



वर्तमानाचे कालचक्र अत्यंत वेगाने बदलत आहे. जग एक ग्लोबल खेडे बनू पाहत असताना तरुणाईचा भारत देश तरुणाला उध्वस्त करत आहे. तरुणाईच्या क्रांतीने देशाने अभूतपूर्व अशी क्रांती केली आहे. त्या तरुणाला धार्मिक व जातीय वातावरणात मशगूल ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आज दिसत आहे. तरुण हा देशाचा कर्णधार असतो. तरुणाच्या ओठावरील गीतांमधून देशाचे भविष्य उमलत असते.पण हाच तरुण आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काही तरुण हे धर्माधिष्ठित व जातीधिष्ठित दिसत असले, तरी अनेक तरुण हे भारताचे खरे शिलेदार आहेत. आपल्या ज्ञानक्रांतीतून ते देशाला शिखरावर घेऊन जात आहेत. मात्र आज शिक्षण घेणारे अनेक तरुण बेरोजगार आहेत . त्यांना योग्य रोजगार सरकार उपलब्ध देऊ शकत नाही.
सरकारी सेवा क्षेत्रात अघोषित नोकरीबंदी करून त्यांच्या जीवन मेटाकुटीला आणले आहे. एखादी जाहिरात निघाली तर तिचा निकाल योग्यप्रकारे लागत नाही. अनेक परीक्षांमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यामुळे जो तरुण मेहनत करतो तो तरुण बेचैन झालेला आहे. ज्वालामुखी पेटत असताना नव्या उमेदीने तो शांत आहे. पण रेल्वे बोर्डाच्या निकालावरून अत्यंत उग्र झाला आहे. या उग्र होण्याला जबाबदार रेल्वे बोर्ड आहे. जाहिरात निघूनही योग्य नियोजन नाही. निकालातील तफावत आणि पुन्हा कधी पर्यंत निकाल लावला जाईल. हे सांगता येत नसल्याने बिहार ,युपी आणि अनेक देशातील राज्यांमध्ये तरुणाईचा उद्रेक पाहायला मिळालेला आहे.
तरुणाईने आपले हक्क मागत असताना त्यांच्यावर पोलिस कारवाई केली जात आहे .अत्यंत दुःखद घटना आहे .सरकारने आपले जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य न करता विद्यार्थ्यांनाच जबाबदार समजणे ही गोष्ट देशहिताच्या आड येणारी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध तरुणांनी फार मोठे आंदोलन छेडले होते. आज महाराष्ट्रातील अनेक परीक्षेमध्ये घोटाळे निघालेले आहे. टीईटी ,आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा व इतर परीक्षा मधली पेपर भ्रष्टाचार करून फुटलेले आहेत. चुकीच्या मार्गाने अनेक उमेदवारांना नोकरी मिळालेली आहे. त्यामुळे या सर्व परीक्षावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत .महाराष्ट्र सरकारने योग्य पावले उचलावी नाहीतर सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल.
आज देशातील तरुणाला मंदिर मस्जिद, जात-धर्म या मुद्द्यापेक्षा, बेरोजगारी व महागाई यांची समस्या जाणवत आहे. करोना महामारी ने त्यांची आर्थिक होरफळ होत आहे. अश्या वाईट अवस्थेत शासनाने शिक्षण क्षेत्राला उद्ध्वस्त केले आहे. पदोन्नती मधील आरक्षण नाकारले आहे. त्यामुळेच समाजातील तरूण आता अशांत, दु:खी आहेत .खाजगीकरणाने सरकारी नोकरीवर गदा आणली आहे. तरुणाईच्या शिक्षणाचा योग्य इस्तेमाल सरकार करताना दिसत नाही. तर त्यांना फक्त राजकारणासाठी उपयोगात आणला जात आहे.
देश गंभीर वळणावर उभा आहे .पुढचा काही काळ तरुणाला नक्कीच त्रासदायक आहे .वर्तमान केंद्रसरकारने नोकरीची नाकेबंदी केली आहे. खाजगी कंपन्या तरुणांना योग्य जाॅब देत नाही .तसेच सरकारने लॅटर भरतीच्या नावावर क्लास वन क्लास टू मध्ये आपल्या आवडीचे लोक भरलेले आहेत. यामुळे सारे तरुण वर्ग संतप्त आहे. आरक्षणाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही. हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात तर शिक्षणाचा बोजवारा वाजणारा आहे. धंदेवाईक शिक्षणातून आपण फक्त फायदा करून घेऊ शकतो. पण योग्य तरूण करून निर्माण करू शकत नाही .
देशाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी तरूणाईशिवाय तरणोपाय नाही. साऱ्या तरूणाने आपली भेद सोडून स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे. आपले अधिकार लढवून मिळवले पाहिजे .आपल्या रोजगारासाठी शासनासोबत निकराचा लढा दिला पाहिजे .सरकारी सेवेतील नाकेबंदी च्या षडयंत्राला हाणून पाडले पाहिजे तेव्हाच तरूणाईच्या क्रांतीला खरा रंग प्राप्त होईल . नाहीतर हा तरुणाईचा उद्रेक समस्त देशाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. तूर्तास एवढेच .
✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००


