Home महाराष्ट्र महानुभावांच्या ३०० देवस्थानांच्या पुनर्वैभवासाठी धोत्रे ते कायगांव रस्ता निर्माण करावा

महानुभावांच्या ३०० देवस्थानांच्या पुनर्वैभवासाठी धोत्रे ते कायगांव रस्ता निर्माण करावा

244

🔹नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.20जानेवारी):- अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ३०० पेक्षा जास्त देवस्थानांना गतवैभव मिळवून देऊ शकणाऱ्या परिसराच्या विकासासाठी धोत्रे ते कायगांव रस्ता निर्माण करावा, अशी मागणी नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. या ६० किमीच्या रस्त्यामुळे शेकडो गावांना फायदा होऊन डोमेग्राम, सराला बेट आणि इतर धार्मिक ठिकाणांना पुन्हा वैभव प्राप्त होण्यास सहाय्य ठरेल.’गोदावरी’ नदीला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्ण महाराजांचे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात महानुभाव पंथ स्थापन केला. त्यांनी कर्मभूमी म्हणून महाराष्ट्राची निवड करीत आपले तत्वज्ञान मराठीत निरूपण केले. यंदा स्वामींचे अवतरण अष्टशताब्दी वर्ष आहे. आजही संपूर्ण भारतात १.५ कोटी तर महाराष्ट्रात ३% मंडळी महानुभाव पंथीय आहेत.८०० वर्षांपूर्वी उभय गंगातीर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनित झाले. स्वामींचे श्रीक्षेत्र डोमेग्राम (कमालपूर) येथे बरेच दिवस वास्तव्य होते, येथुनच महानुभाव पंथाची पायाभरणी झाली.

पंथियांच्या १६५० तीर्थस्थानांपैकी ३०० देवस्थाने या परिसरात आहेत. स्वामींच्या पदस्पर्शाने धोत्रे, हिंगोणी, पुरणगांव, पुणतांबा, सावखेड गंगा, नायगांव, नाऊर, वाजरगांव (सराला बेट), भालगांव, चांदेगांव, नागमठाण, हमरापूर, बाजाठाण, डोमेग्राम (कमालपूर), देवगांव, घोगरगांव, बेलपिंपळगांव, सुरेगाव, नेवरगांव, कानडगांव, ममदापूर, बागडी, जामगांव ही गावे पवित्र झालेली आहेत. दरवर्षी लाखो मंडळी या परिसरात दर्शनासाठी येतात; परंतु अनेकांची इच्छा असूनही रस्त्यांमुळे वंचित राहतात.

   श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात जीवोद्धारासह सामाजिक क्रांतीही केली. त्याकाळी अनेक ब्राह्मण विद्वान मंडळींसह सर्वांना धर्मोपदेश केला, त्यातील पंडित म्हाइंभट हे स्वामींचे शिष्य. श्रीम्हाइंभटांनी मराठीतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्रा’चे लिखाण केले, त्यांचे जन्म गांव ‘सराळा’ असून त्यांना ‘सराळे’कार पंडित म्हाइंभट म्हणून मराठी साहित्यात ओळखले जाते.  गोदावरीच्या मधोमध असलेल्या ‘सराला बेटा’वर औषधीयुक्त वनस्पती, फळबागा, गोशाळा असून नदीच्या दुतर्फा पर्यावणपूरक झाडे लावण्यात आली आहेत. बेटाच्या चारही बाजूने पुलांची बांधणी करून हेलिपॅड, व्यापारी संकुल, बेटासमोरच्या मैदानावर भव्य भक्तनिवास तसेच गोशाळा उभारण्यात येत आहे. अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेटाकडे यायला धड रस्ता नाही, हे मोठे दुर्दैव म्हणाले लागेल. दर एकादशीला या तिन्ही जिल्ह्यांतील १० ते १५ हजार वैष्णवांचा मेळा बेटावर जमतो. खड्यांत हरवलेल्या रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करीत भाविक ये-जा करतात.
धोत्रे ते कायगांव असा ६० किमीचा रस्ता तयार झाल्यास ३०० देवस्थानांचे सहज दर्शन होईल आणि ऐतिहासिक गावांना गतवैभव प्राप्त होईल.

नगर जिल्ह्यातील कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा होईल. आज कायगांव ते धोत्रे जायचे असल्यास ३ तास लागतात, नंतर ६० किमी अंतर १ तासांत पोहोचता येईल. सध्याच्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.गोदेकाठच्या परिसरात मुबलक पाणी असूनही हा भाग विकासापासून दूर आहे. येथे दूध, भाजीपाला, फुले, फळे या लवचिक आणि नाशिवंत वस्तुंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुलभ आणि जलद वाहतूक व्यवस्था असल्यास या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध होईल.या भागात शासकीय जमीन असल्यामुळे भु-संपादन करताना फार अडचणही येणार नाही. कोपरगांव तालुक्यातील धोत्रे जवळून समृद्धी महामार्ग आहे. धोत्रे येथून गोदावरीच्या दक्षिण भागातील प्रवरासंगमजवळील राष्ट्रीय महामार्गावरील कायगांवपर्यंत नवीन रस्ता तयार होऊ शकतो. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे आराखडा तयार करावा, असे हरिहर पांडे यांनी अष्टशताब्दीच्या औचित्याने परिसराचा विकास व्हावा, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लिहीले आहे.

*या रस्त्यामुळे होणारे विविध फायदे*

१) धोत्रे ते कायगांव रस्त्यामुळे ३०० देवस्थाने जोडले जातील, यामुळे स्थानांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास सहाय्य.
२) अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शेकडो गावांना थेट फायदा.
३) ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांना गतवैभव प्राप्त होईल.
४) ‘सराला बेटा’चा विकास होऊन इतरत्र पर्यटनाला वाव.
५) समृद्धी महामार्गाला उत्तम कनेक्टीव्हीटी.
६) उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येईल, त्यामुळे शेतीला प्रोत्साहन.
७) नविन उद्योग येतील, रोजगार उपलब्ध होईल.
८) सामाजिक जीवनमान उंचावेल.

— –

रस्ता असा असावा-

समृध्दी महामार्गापासून धोत्रे- हिंगोणी- पुरणगाव- सावखेड (गंगा)- सराला बेट- भालगांव- डाकपिंपळगांव- चांदेगांव- नागमठाण- हमरापूर- बाजाठाण- देवगांव- चेंडूफळ- हैबतपूर- नेवरगांव- कानडगांव- ममदापूर- बागडी- जामगांव- कायगांव (प्रवरासंगम) राष्ट्रीय महामार्गापर्यंत (अंदाजे ६० किमी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here