




✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006
राज्य सरकारने ‘वाईन’ संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरूध्द बंडा तात्या कराडकरांनी साता-यात आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान बंडा तात्या कराडकर भलतेच बरळले आहेत. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर पातळी सोडून टिका केली आहे. त्यांनी ही टिका जाणिवपुर्वक केल्याचे जाणवते. रोज काहिही बरळणा-या अमृता फडणवीस यांच्याबाबत ते काही बोलत नाहित पण पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळेंनाच टार्गेट का करतात ? त्यांनी त्या बाबत नंतर माफीनामाही सादर केला आहे पण असंबंध बरळणा-या बंडा तात्यांना न पिताच वाईन कशी व का चढली ? याचे उत्तर शोधावे लागेल. न पिताच ‘फुल्ल टू’ झालेल्या बंडा तात्याच्या झुकांड्या का सुरू झाल्या ? याचा विचार करावा लागेल. बंडा तात्यांना व्यसनांचा इतकाच तिटकारा असेल तर कुंभमेळ्यात गांजा-अफूचा जो पुर येतो त्याबाबत ते ‘ब्र’ काढत नाहीत. संत तुकारामांनी त्या बाबत काय म्हंटलय ते बंडा तात्यांना माहित नाही असे होईल का ? कुंभ मेळ्यातील नशेबाजीबाबत संत तुकारामांची भूमिका बंडा तात्यांना मान्य नाही काय ? बंडातात्या त्या मंडळींना व्यसनमुक्तीचे धडे का देत नाहीत ?
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करत देशभरात दारूबंदीचा प्रस्ताव का ठेवत नाहीत ? दारूबंदी अवघ्या देशात व्हावी या साठी का प्रयत्न करत नाहीत ? मोदींनी मनात आणले तर दारूबंदी अशक्य नाही. आज त्यांच्याकडे बहूमत आहे. त्यांना दारूबंदी करता येईल. बंडा तात्या असे न करता इकडे का बरळत आहेत ? त्यांना वाईन का चढली आहे ? हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. सरकारने घेतलेला ‘वाईन’ चा निर्णय हा चुकीचाच आहे. तो शेतक-यांसाठी नव्हे तर मुठभर भांडवलदारांसाठीच घेतला आहे हे सत्य आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे स्वत:चे वायनरी प्रकल्प आहेत. त्याला विरोध व्हायलाच हवा पण विरोध करताना तो निखळ हवा. निव्वळ सामाजिक हिताच्या आणि कळकळीच्या भावनेने हवा. जर राजकारण करत असाल तर तो राजकीय अंगानेही हवा पण तुमचा राजकीय पक्षाशी, विचाराशी संबंध असेल तर. समाजात वावरताना, समाजकारणाचे, धर्मकारणाचे बुरखे घ्यायचे आणि राजकीय वळचणीला राहून आपल्यावर श्रध्दा ठेवणा-या भाबड्या लोकांची दिशाभूल करायची हे योग्य नाही. राजकारण करायचेच असेल तर ते उजळमाथ्याने करा. कुणाचे हस्तक म्हणून ज्ञानोबा-तुकोबाच्या परंपरेत घुसू नका इतकेच. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वागावे तसे जर बंडा तात्या वागत असतील तर ते योग्य नाही, पण ते संघाचेच असतील तर नि:पक्ष कसे वागतील ?
पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर घसरणारे बंडा तात्या राज्य महिला आयोगाच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. बंडातात्या त्यातून सुटतीलही किंवा त्यांना सोडवलेही जाईल. बंडा तात्या कराडकर हे किर्तनकार म्हणून प्रसिध्द आहेत. ते विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातूनही सक्रीय असतात. त्यांच्याशी सलग्न राहून ते वारकरी परिषदा घेतात. साधारण २००६ च्या दरम्यान पंढरपुर येथे विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या भव्य वारकरी परिषदेतही ते सहभागी होते. ते अध्यात्मिक नव्हे तर पक्षीय संत आहेत. ते किर्तन जरूर करतात पण ज्या गादीवर किर्तन करायला उभे राहतात ती गादी तुकारामांचा वारसा चालवणारी नव्हे तर गोळवळकरांचा आणि हेगडेवारांचा वारसा चालवणारी आहे. त्यांच्या किर्तनाची गादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. किर्तनाच्या नावाखाली ते संघाला वारकरी सांप्रदायात घुसडवण्याच्या प्रयत्नात असतात. बाकी त्यांचे व्यसनमुक्तीचे काम चांगले आहे. त्यांच्या त्या कामाबाबत आम्हाला आदर आहेच. बंडा तात्यांना ज्ञानोबा-तुकोबाचे व्यसन लागण्याऐवजी गोळवलकर आणि हेगडेवारांचे व्यसन लागले आहे. त्यांची या व्यसनापासून मुक्ती कधी होणार ? ते जातीयवादी विचाराच्या व्यसनात इतके गुरफटले आहेत, त्याच्या इतके आहारी गेले आहेत की त्यांना कोणत्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे ? हा प्रश्न सच्चा वारक-यांना नाही पडला तर नवल. कदाचित यामुळेच त्यांना न पिताच वाईन चढली असावी.
बंडा तात्यांचे वारक-यांचेही संघटन आहे. बंडा तात्यांनी शेकडो युवकांना व्यसनमुक्तीच्या नावाने गोळा केले आहे. कराड-सातारा भागात त्यांचे चांगले संघटण आहे. भाजपा संकटात आली की बंडा तात्या सक्रीय होतात. राज्यात किंवा केंद्रात कॉंग्रेस व इतर पक्षाचे सरकार आले की त्यांची सक्रीयता वाढते. ते लोकांच्या इतर मुलभूत प्रश्नावर कधी बोलताना दिसत नाहीत. त्यासाठी आंदोलन करताना दुसत नाहीत. मंदिर अधीग्रहण कायदा, जादूटोणा विरोधी कायदा व आता वाईन असे विषय ते ही कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाविरूध्द ते सक्रीय होतात. फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात किंवा मोदींच्या सात-आठ वर्षाच्या सत्ता काळात बंडा तात्यांनी एकाही विषयावर आवाज उठवला नाही किंवा आंदोलन केले नाही. दिल्लीत शेतक-यांच्या आंदोलनात सातशे शेतक-यांचे बळी गेले बंडा तात्या शांत, नोटबंदीत दिडशेपेक्षा जास्त बळी गेले बंडा तात्या शांत, भाजप नेत्याच्या पोराने आंदोलकांच्या अंगावर गाडी घालून लोकांना चिरडून मारले बंडा तात्या शांत, उत्तरप्रदेशात भाजप नेत्याने एका मुलीवर बलात्कार करून मुलीला जाळून मारले बंडा तात्या शांत, महागाई गगनाला भिडली, सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले बंडा तात्या शांत. असे अनेक विषय आहेत ज्या वर या कराडकर महारांजांनी ‘ब्र’ शब्द काढलेला नाही. संत तुकारामांचा सतत दाखला देणा-या बंडा तात्यांनी तुकाराम तरी समजून घ्यावेत. पण त्यांना ते समजून घ्यायचे नाहीत. बुडती हे जन । न देखवी डोळा ।। अशी अंतर्यामीची तळमळ मांडणारे तुकाराम बंडातात्यांना समजणार नाहीत.
कारण त्यांच्या डोक्यात तुकाराम कमी आणि नथूराम जास्त आहे. बंडा तात्या हे आर एस एस ने तयार केलेले संत किंवा वारकरी आहेत. त्यामुळेच भाजप आणि भाजपाची सत्ता अडचणीत आली की त्यांना चढते, चढली की ते चवताळून उठतात. परवा त्यांना वाईन न पिता इतकी चढण्याचे हेच कारण आहे. संघाचे हस्तक अशी तात्यांची आज प्रतिमा तयार झाली आहे. बंडा तात्याच्या एकूण वर्तन, किर्तन आणि राजकीय नर्तनावरून ते सत्य असल्याचे लक्षात येते.




