कहाँ हम कहाँ तुम,
तुम हो गये कहाँ गुम।।”
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांना हीच शब्दसुमनांची आदरांजली सविनय अर्पण !!
✒️लेखक:-श्री.एन. के.कुमार जी. (नि.प्रा. शिक्षक)[भारतीय थोर पुरुषांचे चरित्र अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली, मो.७७७५०४१०८६.


