Home गडचिरोली हिंदुत्ववादाची ‘एकदम कडक’ भूमिका!

हिंदुत्ववादाची ‘एकदम कडक’ भूमिका!

361

(बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष)

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक तथा मुख्य संपादकही होते. त्यांची ‘हिंदुहृदय सम्राट’ म्हणूनही लोकांच्या हृदयांवर छाप उमटली आहे. बाळासाहेबांनी दि.१९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या मते ‘समाज सुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, परंतु मराठी माणूस मागेच राहिला. महाराष्ट्रात सुविधा आहेत, मात्र मराठी माणूस दुविधेतच. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार! तर महाराष्ट्रात पैसा आहे, परंतु मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे, मात्र मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होत आहे.’ शिवसेनेचा पहिला मेळावा याच वर्षी ३० ऑक्टोबरला शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात लाखो लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच त्यांची आणि शिवतीर्थावरील- शिवाजी पार्कवरील मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स.१९५०मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ते विविध संस्था, कंपन्या व नियतकालिके यांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन अशी कामे करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती.

बाळासाहेबांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मराठी विद्या व संस्कृती यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दि.२३ जानेवारी १९२६ रोजी झाला. हिंदूंच्या पूजापाठ व अंधश्रद्धावर कडाडून प्रहार करणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे वडील आणि रमाबाई या त्यांच्या प्रेमळ मातोश्री होत. महाराष्ट्राचे सांप्रत मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे हे त्यांचे सुपुत्र तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजजी ठाकरे हे त्यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात बाळासाहेबांचा प्रचंड दबदबा निर्माण झाला होता. झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टी वासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही त्यांचीच होती. व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता. त्यामुळेच त्यांना ‘महाराष्ट्राचा वाघ’ असे संबोधले जात होते. आज त्यांच्या जयंतीच्या मंगल प्रसंगी समस्त कार्यकर्ते व शिवसैनिक “कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला!” अशा आरोळ्या ठोकत त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात.

बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६०मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकास ‘मार्मिक’ हे नाव त्यांना वडील प्रबोधनकारांनीच सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला असतानाही प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. इ.स.१९६०पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी लोकांना मार्गदर्शन करत. ते ‘श्‍याम’ या बालपाक्षिकाचे सुद्धा संपादक होते. वक्तृत्वाबरोबरच ठाकरे भेदक लेखन देखील करत. प्रबोधनकार केशव ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळासाहेबांचे अग्रलेख असत.
बाळ ठाकरे हे हिंदुत्ववादी होते. बाँबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही, असे विचार त्यांनी मांडले. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘हिंदुहृदय सम्राट’ अशी पदवी दिली. त्यांनी दिलेली ‘गर्व से कहो, हम हिन्दु है’ ही घोषणाही त्यांच्या राजकारणाचा महत्त्वाचा भाग होती.बाळासाहेब ठाकरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन दि.१७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांनी चिरनिद्रा घेतली.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व सुलेखक:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here