




राजकारणी व्यक्ती आणि निवृत्ती हा तसा दुर्मिळ विषय आहे कारण राजकीय नेत्यांनी निवृत्ती स्वीकारली असे क्वचितच होते. वयाची ऐंशी ओलांडून गेली तरी आपल्याकडील नेतेमंडळी राजकारणात व्यस्त असतात. मात्र काही राजकीय नेते असेही असतात जे स्वतःहून राजकारणातून निवृत्त होतात. हिंगोलीच्या माजी खासदार सुर्यकांताताई पाटील यांनी काही वर्षापूर्वी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली होती आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्या व्यापारी महासंघाच्या कणकवलीत झालेल्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. राजकारणातून निवृत्ती स्वीकारल्यावर पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
प्रत्येक माणसांशी संबंधित असलेल्या पर्यावरणाचा संबंध प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यांच्या या घोषणेचे अनेकांनी स्वागत केले आहे. सुरेश प्रभू यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून राजकारणातून अलिप्त असलेल्या सुरेश प्रभू यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केली. सुरेश प्रभू हे मुळातच गुणवंत, प्रज्ञावंत आणि किर्तीवंत ठरलेले व्यक्तिमत्त्व आहे. मुंबई विद्यापीठातून चार्टड अकाउंटंटची पदवी मिळवलेले सुरेश प्रभू राजकारणात येण्यापूर्वी सारस्वत बँकेचे चेअरमन होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरुन त्यांना शिवसेनेत आणले आणि राजापूर मतदान संघातून लोकसभेला उभे केले आणि निवडून आणले.
या मतदार संघातून ते सलग चार वेळा निवडून आले. या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात विकासाची अनेक कामे केली. या काळात त्यांची मंत्रीपदावर देखील वर्णी लागली. २००२ मध्ये अंतर्गत वाद झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकसभेत पराभव झाला तरी त्यांची राज्यसभेत वर्णी लावण्यात आली. ९ नोव्हेंबर २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ साली त्यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळाले नाही त्यामुळे ते राजकारणातून बाजूला पडले. तेंव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून दूरच होते. आता तर त्यांना राजकारणाचा कंटाळाच आल्याने त्यांनी थेट निवृत्ती पत्करली. बदलत्या राजकारणात सज्जन लोकांची गोची होते असे म्हटले जाते सुरेश प्रभू यांचेही तसेच झाले असेल. राजकारणातून निवृत्ती पत्करल्यावर पर्यावरणाशी संबंधित विषयावर काम करण्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्याचा त्यांचा निर्धार मात्र स्वागतार्ह आहे. सुरेश प्रभू यांचा हा पर्यावरणवादी मार्ग आदर्श घालून देणारा आहे. सुरेश प्रभूंच्या या निर्णयाचे स्वागत.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५




