



जीवनात सांप्रत समर्थ सद्गुरूचा शोध घेतला. त्या ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेले व ब्रह्मज्ञान प्राप्तही झाले. मग पुढे काय? तर सद्गुरूवर अढळ विश्वास बसल्यास भक्ती फळाला येते. भक्ती फळू लागली की त्यातून आनंद मिळतो आणि भगवद्भक्त मोक्ष-मुक्तीची मुक्ताफळे सहज प्राप्त करून सेवू शकतात. म्हणूनच सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी निरंकारी भक्तांच्या हाती ‘विश्वास-भक्ती-आनंद’ हे त्रिशस्त्र सोपविले. त्यात प्रत्येक साधकाचे आत्मकल्याण दडलेले आहे. सद्गुरू त्रिकालदर्शी असतो, त्यासाठीच जगद्गुरू संत तुकारामजी महाराजांनी म्हटले-
“लोह परिसाची न साहे उपमा।
सद्गुरू महिमा अगाधचि।।
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन।
गेले विसरून खऱ्या देवा।।”
[पवित्र संगीत भजनी मेळा: अभंग क्र.४३]
विश्वास: अनेक लोक दीर्घकाळ जे करीत आले ते इष्टच असेल. या विश्वासामुळेच अनेक पारंपरिक चालीरीती कोणतीही चिकित्सा न करता स्वीकारल्या जातात. कुणीतरी सांगितलेला पूजापाठ, मंत्रोच्चारण किंवा धर्मग्रंथांतील प्रत्येक वचनावरील विश्वास हा याच पद्धतीने निर्माण झालेला असतो. विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेर तसेच काही व्यक्तिमनातही असतात. आपल्या परिसरातील घटकांना सर्व व्यक्ती सारख्याच पद्धतीने प्रतिक्रिया देत नाहीत. व्यक्तीचे वय, तिची मानसिक वाढ, तिचा अनुभव, तिच्या व्यक्तिमत्वातील परिपक्वता अशा अनेक घटकांवर त्या त्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. त्यामुळे विविध व्यक्तींच्या विश्वासांचे जगही वेगवेगळे असते. आईवडील, शिक्षक व मित्र यांची मते लहान मुले चिकित्सा न करता खरी म्हणून विश्वासाने स्वीकारतात. त्याचप्रमाणे विचार करण्याची जबाबदारी टाळणारे काही प्रौढही इतर जे काही सांगतात, ते सर्व विश्वासार्ह मानून त्यांच्या मतांवर विश्वासाने अवलंबून राहतात. असा अढळ विश्वास आपल्या समर्थ सद्गुरूवर निर्माण झाला तरच आपल्या भगवद्भक्तीचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा अर्थात पाया घातला जाऊ शकतो.
विश्वास हे विविध वस्तू, व्यक्ती, अन्य प्राणी, विचारप्रणाली, मूल्य, तत्त्व यांच्याशी किंवा अद्भूत व कल्पित मानले जाणारे विषय यांच्याशीही जडणारे भावनात्मक नाते आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी व त्यांच्या उपदेश- वचनावर माझा दृढविश्वास आहे, परमपिता परमात्मा निरंकार- ईश्वराच्या अस्तित्वावर माझा विश्वास आहे. त्या माणसाच्या प्रामाणिकपणावर माझा विश्वास आहे, तुम्ही निश्चितपणे विजयी व्हाल असा मला विश्वास वाटतो, अशी वा अशा प्रकारची विधाने दैनंदिन जीवनात आपण अनेकदा ऐकतो. त्यांचा आशय लक्षात घेतला तर ‘विश्वास’ या शब्दाचा अर्थ खात्री, श्रद्धा या शब्दांच्या अर्थाजवळ येतो, असे दिसून येईल. विशेषत: ईश्वराच्या अस्तित्वावरील विश्वासाला ‘श्रद्धा’ हाच शब्द सामान्यत: वापरला जातो. विश्वास निर्माण करणारे काही घटक व्यक्तिमनाच्या बाहेरचे, तर काही व्यक्तीमनातले असतात. व्यक्तिमनाच्या बाहेरचे जे घटक असतात ते घटक विशेष महत्त्वाचे होत. उदा- प्रसारमाध्यमे जे संदेश पुन्हा पुन्हा देतात, ते त्यांच्या प्रभावी सूचकक्षमतेमुळे ग्राहकांचा विश्वास जिंकतात. दूरदर्शनवरील विविध उत्पादनांच्या जाहिराती पाहून ती उत्पादने अत्यंत दर्जेदार आणि खात्रीलायक असावीत, असा विश्वास कित्येकांच्या मनात निर्माण होतो. तर वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेली वृत्तेही १०० टक्के विश्वसनीय म्हणून अनेक लोक स्वीकारत असतात. निरंकारी बाबा युगदृष्टा सद्गुरू हरदेवसिंहजी महाराजांनी निक्षून सांगितले-
“जो विश्वास को दृढ़ बनाये ऐसे भगत का संग करें।
प्रभु का जो अहसास जगाये ऐसे भगत का संग करें।
नफ़रत निंदा से जो बचाये ऐसे भगत का संग करें।
कहे ‘हरदेव’ जो प्यार सिखाये ऐसे भगत का संग करें।”
[सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.११६]
भक्ती: भक्ती हा संस्कृत शब्द मूळ धातू किंवा क्रियापद भज् वरून आला आहे. ज्याचा अर्थ आहे- विभागणे, वाटणे, सहभागी होणे, भाग घेणे, भाग असणे, हा झाला शब्दशः अर्थ. मात्र आंतरिक आत्मीयता, भक्तीभाव, आवड, आदर, विश्वास किंवा प्रेम, पूजा आदी कृती, आध्यात्मिकतेप्रती असलेली पावित्र्याची भावना, धार्मिक मूल्ये किंवा मुक्तीचे मार्ग, असेही या शब्दाचे अर्थ होतात. योग या शब्दाचा शब्दशः अर्थ युती किंवा जोडणे, असा आहे. या संदर्भात याचा अर्थ असा मार्ग जो मुक्ती, मोक्ष मिळवून देतो असा होतो. इथे उल्लेखिलेला योग म्हणजे आपल्या आत्म्याशी- आपले खरे स्वरूप ब्रह्म- अंतिम सत्य या संकल्पनेद्वारा एकत्र होणे वा जोडले जाणे, असा आहे. भक्ती योग हा आत्मा, परमात्मा आणि सर्व प्राणिमात्र यांच्यामध्ये असलेले ऐक्य आणि सुसंवाद अगदी जवळून समजू शकतात. तोही जणूकाही एखादा शाश्वत आनंदच असतो. अशा भक्तीयोगामुळे आपण मन, भावना आणि इंद्रिय हे सर्व एकवटून निरंकार- परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. भक्तीद्वारे आनंद उत्पन्न झाला पाहिजे, तेव्हाच आपल्या भक्तीला महत्त्व येईल. निरंकरी मिशनचे महान ग्रंथकार संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराजांनी कोरून ठेवले-
“भक्ति लोकीं अजे न समझे रब नूं पाणा भक्ति ए।
छड के सारे वहम भुलेखे गुरू रिझाणा भक्ति ए।
इक नूं मनणा इक नूं तकणा इक नूं पाणा भक्ति ए।
बाकी सारे कर्म छोडो एह कर्म कमाणा भक्ति ए।
बेरंगा ए बेरूपा ए बाणी जो फ़रमाया ए।
कहे अवतार मैं हू-ब-हू ही रमे राम नूं पाया ए।”
[सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र.३०१]
भक्ती, भक्ती योग किंवा भक्ती मार्ग हा हिंदू धर्माप्रमाणे एक आध्यात्मिक मार्ग किंवा अध्यात्मिक साधनेचा एक प्रकार म्हणावा लागेल. ज्यामध्ये आपल्या आवडत्या किंवा इष्टदेवतेला प्रेमभावाने पूजिले जाते. ज्ञान योग आणि कर्म योग याबरोबरच अध्यात्मिक साधनांमधील हा एक मार्ग आहे. ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये भक्तीची व्याख्या ‘सहभाग, समर्पण आणि कोणत्याही प्रयत्नामध्ये असलेली आत्मीयता होय’ अशी केली गेली आहे. जीवनमुक्ती व मोक्ष मिळविण्यासाठी सांगितलेल्या तीन आध्यात्मिक मार्गांपैकी एक म्हणून भक्ती योगाची पवित्र भगवद्गीतेमध्ये सखोल चर्चा केली आहे. भक्त म्हणून आपल्या इष्टदेवतेच्या बाबतीत प्रत्येकाची वैयक्तिक आवड निरनिराळी असू शकते. एक निराकार- निरंकार प्रभू परमात्मा समस्त देवतांचे मूळरूप आहे. म्हणून निरंकारी भक्त फक्त यालाच पूजतात.
आनंद: आनंद या सिद्धांतांमध्ये अनपेक्षित सकारात्मक घटनांना सामोरे जाणे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला पाहणे आणि इतरांच्या स्वीकृती आणि स्तुतीचा आनंद घेणे, यांचा समावेश होतो. हाच आनंद पुढे पुढे ब्रह्मानंदाकडे घेऊन जातो. ब्रह्मानंद ही मोक्षाची पायरी ठरते. म्हणून निरंकारी मिशनमध्ये सद्गुरू दर्शन आणि सद्गुरू- निरंकार प्रभू परमात्मा यांचे गुणगाण महत्त्वाचे मानले जाते. संतश्रेष्ठ नरसी मेहताजी महाराज दर्शनमहिमा वर्णितात-
“मन लोभीनें कपट रहित छे!
काम क्रोध निर्वाया रे!
भणे नरसौयों तैनु दरशन करतां!
फल एकोतेर तार्या रे!”
[पवित्र संगीत भजन संग्रह: भजन क्र.१०]
आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद हा सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो. आनंदामुळे जीवनात शक्ती आणि ठाम उद्देश डोळ्यापुढे दिसतो. आनंदी असल्यावर आपल्याला कुठला ही आजार त्रस्त करू शकत नाही. कोरोनासारखी महामारीही आपल्यापासून दूर हटू शकते. आनंद हा शब्द मानसिक किंवा भावनिक अवस्थांच्या संदर्भात वापरला जातो, ज्यामध्ये समाधानापासून तीव्र आनंदापर्यंतच्या सकारात्मक किंवा आनंददायी भावनांचा समावेश होतो. जीवनातील समाधान, व्यक्तिनिष्ठ कल्याण आणि उत्कर्ष या संदर्भात देखील याचा वापर केला जातो. निरक्षर व्यक्तीपुढे कितीही मोठे विनोदी किस्से लिहून ठेवले, तरीही त्याच्यावर मात्र शून्य प्रभाव दिसून येईल. कारण त्याला अक्षर ज्ञानाअभावी त्या ओळींतील आशय कळतच नाही. आनंद कसा मिळवावा? तर सद्गुरू कृपेने ते शक्य आहे. शंभू भोलेनाथाने देवी पार्वतीस गुरूमहात्म्य समजावून सांगितले: पवित्र गुरूगीता शतक: श्लोक क्र.९१-
“गुरूरेको हि जानाति स्वरुपं देवमव्ययम्।
तज्ज्ञानं यत्प्रसादेन नान्यथा शास्त्रकोटिभिः।।”
[केवळ गुरुच अविनाशी परमात्म्याचे वास्तविक स्वरूप जाणतो आणि गुरूच्या कृपेनेच परमात्म्याचे ज्ञान होते. अन्यथा कोट्यावधी शास्त्राच्या अध्ययनानेही ते होऊ शकत नाही.]
निरंकारी संतसमागम हे ईश्वरभक्तांमध्ये ‘विश्वास-भक्ती-आनंद’ वृद्धिंगत करीत असतात. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षांपासून ते प्रत्यक्षरित्या होत नाहीत. तर ते व्हर्च्युअल- आभासी स्वरूपात होत आहेत. त्यातही भक्तगणांचा उत्साह व आनंद वाखाणण्याजोगाच असतो, हे सांगणे न लगेच!
✒️संत चरणरज -श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी[मराठी साहित्यिक नागपूर विदर्भ प्रदेश]द्वारा- प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं. २०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, मो. ९४२३७१४८८३.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com


