



२०१४ मध्ये बहोत हुई महेंगाई की मार, बहोत हुआ किसानों पे अत्याचार, बहोत हुआ भ्रष्टाचार अब की बार मोदी सरकार असे नारे देत आणि देशाचा विकास करू असे म्हणत सत्तेत आलेल्या ह्या सरकारने देशाला आज विद्वेषाच्या दरीत ढकलून दिले आहे. वरील नार्यांमधील गोष्टी पुर्ण करणे तर दूरच उलट गेल्या ८ वर्षांपासून विकासाचा शोध घेत असलेल्या भारतीय नागरिकांना पावलोपावली फक्त आणि फक्त विद्वेषच सापडतोय. धार्मिक विद्वेष ईतका वाढलाय की येणार्या काळात आपलं जगणं कठीण होणार आहे. पण याचा शेवट काय? यातून कधी पूर्णपणे सुटका होईल? यावर उपाय काय? याचा कुणीच विचार करत नाही.
२०१४ पर्यंत जणू या देशात फक्त आदिवासीच राहात होते, कवडीचा विकास झाला नाही आणि जो आजपर्यंत झाला नाही तो विकास आपण आता करून दाखवू असे मोबाईलच्या माध्यमातून म्हणत हे सरकार सत्तेत आलं. मात्र विकासाच्या सर्व मुद्द्यांना जाणीवपूर्वक फाटा देत सद्यस्थितीत अनावश्यक कार्यात, जातीय, धार्मिक, भाषिक वाद भडकून देण्यातच आपली संपूर्ण ऊर्जा हे सरकार खर्ची घालत आहे. नुकतेच कर्नाटक मधील एका शाळेत एक अत्यंत भीतीदायक दृश्य आपण बघितलं. काही किशोरवयीन मुलं एका मुस्लिम मुलीला बघून खुन्नस ने जय श्रीराम चे नारे देत आहेत आणि ती मुलगी सुद्धा अल्ला हू अकबर चे नारे देत त्या टोळीचा विरोध करते आहे. एका शाळेत जिथे आपण तिरंगा ध्वज लावतो त्या ध्वजस्तंभावर चढून एक मुलगा भगवा झेंडा लावतोय आणि इतर मुले खाली उन्माद करतांना दिसत आहेत. हे चित्र बघून मन हादरून गेलं. हिंदू मुलं आणि मुस्लिम मुलगी दोन्हीकडे धार्मिक कट्टरवाद दिसतोय. मुलीच्या मागे भगवे दुपट्टे घेऊन नारे देणाऱ्या ह्या मुलांना आपणच आपल्या वागणुकीतून आपल्या धर्माची मान शरमेने खाली घालतोय याचंही भान नाही. हे बदलत्या भारताचे चित्र आहे. प्रौढांपासून-लहान मुलांपर्यंत फक्त द्वेष भरला जातोय समाजात. ह्या घटना मोबाईलवर-टीव्हीत बघून दोन्हीकडील मुले-मुली आणखी कट्टर होत जातात.
आधी राज्या-राज्यांमध्ये ह्या सरकारने भांडणे लावली. अजूनही पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब अशा ज्या राज्यांमध्ये भाजप चे सरकार नाही त्या राज्यांवर जणू काही पाकिस्तानचे अधिपत्य आहे अशा प्रकारचा प्रचार फक्त भाजपचे प्रचारकच नव्हे तर खुद्द पंतप्रधान करत आहेत. पंजाब दौऱ्यावेळी माझ्या जीवाला धोका होता आणि मी जिवंत परत आलो असे म्हणून पंजाबचा अपमान केला. नुकतेच लोकसभेत बोलतांना त्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राच्या सरकारमुळे, महाराष्ट्र काँग्रेसमुळे या देशात कोरोना पसरला असे म्हंटले आहे. त्यांना मला प्रश्न विचारावासा वाटतो की, कोरोना भारतात पैदा झाला का? नाही. मग महाराष्ट्र राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या चीन किंवा इतर देशांना लागून आहेत काय? जगात कोरोना वाढत असतांना खुले असणारे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतात काय? संपूर्ण जगावर कोरोनाचा विळखा बसत असतांना नमस्ते ट्रम्प कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने घेतला काय? हा नमस्ते ट्रम्प कार्यक्रम महाराष्ट्रात झाला काय?
हे सरकार येण्याअगोदर आणि आता सद्यस्थितीत प्रत्येक आघाडीवर अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या राजकारणाची एकच चौकट आहे ती म्हणजे धार्मिक द्वेष पसरविणे. प्रत्येक गोष्टीतून या देशातील जनतेत विद्वेष पसरविण्याचे काम हे सरकार करत आहे. हा विद्वेष अचानक आलेला नाही. सुरुवातीला २०१४ सालीच प्रचार करतांना त्यांनी ह्या विद्वेषाची बीजे पेरली होती. या भारतात मुस्लिमांच्या हज यात्रेला सबसिडी आहे पण हिंदूंच्या अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी यात्रेकरिता सबसिडी नाही असा प्रचार केला जात होता. भाबडे हिंदू नागरिक सुद्धा अशा प्रचाराला बळी पडले आणि आज तब्बल ८ वर्षे झालीत ना अमरनाथ यात्रेसाठी सबसिडी सुरु झाली ना वैष्णोदेवी साठी. आधी या सरकारने देशातील जनतेला हिंदू-मुस्लिम असे विभाजित केले. मुस्लिमांबद्दल हिंदूंच्या मनात प्रचंड द्वेष भरला. जणूकाही आम्ही सरकारात आल्यावर ह्या देशातील मुस्लिमांना हाकलून देऊ. इथे फक्त हिंदूच राहतील. हिंदूंना इथे कोणताही त्रास नसेल असा आभास निर्माण केला गेला. या आभासात जगत असतांना केव्हा २३ कोटी भारतीय दारिद्र रेषेखाली ढकलले गेले हे त्या नागरिकांना सुद्धा कळले नाही. कोरोनाकाळात लोकांचे उत्पन्न घटले मात्र एडीआरच्या रिपोर्टनुसार २०१९-२० मध्ये भाजपच्या इन्कममध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी, बहुतांश निधी हा निवडणूक फंड म्हणून जमा झाला आहे. त्याचबरोबर अंबानी-अडाणी यांचे उत्पन्न याच कोरोनाकाळात कमालीचे वाढले आहे ही क्रोनॉलॉजीच कुण्या सामान्य नागरिकांना समजून घ्यायची नाही.
राज्याराज्यानंतर हिंदू-मुस्लिम, त्यानंतर हिंदू विरुद्ध दलित, हिंदू विरुद्ध शीख, हिंदू विरुद्ध जाट असा द्वेष फैलाविण्याचे कार्य राजरोसपणे सुरु आहे.
मुस्लिमांचा आम्ही सत्यानाश करू असे सांगतांना हिंदूंचाच सत्यानाश होतोय हे उघड्या डोळ्यांनी दिसत असतांनासुद्धा या देशातील हिंदू ह्या कट्टरवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडतोय. या देशात ८०% हिंदू असल्यामुळे जर इंधनाचे भाव ११५ रुपये लिटर झाले तर त्याचा फटका हिंदूंनाच बसतो. सिलिंडर ९५० झाले तर त्याचा फटका हिंदूंनाच सर्वात जास्त बसतो, देशात बेरोजगारी वाढतेय त्यामुळे सर्वाधिक हिंदू नागरिकच बेरोजगार होताहेत. या देशातील जी २३ कोटी लोकसंख्या या गेल्या ३ वर्षात दारिद्र्य रेषेखाली ढकलल्या गेली ते सर्वाधिक हिंदूच आहेत. हिंदूंचा आर्थिक आणि सामाजिक स्तर २०१४ च्या आधी आजपेक्षा कितीतरी पटीने अधिक उंचावलेला होता. आज तो पूर्णपणे खाली घसरलाय हे हिंदू केव्हा समजून घेणार?
हिंदू-मुस्लिम दंगली घडविणारा प्रचार होत असतांना दोन्हीकडील सामान्य माणसाने विचार करायला पाहिजे की, मी जर हा द्वेष मनात वाढवला, मी अगदीच कट्टर झालो, या देशातला हिंदू-मुस्लिम दोन्हीकडील प्रत्येक नागरिक कट्टर झाला तर काय होईल? या कट्टरतेचा शेवट काय होईल? यावर उपाय काय आहे? हे कट्टरवादी लोक-संघटना १९४७ मध्ये ज्यावेळी फाळणी होत होती त्यावेळी सुद्धा हिंदू-मुस्लिम दंगली पेटविण्यात आणि फाळणीला पोषक वातावरण निर्माण करण्यात मग्न होते. तेच लोक आजही असा द्वेष पसरवून एक दिवस या देशाला पुन्हा फाळणी करण्यासाठी पोषक वातावरण तयार करत आहेत.
हिंदू असो की मुस्लिम प्रत्येक नागरिकाने आपल्या सुरक्षित भविष्यासाठी ह्या धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्या नेता आणि पक्षांपासून कायम दूर राहिले पाहिजे. तुम्ही शांतपणे बसून या वादाच्या शेवटाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, हा विद्वेष जितका पसरेल तितके दोन्हीकडील नागरिकांचे नुकसानच होणार आहे. हा देश धार्मिक झाल्याने देशातील समस्या सुटणार नाहीत, उलट अधिक जटिल होतील. आपण हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की दोन सारख्या धर्माच्या देशांमध्ये सुद्धा युद्धे होतात. आज हिंदू मुस्लिम करून देशाची फाळणी करून मुस्लिमांना वेगळे पाडतील, उद्या हिंदू-हिंदूत जाती-पातीवरून भांडणे लावतील. द्वेष पसरविणारे याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत.या भारतातील प्रत्येक नागरिकाने मग तो कुठल्याही धर्माचा असो हे समजून घेतलं पाहिजे की, या देशातून फक्त मुस्लिमच नाही तर इतर कुठल्याच धर्माच्या नागरिकांना आपण कधीच देशातून बाहेर घालवू शकत नाही.
या देशातल्या कुठल्याही एका धर्माच्या लोकांची आपण संपूर्णपणे कत्तल करू शकत नाही. या देशातल्या कुठल्याही धर्माच्या लोकांना आपण गुलाम बनवून ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना शेवटपर्यंत सोबत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. हिंदू आणि मुस्लिमांना इथे सोबतच राहायचे आहे ह्या सत्याचा स्वीकार करून आपण दोन्हीकडचे लोक कसे सुखाने जगू शकतील हा विचार केला पाहिजे. आपण कितीही एकमेकांचा द्वेष केला, विखरपूर्ण भाषणे केली तरी वरीलपैकी कोणतीही गोष्ट शक्य नाही. बाकी नेतेमंडळींची भाषणे म्हणजे ज्याप्रमाणे मुंगेरीलाल के हसिन सपने होते त्याप्रमाणे हसिन जुमले असतात जे कधीच पूर्ण होणार नाहीत. मग सोबत राहात असतांना भारतीय नागरिकांकडे मंगेश पाडगावकरांच्या कवितेप्रमाणे दोन पर्याय आहेत. सांगा कसं जगायचं? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की, गाणे म्हणत? हे या देशातल्या हिंदू आणि मुस्लिमांनी ठरवायचे आहे. आपल्याला सोबत राहायचेच आहे पण मग भांडण करत- परस्परांचा द्वेष करत जगायचं की गुण्यागोविन्दाने-मिळून मिसळून आनंदाने जगायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो;-९८२२९९२६६६


