Home महाराष्ट्र कृषी विभागासह संशोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात !

कृषी विभागासह संशोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात !

43

🔸संत्रा उत्पादकांच्या समस्यांचे समाधान कधी होणार ?

🔹विविध रोगांसह संत्रावर संशोधन करण्याची रुपेश वाळके यांची मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.9फेब्रुवारी):-तालुक्यात भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा झाडांची पाने पिवडी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केली आहे.

मोर्शी तालुका हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिकाच सुरु आहे अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संत्राला मिळणार अत्यल्प भाव, संत्रा गळती, अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे त्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे मात्र कृषी विभागाच्या व संशोधकांच्या उदासीनतेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसून मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा झाडावर कोलत्या (शेंडे मर, पायकूज व मुळकूज) या रोगाने आक्रमण केल्याने झाडांचे शेंडे वाळू लागले आहे. परिणामी शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तविली जात असून संत्रा बागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

तरीही संशोधक व कृषी विभाग अजूनही कुंभाकर्णी झोपेतच असल्याचे चित्र दिसत असून संशोधकांकडून व कृषी विभागाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर केल्या जात नसून साधी संत्रा बागांची पाहणी करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी या अज्ञात रोगापासून अनभिज्ञ आहे.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग यांच्या उदासीन धोरणामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था व क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संशोधकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल. विविध रोगांवर, संत्रा फळं गळतीवर नेमके काय उपाय आहेत. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले गेले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली.

आंबट-गोड चव, सुगंध ही ‘नागपुरी’ संत्र्याची वैशिष्ट्ये जगात कोणत्याही जातीच्या संत्रामध्ये बघायला मिळत नाही. द्राक्षे, डाळींब यासह अन्य फळे तसेच जगातील इतर जातींच्या संत्र्याच्या तुलनेत ‘नागपुरी’ संत्रा जेवढा सरस आहे, तेवढाच मागे आहे. याला शासनाचे उदासीन धोरण, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांचा अभाव तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांचा नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे.—- रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here