Home Education शिक्षण नेहमीच धर्मनिरपेक्ष हवे!

शिक्षण नेहमीच धर्मनिरपेक्ष हवे!

374

व्यक्तीगत जीवनात धर्म असला तरी शिक्षणात मात्र कोणताही धर्म असत नाही. शिक्षण नेहमीच धर्मनिरेपक्ष आणि मनुष्याच्या उन्नत केंद्रीत असायला हवे. धर्माने मानवाचे मनुष्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे. मानवात असलेल्या पशुत्वासारखे हिंस्त्र विचार, दूराचार, षडरिपू यांना नष्ट करण्याचे काम धर्माने करायचे असते. धर्म तत्वज्ञान जीवनभर पालन करणे महत्वाचे आहे.

सध्या भारतात हिजाब वरून धार्मिक द्वेष मोठ्या प्रमाणात उफाळून येत असून हिजाब विरुद्ध भगवा असा वाद आता चव्हाट्यावर आल्याने देशात शांतता व सुव्यवस्थेचा गंभीर बनला आहे.
कर्नाटकमधून पेटलेल्या या संघर्षाच्या ठिणगीने संपूर्ण देश व विदेशात पेट घेतला आहे. या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर थेट महाराष्ट्रासह पाकिस्तान पर्यंत पोहोचले आहेत.

हिजाबवरुन कर्नाटकातल्या काही कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळं मुलींनी आंदोलन सुरु केलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही शाळांसमोर दगडफेकही झाली होती. यानंतर आता कर्नाटक सरकारनं शाळा, कॉलेजेस तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा व महाविद्यालयांत धर्म व जातीवरून राजकारण करूच नये.शाळा व महाविद्यालयाला शिक्षणाचे पवित्र मंदिर समजले जाते.शिक्षण घेणारे विद्यार्थी हे संवेदनशील असतात.धर्म, जात हे अतिशय संवेदनशील मुद्दे असून काही राजकीय पक्ष विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांना हाताशी धरून राजकारण करतात.

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून येथे सर्व धर्म सारखेच आदरयोग्य आणि समान अंतरावर आहेत असे मानले जाते. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असून शिक्षण, प्रशासन, उद्योग आदी क्षेत्रांत धर्माला काही भूमिका आहे, असे आपल्या देशात मानले जात नाही. राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर कोणत्याही नागरिकाबाबत संधी आणि न्याय आदींबाबत भेदाभेद करता येत नाही. धर्माची मर्यादा घर आणि प्रार्थनास्थळ एवढीच आहे. अर्थात, अनेकांना हे मान्य नसते त्यामुळे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यातून राज्यघटनेलाच आव्हान दिले जाते.

धर्म ही व्यक्तीची खासगी बाब असली तरी त्याने सार्वजनिक जीवन प्रभावीत झालेले दिसते याचे कारण धार्मिक कडवेपणा किंवा धार्मिक उन्माद. सार्वजनिक जीवनात धर्माला लुडबूड करू दिल्यामुळे तसेच धार्मिक वर्चस्ववादी भूमिका घेतल्यामुळे अनेकदा धार्मिक तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडतो.

धर्म ही सांगण्याची नाही तर जीवन व्यवहारात प्रतिबिंबीत करण्याची गोष्ट आहे.त्यामुळे आपण केवळ धर्म सांगायचा म्हणून पुस्तकातील विचार सांगत बसलो आणि जे सिध्दांत कालबाहय झाले आहेत त्यांच्यामागे लागत राहिलो तर आपल्याला त्यातून खरा धर्म विचार कळणार नाही.मुळात धर्म तत्वज्ञान, विचार हे कधीच ग्रंथाच बंधिस्त नसतात. धर्म तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिबिंबीत होण्याची गोष्ट आहे.मुले अनुकरणाने शिकतात या तत्वानुसार पालक आणि शिक्षक हे जर धर्माने वागले तर मुले आपोआप त्या वाटेने चालू लागतील. ती वाट म्हणजे देखावा नाही तर अनुकरणाची धर्म वाट असायला हवी.

त्याबददल गिजूभाई म्हणतात, की

धर्माबददल बोलून किंवा धार्मिक कृत्ये करुन

किंवा पारंपारिक वेष परिधान करुन

आपण मुलांना धर्म शिकू शकत नाही.

धर्म पुस्तकात नाही की मृत सिध्दांता मध्ये नाही

धर्म आहे जीवनामध्ये.

पालक आणि शिक्षक जर धर्माने जगले तर

मुलांना आपोआपच धर्माचे ज्ञान होईल

मुलं हाच आरसा..
मात्र आपल्याकडे धर्माचे पालन म्हणजे विचारापेक्षाही बाहयांगाने होणारे वर्तन, वेशभूषा, केशभूषा यांना अधिक महत्व आले आहे. जीवनात धर्म जर सुधारणा करू शकत नसेल तर तो धर्म काय कामाचा? धर्म हा प्रत्येक माणसांच्या जीवनात महत्वाचा आहे. धर्माने मानवी जीवन अधिक व्यापक करण्याची गरज आहे. धर्माने भेदाभेद संपुष्टात आणून अधिक उदारतेचा स्विकार करणे महत्वाचे आहे. वर्तमानात आपले अधिकाधिक सामाजिक संघर्ष हे धर्माशी निगडीत आहे. सार्वजनिक जीवनात “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. जगातील सर्व धर्माच्या मुळ तत्वज्ञानाचा पाया, सत्य, प्रेम, करूणा, माणूसकी, अहिंसाच आहे. मात्र आपण धर्माच्या पलिकडे असलेल्या जीवन व्यवहारात कसलाही धर्म विचार डोकावताना फारसा दिसत नाही. धर्म तत्वांचा विचार न केल्याने मोठयाप्रमाणावर समाजाचे व राष्ट्राचे नुकसान होते आहे.

मुलांच्या अंतकरणात धर्म रूजवायचा असेल तर धर्माचे मुळ तत्वे आणि विचार रूजविण्याची गरज आहे. अनेकदा तत्वे आणि विचारापेक्षा कर्मकांडात गुंतवून ठेवणे म्हणजे धर्म ही धारणाच आपल्याला अधोगतीने घेऊन जाणारी वाटते. अनेकदा आपण ज्या धर्माचे आहोत तो धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न पाहिला की आपल्याला धर्म तरी कळाला आहे का? असा प्रश्न पडतो. जगातील सर्व धर्म श्रेष्ठच आहेत. जेव्हा एखादा धर्म माणसांमाणसात भेद करण्यास सुरूवात करतो तेव्हा तो धर्म विचार नसतो. धर्ममार्तंडानी धर्मविचारात मोडतोड करून स्वतःच्या स्वार्थाकरीता त्यात काही घुसडलेले असते. जगातील कोणताही धर्म माणसांच्या विनाशाकरीता आस्तित्वात आलेला नाही. तो माणसांला उन्नत, प्रगत व अधिक प्रेमळ बनविण्यासाठी आलेला आहे.सध्या स्थितीत शाळा व महाविद्यालयात धर्माचं जे अवडंबर व प्रस्थ वाढविलं जात आहे,हे अत्यंत धोकादायक आहे.मुलं संवेदनशील असतात.लगेच कोणत्याही गोष्टीचा ते स्वीकार करतात.शिक्षण संस्था संस्काराचे केंद्र बनायला हवे..

आपण मुलांना गृहित का धरतो?
मुलांवरती धर्माचे संस्कार करायला हवे असे वाटत असेल, तर त्यांच्या समोर धर्माबददल बोलून फारसे काही साध्य होणार नाही. बोलून आणि केवळ पूजा अर्चा करून मुले धार्मिक बनण्याची शक्यता नाही. अनेकदा आपण मुलांवरती धार्मिक संस्कार व्हावेत म्हणून धार्मिक परंपरा जोपासत असतो. त्या पंरपरा जितक्या प्रामाणिक असतील तितका परीणाम अधिक साधला जात असतो. मात्र धार्मिक पंरपरांमागे जर तुमची अंधश्रध्दा किंवा भिती असेल तर ते धार्मिक परंपरा फारशा उपयोगाच्या नाहीत.

धर्म हा जीवन विकासाकरीता आहे तो भिती, दहशत किंवा सक्तींने लादण्याचा अथवा केवळ पंरपरा जोपसण्याची गोष्ट नाही. आपल्या जीवन व्यवहारात आपण जे काही करतो आहोत त्या प्रत्येक कृतीमध्ये विवेकाचा विचार असायला हवा.

पंरपरेने एखादी धर्मकृती चालत आली असेल तर वर्तमानातील वैज्ञानिक सिध्दांतानंतर आपण विवेकाच्या पातळीवरती विचार करीत पंरपरा टाकून देण्याची हिम्मत ठेवायला हवी. जे चांगले आहे त्याची स्विकृती धर्म करीत असतो. चांगला विचार आणि कृती हाच धर्माचा विचार असतो. धर्माच्या नावाखाली आपण बकरी कापणे, नवस करणे, अंधश्रध्देचा विचार पुढे नेणे. अंगात देव येणे या गोष्टी जर वाईट आहेत त्या टाळायला हव्या. त्याचा संबंध धर्माशी संबंध जोडू नये. आपण धार्मिक कृत्ये जर ढोंगानी भरलेली असतील तर आपल्या त्यातून हाती फार काही लागण्याची शक्यता नाही.

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(मो:-९५६१५९४३०६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here