



🔺दोघांवर गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.24जानेवारी):-वीज वापराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वागदरा तांडा (ता. गेवराई) येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वायरमनला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव (दोघे रा. वागदरा तांडा. गेवराई) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. वायरमन सुनील कचरू काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली. गेवराई तालुक्यातील वागदरा तांडा येथील वस्तीवरील अनेक लोकांकडे वीज देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. सध्या महावितरणकडून थकबाकी वसूलीसाठी वीज तोडणी मोहीम सुरु आहे. या आदेशाने वायरमन सुनील कचरू काटकर विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी वायरमन सुनील काटकर हे गेले होते.
येथील विद्युत पुरवठा बंद करत असताना रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव यांनी श्री. काटकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सुनील काटकर यांच्या फिर्यादीवरून रमेश जाधव, विकास जाधव याच्यांवर अडथळा आणल्याप्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


