Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचा महावितरणला दे दणका शेतीतील विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबत निवेदन

शेतकऱ्यांचा महावितरणला दे दणका शेतीतील विद्युत पुरवठा खंडित न करण्याबाबत निवेदन

313

🔸शेतकऱ्यांना विज बिल भरण्याकरिता ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.31जानेवारी):-शेतकऱ्यांचे थकीत विद्युत बिल असल्याने महावितरणकडून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरू आहे. कोरपना तालुक्यातील नांदा, बिबी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला. शेतकऱ्यांवर असलेले अस्मानी-सुलतानी संकट यामुळे विज बिल भरणे प्रत्येक शेतकऱ्यांना कठीण होते. त्यातच सोयाबीनचे दर घटल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यासंदर्भात कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडित करू नये या मागणीसाठी शेतकरी संघटना युवा आघाडी तर्फे गडचांदूर येथील महावितरणचे उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटना युवा आघाडीच्या निवेदनाची दखल घेत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार नाही असे महावितरने आश्वासित केले. विद्युत बिल भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भारतीय वीज कायद्यातील कलम ५६ (१) अन्वये थकित वीज पुरवठा खंडित करणे अगोदर १५ दिवसांची नोटीस संबंधित शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र तशी कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचप्रमाणे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदींचे देखील उल्लंघन होतांना दिसते, ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. महावितरणच्या बेकायदेशीर कृती विरोधात गरज पडल्यास संविधानिक मार्गाने लढा उभारला जाईल असे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनाची महावितरणने दखल घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी शेतकरी संघटना युवा आघाडीचे रत्नाकर चटप, स्वप्निल झुरमुरे, दिलीप देवाळकर, उदय काकडे, मुरलीधर झुरमूरे, महादेव एकरे, मारुती देरकर, देवराव गिरडकर, सुनील भोयर आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here