Home गडचिरोली लहुजी वस्ताद: स्वातंत्र्यवीरांचे आद्य क्रांतिगुरु

लहुजी वस्ताद: स्वातंत्र्यवीरांचे आद्य क्रांतिगुरु

445

[क्रांतिगुरू लहुजी साळवे पुण्यस्मरण सप्ताह विशेष]

भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झाले. त्याच ठिकाणी क्रांतिवीर लहुजींनी दि.१७ नोव्हेंबर १८१७ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांनी ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तरीही देशासाठीच’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञाही केली होती. त्यांनी अनेक देशभक्तांना आपल्यातील युद्धकला शिकवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराणे सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांच्या आजोबांकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीरपुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.

वस्ताद लहुजी राघोजी साळवे हे खरेतर ‘लहुजी वस्ताद’ नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावातील एका कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते. युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकत नसे. वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी वाघाबरोबर युद्ध केले आणि जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते. असे त्यांनी आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.

पुढे दि.५ नोव्हेंबर १८१७ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. तब्बल १२ दिवसांपर्यंत राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला. लहुजींचे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रूवर तुटून पडले होते. ते तलवारीचे सपासप वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातून बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्रित वार करून राघोजींना धारातीर्थी पाडले. राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. त्यावेळी पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स.१८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेम यांनी झपाटलेले लहुजी आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या देखतच शहीद झालेले पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झाले. त्याच ठिकाणी क्रांतिवीर लहुजींनी दि.१७ नोव्हेंबर १८१७ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण करतानाच त्यांनी ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तरीही देशासाठीच’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञाही केली होती. त्यांनी आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजी नगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.

क्रांतिगुरू लहुजी हे दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी अशा सर्व युद्धकला कौशल्यांमध्ये निपुण होते. त्यांचे पिळदार शरीर व उभरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रांबरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असत. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव त्यांना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्याचे ठरविले. म्हणून त्यांनी इ.स.१८२२मध्ये पुण्यातील रास्ता पेठ येथे देशातील पहिले युद्ध कलाकौशल्य तालीमकेंद्र उघडले. ते नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतीराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा जोतीराव फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यातच शिकले.

इ.स.१८४८ साली लहुजींच्या याच तालमीत सावित्रीमाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती. म्हणून ते आद्य महाक्रांतिगुरू ठरतात, यात मुळीच शंका नाही.दि.२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना देवरनावडगा मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. दि.७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हे ऐकून लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच दि.१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेजींची प्राणज्योत मालवली. त्याबरोबरच एका महा क्रांतिपर्वाचा शेवट झाला. त्यांची समाधी पुण्यातील संगमवाडी येथे आहे.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे आद्य महाक्रांतिगुरु लहुजींना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व लेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

Previous articleवनाधारीत शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये होणार सामंजस्य करार
Next articleसांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की, गाणे म्हणत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here