Home पुणे प्रशासनाच्या बिफिकीर वृत्तीने बिहारमधील आंदोलन चिघळले!

प्रशासनाच्या बिफिकीर वृत्तीने बिहारमधील आंदोलन चिघळले!

68

रेल्वे भरती परीक्षेत गोंधळाचा आरोप करून बिहार मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी मोठे हिंसक आंदोलन केले या आंदोलनात रेल्वेचे मोठे नुकसान झाले. रेल्वे मंत्रालयाने एनसीपिटीची दुसऱ्या टप्प्यातील संगणकावर आधारित १५ ते १९ फेब्रुवारी याकाळात होणारी परीक्षा तसेच ग्रुप डी ची तांत्रिक पदांसाठी २३ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा अचानक रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संयम संपला आणि या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ दूर करावा व परीक्षा नियोजित दिवशीच व्हावी यासाठी सुरवातीला संवैधानिक पद्धतीने शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले. जहानाबाद, समस्तीपुर, रोहतास मध्ये सुरू झालेले हे आंदोलन हळूहळू संपूर्ण बिहारमध्ये पसरले. या आंदोलनाने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक उतरून रेलरोको केल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. भोजपुरमध्ये पॅसेंजरच्या इंजिनला आग लावण्यात आली त्यामुळे हावडा दिल्ली मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. आंदोलकांनी श्रमजीवी एक्सप्रेसवर दगडफेक केली. करीमगंज जवळ उभ्या असलेल्या रिकाम्या डब्यांना आगी लावण्यात आल्या. आंदोलन हिंसक झाल्यावर आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन थांबवले. आता आंदोलन थांबले असले तरी बिहारमध्ये तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. रेल्वेने जे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी असतील त्यांना नोकरी न देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी संचालक दीपक पीटर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून ही समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन अहवाल रेल्वे मंत्रालयाला पाठवेल.

त्यांनतर रेल्वे मंत्रालय पुढील निर्णय घेईल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. सुरवातीला शांततेत चालणारे विद्यार्थ्यांचे आंदोलन अचानक हिंसक कसे झाले याची चौकशी व्हायला हवी. विद्यार्थ्यांना हिंसा करण्यास कोणी प्रवृत्त केले याचीही चौकशी व्हायला हवी. आंदोलन हिंसक होईपर्यंत प्रशासन काय करत होते? या आंदोलनाची प्रशासनाने वेळीच दखल का घेतली नाही? प्रशासनाच्या बेफिकीर वृत्तीमुळेच हे आंदोलन चिघळले आहे. बिहार सरकारने या सर्व आंदोलनाची सखोल चौकशी करायला हवी व पुन्हा अशा प्रकारचे हिंसक आंदोलन होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. विद्यार्थ्यांनीही हिंसक आंदोलने केल्याने प्रश्न सुटतील का? सरकारी मालमत्तेचे नुकसान करून आपण देशाचेच नुकसान करत आहोत ना याचा विचार करावा. अचानक परीक्षा रद्द झाल्याने वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संताप साहजिकच आहे मात्र हिंसा करून सरकारी मालमत्तेची हानी करण्याच्या त्यांच्या कृतीचे समर्थन कोणीही करणार नाही.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here