




अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात केलेल्या भूमिकेमुळे सध्या फार वादंग उठले आहे. कोल्हे एक नट आहेत,त्याच प्रमाणे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असून काँग्रेस आणि गांधींचा अनुबंध लक्षात घेता कोल्हेंनी वठवलेली गोडसे यांची भूमिका स्वातंत्र्यप्रिय समतावादी मानवतावादी लोकमानस खपवून घेऊ शकत नाही. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. कोल्हे यांची भूमिका एका कलाकाराची भूमिका असून गोडसे प्रवृत्तीचे समर्थन ते करत नाही अशी सारवासारवही होताना दिसते. या सगळ्या दृश्य प्रकरणाच्या पल्याड एक जनमानस प्रकट होताना दिसते ते म्हणजे,
गांधींबद्दल जे या देशात घडले ते घडवून आणणारी प्रवृत्ती आजही समाजमन पचवू शकत नाही. गांधींच्या खुनाला आज पाऊणशे वर्षं होत आहे आणि या प्रवृत्तीचे समर्थन करणारे एकीकडे सत्तेत बलवत्तर असूनही गांधीजींच्या हत्तेची ही घटना समाजमनाच्या जिव्हारी लागते. पाऊणशे वर्षानंतरही गांधीजींना मारणारी प्रवृत्ती समाजाला मान्य होताना दिसत नाही तर गांधी हत्येच्या वेळी म्हणजे १९४८ मध्ये या हिंसक घटनेबद्दल किती तिखट प्रतिक्रिया उमटल्या असतील, याचा विचार करता त्यावेळेस उद्विग्न झालेलं समाजमन शांत कसं झालं असेल? कोणी यात मोलाची भूमिका पार पडली असेल? असे प्रश्न डोक्यात अलगद डोकावू लागतात.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या ही घटना मुळातच समाज मनाला न भावणारी असल्याने त्या घटनेबद्दल प्रचंड चीड आणि उद्विग्नता व्यक्त होत होती. या संदर्भात य. दि. फडके लिखित ‘केशवराव जेधे चरित्र’ या ग्रंथात गांधीहत्येच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींचा उलगडा लेखकांनी केलेला आढळतो. या ग्रंथात लेखक असे म्हणतात की, “हत्येचा निषेध म्हणून जिकडेतिकडे जाळपोळ लुटालूट होत होती. सातारा, जावळी, कोरेगाव, माढा, खानापूर, खटाव, खंडाळा पेटा, तासगाव, वाळवे, शिराळे, पाटण, कराड, आणि औंध संस्थान या तालुक्यांमध्ये सुमारे तीनशे गावातील ८९२ घरांची जाळपोळ आणि ६७ घरांची लुटालूट झाली.” ही प्रचंड मोठी सामाजिक आणि मालमत्तेची हानी तर होतीच, पण सामाजिक सौहार्दाची राखरांगोळी होती. सामाजिक तेढ आणि दंगे समाजास अस्वस्थ करणारे होते. या घटनेबद्दलची लोकांची अस्वस्थता कशी दूर करावी हे कुणालाही कळेनासे झाले होते याच परिसरात सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे कार्य मोठ्या प्रमाणात जनमानसात रुजले होते. त्यामुळे अशा बिघडलेल्या परिस्थितीचे खापर ब्राम्हणेत्तर पक्षाच्या पुढार्यांवर फोडले जात होते. सातारा जिल्ह्यातील बहुजन समाजवादी नेत्यांवर टीका करण्यात येऊ लागली. त्या काळचे मंत्री बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई चिडलेले होते.
त्यांनी बहुजन समाजाला जाळपोळ यासाठी सरसकट जबाबदार धरले जात आहे, हे पाहून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात जाहीर सभेत बाळासाहेब खेर यांच्यावर तोफ डागली. “बाळासाहेब ब्राह्मणांचे रक्षण करणारा खरा बहुजन समाज आहे. पाटण येथे भटांची घरे जाळण्यास जमाव आला असता एक शूर फौजदार मराठा माने यांनी विरोध केला. संतप्त लोकांनी त्यालाच भाल्याने भोसकून ठार केले. माने या मराठा मर्दाने आत्मबलिदान करून ब्राह्मणांची घरे वाचवली, म्हणून मी खेरांना सांगतो की, महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे संरक्षण येथील बहुजन समाज करू शकेल.” भाऊराव पाटलांची ही टीका खेर व मोरारजींना इतकी झोंबली की, त्यांनी भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेची वार्षिक दीड लाख रुपये ग्रँट रोखून धरली. अशाप्रकारे सत्तेतील ब्रह्मवृंदांनी देखील या घटनेमुळे उसळलेला जनक्षोभ ब्राह्मण विरोधी होता आणि त्याला सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीस जबाबदार धरण्याचा आटापिटा चालवलेला होता. वास्तविक पाहता दंगलखोरांचा मुख्य रोख ब्राह्मणांवर विशेषतः हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या पाठीराख्यांवर होता. त्यामुळे काँग्रेसमधील ब्राह्मणही पुष्कळ ठिकाणी सहीसलामत राहिले आणि लोकक्षोभाने ब्राह्मण जातीबाहेरच्यांनाही पुष्कळ ठिकाणी प्रसाद दिलेला आहे. (पृष्ठ. क्रमांक १६२, य. दि. फडके, केशवराव जेधे चरित्र) समाजात उडालेला भडका शांत करण्यासाठी केशवराव जेधे पुढे आले.
खेर आणि मोरारजी दंगलग्रस्त भागात फिरते फिरले पण शांतता दिसून येत नव्हती. शेवटी केशवराव जेधे यांनी बाजू सावरली. केशवराव जेधे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतून आलेले प्रभावी काँग्रेसी नेते होते. त्यांचा ब्राह्मणेत्तर चळवळीतील दीर्घकाळ अनुभव कामास येत होता. केशवराव म्हणालेत, “गोडसे ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मण समाज दोषी नव्हे, तो ज्या विचारसरणीचा आहे ती विचारसरणी दोषी आहे.” ही विचारसरणी वारंवार डोके वर काढत असते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणारी ही विचारसरणी आणि राजकीय पक्ष आज जी भूमिका मांडून गोडसेचे समर्थन करत आहे, त्या विखारी प्रवृत्तीचा अविष्कार ज्या भूमिकेतून होतो ती कोल्हेंची कलाकृती कदापि समाजाला पचणी पडू शकत नाही. या भूमिकेतून होणारे त्या व्यक्तिरेखेचे गौरवीकरण एखादा नट करत असेल तर तो समाजाला कसा अप्रिय वाटणार नाही? क़ोल्ह्यांच्या अभिनयाचा इथे केवळ निषेधच नव्हे तर, त्यांनी ज्या प्रवृत्तीची व्यक्तिरेखा अभिनयातून साकारली तिचे समर्थन होऊ शकत नाही. कारण ती एका विशिष्ट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती असून हिंसक अमानवी प्रवृत्तीला सादर करणारी आहे.
कोल्हेंच्या गोडसेफेमचे जे समर्थन गोडसे प्रवृत्तीच्या भक्तगणांकडून होताना दिसते त्याचे काही अलीकडेच पिक आले असे नव्हे. तर नव्या पिढीला सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विशेष अशा आयटी सेलच्या धूर्त-दांभिक-भाडोत्री गोडसेभक्तांकडून कमालीच्या मात्रा (फूल डोज)देणे चालू आहेत. एकीकडे गांधी-नेहरूंना टीकेचे लक्ष्य करत ऐतिहासिक मोडतोड करून त्यांची ‘खलनायक’ अशी प्रतिमा उभी करात्रची आणि गांधी-नेहरू यांना विरोध करणारी गोडसेप्रवृत्ती कशी बरोबर आहे, याचे कवित्व सुरू आहे. या देशातील विषमतेवर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी सर्वश्रेष्ठ आहे, ‘ती’च विषमताखोर प्रवृत्ती ‘विश्वगुरू’ कशी बनवू शकते असे कल्पनारम्य चित्रण केले जात आहे.या हिंसक प्रव्रुत्तीचा काथ्याकूट करणारे धर्मग्रंथ,वैदिक विद्या,त्यातील उच्चजात श्रेष्ठत्व आणि पोकळ ज्ञान,यूरोप, अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रातही अनुसरले जात आहेत, अशा कंड्या पिकवून ही गोडसे वंशावळ ब्राम्हणेतर हिंदुजनांना मूर्ख बनवत आलेली आहे. अशा प्रवृत्तीचा निषेध होणे अपरिहार्यच आहे. कोल्हेंच्या निमित्ताने का होईना तो होत आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी पुरखे थोरले वडिलधारी लोक म्हणायचे “या काळ्या टोपीवाल्यां पासून सावध रहा, दूर राहा.” त्याचा विचार करण्याची नवपिढीला नितांत गरज आहे. कारण देश एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत देशाच्या भवितव्यासाठी या गोडसेप्रवृत्तीची नांगी निक्षून विचारात घेतली तरच बेहत्तर!
✒️अनुज हुलके(९४०३२६७७११)




