Home नांदेड भारतीय सैनिक ते सुभेदार ऑनररी लेफ्टनंट विठ्ठल कदम यांचा सोमठाणा ग्रामस्थांकडून सत्कार...

भारतीय सैनिक ते सुभेदार ऑनररी लेफ्टनंट विठ्ठल कदम यांचा सोमठाणा ग्रामस्थांकडून सत्कार …

237

✒️माधव शिंदे संपर्क(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.6फेब्रुवारी):-सोमठाणा येथे भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन आलेले सुभेदार विठ्ठल कदम यांचा सत्कार गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आला असून त्यांची मिरवणूक गावभर काढण्यात आली.या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य मनोहर पवार हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री ज्ञानेश्वर पाटील ढूमणे संचालक राजे छत्रपती मिलिटरी अकॅडमी मुखेड, श्री के के पवार माजी सैनिक( जिल्हा कार्याध्यक्ष माजी सैनिक संघटना नांदेड ), श्री दत्‍तराम गंगाराम कवळे माजी सुभेदार सोमठाणा, श्री भानुदास पाटील कदम, प्रभू पाटील कदम, बाबुराव कोलगाणे सरपंच प्रतिनिधी बरबडा
यासर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या सर्वांच्या वतीने सुभेदार विठ्ठल कदम या सत्कार मूर्ती चा सत्कार करण्यात आला.

28 वर्षे देशसेवा करून भारतीय सैनिक सुभेदार ऑनररी लेफ्टनंट श्री.विठ्ठल बालाजीराव पाटील कदम आपल्या जन्मभूमीत परतणार आहेत.सोमठाणा ता.नायगाव येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक श्री.विठ्ठल बालाजीराव पाटील कदम सोमठाणकर हे आपल्या आठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,नजरेत सदा नवी दिशा असावी,घरट्यांच काय आहे बांधता येतील केव्हाही,आकाशाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द कायम असावी…”

घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना मामाकडे शिक्षणासाठी ठेवले.कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचा वसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला.तर मायेची उब कशी धरावी हे त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले. पहिलीपासून ते चौथीपर्यंतच शिक्षण महात्मा फुले प्राथमिक शाळा नांदेड तर पाचवीपासून ते बारावीपर्यंतच शिक्षण इंदिरा गांधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सिडको येथे झाले.शाळा-कॉलेजमध्ये असताना स्काऊट गाईड एन.सी.सी मध्ये आवर्जून सहभाग असायचा. शिक्षणाबरोबरच इतर कार्यामध्ये त्यांचा सहभाग उत्साहाचा असायचा. कणखर देहयष्टी व त्यांच्या रांगड्या मनाला नेहमी असे वाटायचे क, अंगावर कोणतीतरी अधिकारी वर्दी असली पाहिजे. बारावी नंतर त्यांनी बीए प्रथम वर्षासाठी यशवंत महाविद्यालयात प्रवेश घेतला.घरात आई- वच्‍छलाबाई वडील बालाजीराव तीन लहान भाऊ नागोराव,रघुनाथ,रावसाहेब एक बहीण कविता असा मोठा परिवार होता.

विठ्ठल कदम हे भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे आई-वडिलांनाही वाटायचे की, विठ्ठलने कोठेतरी छोटी-मोठी नोकरी करून घराला हातभार लावावा. त्यासाठी त्यांनी (CRPF, SRPF) रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस या भरतीसाठी प्रयत्न केले.सतत सहा महिन्याच्या प्रयत्नानंतर ते भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी कुलाबा (मुंबई) येथे गेले वयाच्या अवघ्या 19 वर्षे चार महिन्यात ते भरती झाले. दोनशे पन्नास वर्षे जुनी असलेल्या ‘मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट मध्ये सैनिक पदावर रुजू होण्यासाठी बोलावणं आलं. त्याकाळी गावातून तालुक्यालाही एकट्याला पाठवायला आई-वडील तयार नसत, पण देशसेवेसाठी आपला मुलगा जातो या आनंदमयी क्षणाने आई-वडिलांनी आपल्या वीराला सैन्यात जाण्यासाठी परवानगी दिली.तो दिवस उजाडला दिनांक 10 जानेवारी 1994 रोजी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये सैनिक पदावर बेळगाव कर्नाटक येथे रुजू झाले.जवळपास एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर दिनांक 20 डिसेंबर 1994 रोजी भारतीय तिरंगा व मराठा रेजिमेंट च्या ध्वजासमोर शपथविधी झाला. येथूनच खऱ्या अर्थाने देशसेवेला सुरुवात झाली.

ट्रेनिंग सेंटर बेळगाव, कर्नाटक पहिली पोस्टिंग बबीना ,मध्य प्रदेश, सिक्कीम ,त्रिपुरा, नागलेंड, जयपूर ,राजस्थान, जम्मू काश्मीर 3 वर्ष, राष्टीय रायफल जम्मू काश्मीर 2 वर्ष घातक टीम मध्ये,अंदमान निकोबार, जम्मू काश्मीर, महू मध्यप्रदेश, इन्स्ट्रक्टर, फिरोजपुर, पंजाब,अरुणाचल प्रदेश , कोल्हापूर, फिरोजपुर पंजाब, भूतान,सुरतगढ, राजस्थान इत्यादी ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली.तर शिपाई,लासनाईक,नायक,हवालदार,नायबसुभेदार, सुभेदार,ऑनररी लेफ्टनंट सुभेदार ह्या पदापर्यंत त्यांनी झेप मारली तर मिडीयम मशीन गण,पालटून कमांडर,दोनी मध्ये बेस्ट स्टुडंट आणि इन्स्ट्रक्टर ग्रेडिंग इत्यादी कोर्सेस त्यांनी पूर्ण केले.सैनिक ते लेफ्टनंट या यशस्वी प्रवासाच्या दरम्यान देशसेवा करत असताना त्यांना त्यांच्या आई वडिल पत्नी,भाऊ व परिवाराची मोलाची साथ मिळाली.

घरची परिस्थिती बेताची असतानाही आपला मुलगा शिकला पाहिजे देशसेवेसाठी गेला पाहिजे ही वडिलांची ही इच्छा असल्यामुळे विठ्ठल यांचे वडील बालाजीराव यांनी अक्षरशः नौकर राहून शेतात काबाड कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे करून शिक्षण शिकवले व देशसेवेसाठी पाठवले.त्याचबरोबर त्यांचे तीन भाऊ लहान असतानाही आपल्या वडिलांच्या सोबत काम करून आपला भाऊ देश सेवेसाठी जात असताना त्यांना कुठल्याच प्रकारची गावाकडची अडचण कधीच भासू दिली नाही.याचा विठ्ठल कदम हे आवर्जून उल्लेख करतात

.कारण सीमेवर देशरक्षणासाठीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या कुटुंबाची मुख्य जबाबदारी त्यांचे वडील व भावंडांनी अगदी सक्षमपणे सांभाळली.नव्या पिढीसाठी बोलताना ते म्हणतात की, आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहा प्रयत्नवादी बना.प्रामाणिक प्रयत्न करताना कितीही वाईट प्रसंग आले तरी ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका.हे स्वतःच्या अनुभवाने सांगतात. मातृभूमीची सेवा देशसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे.हा विचार त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा स्वस्थ न बसता सैन्यात भरती होऊ इच्छिणार्‍या तरुणांना लागेल ती मदत व योग्य ते मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली.त्यांच्या मनामध्ये केवळ देशभक्ती मातृभूमी विषयाचे प्रेम होते.त्यांची आठवण आजच्या युवा पिढीने ठेवने गरजेचे आहे. आजही देशांमध्ये राष्ट्रविघातक शक्ती विरोधात भारतीय सेना तत्परतेने आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने जीवाची बाजी लावून सीमेवर व देशांमध्ये काम करीत आहेत.याचा विचार करून देशवासीयांनी व युवा पिढीने सदैव जागृत राहावे,असे ते म्हणतात.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलगा सैन्यदलात सैनिक या पदावर रुजू होतो. आणि सैन्यातील बरेचसे कठीण टप्पे पार करत करत लेफ्टनंट या पदापर्यंत पोहोचतो.ही गोष्ट तुमच्याआमच्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहे.अशा या भारतमातेच्या वीरास त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एन.टी. सर तिप्पलवाड बरबडेकर या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here