Home पुणे डेज संस्कृतीमुळे संस्कृती व मूल्यांशी दुरावा!

डेज संस्कृतीमुळे संस्कृती व मूल्यांशी दुरावा!

269

फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरा करण्याचे. त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. रोज डे पासून सुरू झालेला हा डेज चा महोत्सव व्हॅलेन्टाईन डेला संपतो. यादरम्यान प्रपोज डे, प्रॉमिस डे, टेडी डे, हग डे, चॉकलेट डे, किस डे असे विविध प्रकारचे डे येतात. डेजचा हा महोत्सव आठवडाभर चालतो. तरुण वर्ग विशेषतः महाविद्यालयीन तरुण हे डेज साजरे करण्यात सर्वात आघाडीवर असतात. कारण, याच वयात मनी प्रेम फुलत असते. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपल्या मनातील भावना पोहचवण्यासाठी तरुण या डेजची आतुरतेने वाट पाहत असतात. गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून गुलाबाकडे पाहिले जाते म्हणून यावेळी गुलाबाला खूप मागणी असते. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधाण येते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या डेजच्या निमित्ताने लाखोंची उलाढाल होत असते, हे जरी खरे असले तरी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेचाच मुहूर्त लागतो का?

आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी नजरेचा एक कटाक्ष आणि चेहऱ्यावरचे हास्यही पुरेसे असते. त्यासाठी व्हॅलेंटाईन डे चाच मुहूर्त असावा, असे काही नाही. मुळात असे डेज साजरे करावेत की नाही यावर देखील मतमतांतरे आहेत. माझ्या मते कोणावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांना भेटवस्तू देण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी, त्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी, त्यांना आपल्या भावना सांगण्यासाठी कोणत्याही डे ची गरज नसते. हे डे पुराण केवळ प्रेमवीरांसाठी आहे, असेही नाही. आजच्या सोशल मिडियाच्या युगात तर डेज चे पेव फुटले आहे. फ्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर्स डे, ब्रदर्स डे, डॉटर्स डे असे कितीतरी डे येतात. एका वर्षात किती डे येतात याची गणनाच नाही. अति झाले नि हसू आले अशीच परिस्थिती या डेजची झाली आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यांसाठी तर हे डे म्हणजे पर्वणीच असते. कोणताही डे असो शुभेच्छा देणाऱ्यांवर लाईक, कमेंट आणि शेअर चा पाऊस पडतो. वर्षभर कधी आई – वडिलांप्रति आदर व्यक्त न करणारे मदर डे, फादर डे ला खूप ऍक्टिव्ह असतात.

जन्मदात्या आई – वडिलांच्या आठवणींसाठी, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मदर्स डे, फादर्स डेची वाट पाहण्याची वेळ तरुणांवर आली आहे. हे डेज म्हणजे नैतिकतेची अवमूल्यन आहे. कोणतेही डे साजरे करण्यापूर्वी प्रत्येकाने खरोखरच या डे ची गरज आहे का ? असा प्रश्न विचारून पहावा. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पाश्चत्यांचे अंधानुकरण केल्यामुळे आपल्या मूळ संस्कृतीशी आणि मूल्यांशी दुरावा निर्माण होत आहे, हे मात्र नक्की.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here