



✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)
तलावाडा(दि.7फेब्रुवारी):-वाळू चोरी हा गेवराई तालुक्यातील तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.महिन्याला किमान एक ते दोन कोटी रुपये या अधिकाऱ्यांना अन त्यांच्या बगलबच्याना मिळतात,त्यामुळे वाळूचोरी कडे या लोकांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. एकट्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ते सहा ठिकाणी रोज किमान पाचशे गाड्या सुरू आहेत.जिल्हाधिकारी अन एसपी याकडे लक्ष देतील का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे.अधिकृत एकही वाळू पट्टा सुरू नसताना वाळूचा उपसा मात्र सर्रास सुरू आहे.संपूर्ण गोदावरी काठावर वाळूचा उपसा सुरू असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे.
तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपत पिंपळगाव येथे 2 केणी,पांढरी येथे 4 केणी,बोरगाव थडी येथे 4 केणी,गंगावाडी येथे 6 केणी,तपे निमगाव येथे 4केणी सुरू आहेत. या माध्यमातून रोज किमान शंभर ते दोनशे हायवा,ट्रक आणि ट्रॅक्टर भरून वाळू काढली जाते.मात्र हा प्रकार ना तलवाडा पोलीस ठाण्याच्या सपोनि मिरकर यांना दिसतो ना तहसीलदार सचिन खाडे यांना दिसतो.
रोज नदीपात्रातून वाळू उपसा करायचा अन रात्री वाळू वाहतूक करण्यात येते. एका गाडीचे किमान पन्नास हजार रुपये महिना अन जास्तीत जास्त दोन लाख रुपये महिन्याला गोळा केले जातात.हा रेट तहसीलदार यांचा वेगळा अन पोलिसांचा वेगळा आहे.एवढंच नाही तर ज्या भागात वाळू विक्री केली जाणार आहे त्या भागातील महसूल अन पोलीस प्रशासनाचे हप्ते वेगळे आहेत.
महिन्याकाठी दीड ते दोन कोटी रुपये मिळत असल्याने तहसीलदार आणि पोलिसांनी या वाळू माफियांना गोदापात्र मोकळे करून दिले आहे.या वाळूमुळे आठवड्यात एक तरी व्यक्तीचा मृत्यू होत असताना अधिकारी मात्र मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यात व्यस्त आहेत.


