



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि.3फेब्रुवारी):- गोसेखुर्द प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या गोसे बु. गावात समस्येने उग्र रूप धारण केले आहे. या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जलसंपदा व लाभ -क्षेत्र विकासमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना युवा स्वाभीमान पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
विदर्भात एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पात अडविण्यात आले आहे. यामुळे वैनगंगा नदी पात्रातील बॅकवॉटर हे नदीपात्रातील गावात शिरून शेती घरे व अन्य मालमत्तेचे नुकसान होत आहे. गोसे धरणाच्या शेजारी असलेल्या गोसे बु.ची लोकसंख्या 1500 आहे. जेव्हापासून या प्रकल्पात पाणी साठविणे सुरू झाले तेव्हापासून या गावात समस्येने उग्र रुप धारण केले आहे. गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी साठवण पातळीपासून फक्त 30 मीटर अंतरावर सदर गाव वसलेले आहे. या गावात राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती ही नाजूक असून शेतकरी शेतमजूर वर्गातील नागरिकांची बहुतांश घरे मातीची कच्ची आहेत. जवळच मोठे प्रकल्प असल्यामुळे गावातील मातीची घरे सतत ओली असतात. किंबहुना घरात सतत चिखल सध्यास्थितीत असते. त्यामुळे मच्छर व अन्य किटकांचा त्रास होऊन रोगराईमुळे येथील नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे हे गाव पूर्णपणे बाधित असल्यामुळे संपूर्ण गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी युवा स्वाभीमान पक्षाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत जलसंपदा व लाभ क्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्या नावे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन सादर करण्यात निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन मेश्राम, शहेबाज शेख, सुधीर गजभिये, कादर घानीवाले, विजय पोवळे, मुकुंदा निकुळे, शिवशंकर माटे, संगीता निकुळे, पिंटू जलबंधु, काशिफ आरीफ शेख, निखिल गोंडाणे उपस्थित होते.


