



✒️लेखक:-राहुल बोर्डे,पुणे(मो:-9822966525)
काही दिवसाखाली अल्लू अर्जुन या कलाकाराची भूमिका असलेला “पुष्पा” हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बहुतांश प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील “मैं झुकेंगा नही साला” हा संवाद बराच प्रसिद्ध झाला आहे. पुष्पाच्या स्टाईलने प्रभावित होऊन हा संवाद बोलताना आपल्याला अनेक जण दिसत आहेत. कदाचित याच गोष्टीत या चित्रपटाचे यश सामावलेले दिसते. अशा पद्धतीने अनेक चित्रपटातील अनेक गोष्टी वेळोवेळी प्रेक्षकांवर प्रभाव टाकत असतात. दिग्दर्शक, निर्मात्यांना चित्रपट यशस्वी करण्यासाठी आणि कधीकधी समाज प्रबोधनासाठी अशा गोष्टी दाखवाव्याच लागतात. पण प्रश्न हा आहे की चित्रपटातील अशा गोष्टींचा प्रभाव फक्त मनोरंजन म्हणून पडतो की एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्य देखील प्रभावित करतो.
पुष्पा चित्रपटाबद्दल पण नेमका हाच प्रश्न मनात येतो. “मैं झुकेंगा नही साला” या संवादाकडे आपण मनोरंजन म्हणून बघतो की वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव पाडून घेतो? आपण जर वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव पाडून घेणार असतोल तर “झुकेंगा नही साला” या वाक्याचा व्यवस्थित अर्थ समजून घ्यायला हवा. झुकणार नाही याचा सरळमार्गी अर्थ होतो की चुकीच्या गोष्टी पुढे लाचारी पत्करणार नाही.
पण बरेच वेळेस आपण आयुष्यात झुकण्याचा सोयीने अर्थ काढताना दिसतो. आयुष्य जगताना आपण काही वेळेस परिस्थितीनुसार माघार घेतो, नाते टिकवण्यासाठी नमते घेतो, भविष्यात चार पावले पुढे जाण्यासाठी आज दोन पावले पाठीमागे सरकतो म्हणजे आपण लाचारी पत्करतो असे नाही. आपण असे करणे म्हणजे त्या वेळेस त्या परिस्थितीशी केलेली तडजोड असते. ही तडजोड नैतिकतेला धरून आणि भविष्याचा वेध घेणारी असेल तर झुकण्यात, माघार घेण्यात काहीच कमीपणा नाही. आयुष्यामध्ये परिस्थितीनुसार माघार घेताना किंवा झुकताना आपण तत्त्वांना मुरड घालतो का? नैतिकतेचा गळा घोटतो का? यावर तुमचे झुकणे चुक किंवा बरोबर ठरते.
कोणत्याही परिस्थितीत झुकणे किंवा न झुकणे या गोष्टीला एटीट्यूड बनवण्यापेक्षा काळ – वेळेनुसार व्यवहारी दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतल्यास भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यास मदत होते. काही असेही आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचे महान कार्य असते जिथे गर्विष्ठ मानाही आपोआप झुकतात. अशा व्यक्तिमत्त्वांनी इतिहास घडवलेला असतो. अशा व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास आपल्याला वेळ प्रसंगानुसार माघार घ्यायला आणि लढायला शिकवतो. अशा व्यक्तिमत्वासमोर झुकण्याला समोरच्या व्यक्ती प्रति असलेला आदर म्हणतात न की कमीपणा किंवा अपमान. “मै झुकेगा नही साला” हा एटीट्यूड तुम्ही नेमका कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये दाखवता यावर तुमचे व्यवहार चातुर्य लक्षात येते, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता दाखवून देते, नातेसंबंधाना तुम्ही कशा प्रकारे महत्व देतात याची ओळख करून देते.
तुम्ही पुष्पाचे फॅन जरूर व्हा पण कधी झुकायचे किंवा नाही झुकायचे याचा सारासार विचार तुम्हाला करायचा आहे न की तुमच्यातल्या पुष्पाला. लाईफ मे जरुरत की हिसाब से कभी कभी झुकना भी पडता है साला.


