



🔸सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ का?
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.5 फेब्रुवारी):-ब्रह्मपुरी -आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रणमोचन-जुगनाळा फाट्या जवळील रोड मागील वर्षात आलेल्या महापुरामुळे जुगनाळा फाट्याच्या बाजूने एक पत्री निकामी झाला असल्याने फक्त एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे दीड वर्ष लोटून सुद्धा अद्यापही या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या फाटयावर बरेच अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.सरकारने नागपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे दोन पत्री रस्त्याचे काँक्रीटीकरण तातडीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले व ते दोन वर्षात पूर्णही केले त्यांचे कंत्राट मुंबई येथील एका प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले त्यांनी वेळेतच काम पूर्ण केले परंतु मात्र मागील वर्षी आलेल्या महापुरात या राष्ट्रीय महामार्गावरील रणमोचन जुगनाळा फाट्याजवळील एक पत्री रस्ता महापुरामुळे निकामी झाला आहे.
त्यामुळे जुगनाळा फाट्याच्या बाजूने एक पत्री वाहतूक बंद आहे त्यामुळे सुसाट वेगात वाहन चालवणाऱ्या प्रवाशांना एक पत्री रस्त्याचा अंदाज येत नाही व रस्ता रुंद असल्याचा भास होतोत्यातच हे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे सदर कंपनीने त्यां ठिकाणी बॅरिकेटीग व रेडियमच्या पट्या व शिवाय रात्री चमकणारे लाईट लावले होते मात्र तेही वारंवार चोरीला गेल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना काहीच दिसत नाही.
हा राष्ट्रीय महामार्ग सध्या प्रवाशांसाठी मृत्यू मार्ग ठरत असून सदर ठिकाणी आठवड्यातून वारंवार अपघाताच्या घटना होताना आढळून येत असुन या झालेल्या अपघातात अनेक प्रवासी नागरिकांना अपंगत्व आले असून बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र दीड वर्षानंतरही या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्ती करण्यात आली नाही तातडीने ही दुरुस्ती करावी व प्रवाशी नागरिकांच्या मृत्यूचा खेळ थांबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न करावेत अशी मागणी अनेक नागरिकांकडून आता होऊ लागली आहे.





