



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.7फेब्रुवारी):-जिल्ह्यात प्रशासनातील हप्तेखोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनमूळं, वाळू माफिया बेलगाम झाले आहेत. आणि यामुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. वाळूच्या भरधाव वाहनाने चिरडून आतापर्यंत 9 जणांचा बळी गेला आहे. तर कुठे वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून जीव जातोय. मात्र याचं कोणतचं सोयरसुतक बेलगाम असणाऱ्या वाळू माफियांना आणि निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना पडत नाही. तर हे सर्व पालकमंत्र्यांच्या वरदहहस्तातून सुरू असल्याचा गंभीर आरोप, भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात सिंदफणा आणि गोदावरी नदी पात्रात वाळू माफियांनी अक्षरशः नंगानाच सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे, धूनं धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा वाळू उपशासाठी केलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर तीन दिवसांपूर्वी क्रेनच्या माध्यमातून वाळू उपसा करताना एका मजुराचा मृत्यू झाला होता. या सर्व घटना ताज्या असतानाच काल पुन्हा एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना, गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला गावामध्ये घडली. वाळू माफियांनी जवळपास 10 ते 15 फूट खोल खड्डा केलेल्या पाण्यामध्ये, बुडुन खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे या सिंदफना नदी पात्रात वाळू माफियांनी दहा ते पंधरा फुटांचे खड्डे पाडले आहेत. तर खड्ड्यांशेजारी वाळूच्या ढिगाऱ्याचा खच पडला आहे. आज जिल्ह्यात एकही वाळू घाट सुरू नसताना, वाळूमाफियांनी सुरू केलेला नंगानाच प्रशासनातील कर्मचाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल उपस्थित केला जातोय.
तर गेवराई तालुक्यातील ही एकच घटना नसून या अगोदरही राक्षसभुवन, मिरगाव, पांढरी यासह अनेक गावांमध्ये या वाळू माफिया मुळे अनेकांचे जीव गेले आहेत. याविषयी मी अनेक वेळा आंदोलने केली, अधिवेशनात तारांकित प्रश्न केला, नदीपात्रात जिओ टॅगिंग करावी, अशी मागणी केली. मात्र हे सरकार आणि इथले सत्ताधारी दुर्लक्ष करतात. इथल्या पालकमंत्र्यांनी पाहिजे तसे अधिकारी आणून ठेवलेत, यामुळे या घटना सर्रास सुरू आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आणलेल्या अधिकाऱ्यांमुळेचं या घटना घडत आहेत. असा गंभीर आरोप भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनी साम टिव्हीशी बोलताना केला आहे. दरम्यान आतापर्यंत वाळू माफियांनी गेवराई तालुक्यात नऊ जणांना चिरडले आहे. तर वाळूसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे आता तरी या बेलगाम झालेल्या वाळू माफियांना लगाम घालणार का? आणि त्या चार मुलांना न्याय देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे





