



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:;9075913114
बीड(दि.19जानेवारी):;वडील अपंग… आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. जिथे हाता-तोंडाचा कसाबसा मेळ लागतो त्या कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कुठून उपलब्ध होणार? मात्र, अशाही स्थितीत गणेश सुधाकर पन्हाळे हा १० वर्षांचा चौथीतला विद्यार्थी दररोज ७ किलोमीटर सायकलने प्रवास करीत शिक्षण घेत आहे. तो ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे प्राथमिक विद्यालयात शिकत आहे. गणेशची शिक्षणाबद्दलची ही आवड लक्षात घेत त्याच्या शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांनी त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरू ठेवली आहे.
गणेश दुसरीत असताना कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले. मोबाईलअभावी तो ऑनलाईन शिक्षणापासून दुरावला. अशा मुलांचं शैक्षणिक वास्तव लक्षात घेऊन संभाजीराव बडगिरे विद्यालयाने मागील वर्षीचा अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करूनच पुढील वर्षाचे अध्यापन सुरू केले. त्यामुळे गणेश परत शिक्षणाच्या प्रवाहात आला. मात्र आता ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा बंद झाल्या. शाळेतील इतर मुले ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ लागली. मात्र साधनांच्या व्यवस्थेअभावी गणेश ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हता.
गणेश दररोज सकाळी शाळेत येतो. सात किलोमीटरचा येण्याजाण्याचा प्रवास करून घरी परततो. एवढंच नाही, तर पुन्हा शेतातील गाईला चारापाणी पाहण्यासाठी शेतात जाऊन आई-वडिलांना मदत करतो. कडाक्याची थंडी असो वा दाट धुक्याने वेढलेला रस्ता त्याचा दिनक्रम चुकत नाही.
शिकण्याची जिद्द : मला शिकायचं आहे, या ओढीने शाळेसाठी गणेशचा दररोज सुरू असलेला हा सायकलवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आव्हानांना अधोरेखित करणारादेखील आहे. परिस्थितीअभावी असे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर तर जात नाहीत ना? याचा विचार करणे गरजेचे आहे.
आईची साद गुरुजींनी ऐकली
एका बाजूला गणेशचे शिक्षण थांबतेय ही भीती, तर दुसरीकडे नको त्या संगतीमध्ये जाईल ही चिंता वाटल्याने गणेशच्या आईने शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांच्याशी संपर्क साधत गणेशसाठी काहीतरी व्यवस्था करावी, अशी विनंती केली.
मुलाच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही त्याला शाळेत नियमित सोडलं तर मी जबाबदारी घेईन, असे आश्वासन गुरुजींनी दिले. दुसऱ्या दिवसापासून पन्हाळे यांनी स्वतःचे अकरावी, बारावीचे अध्यापन सांभाळत गणेशला एकट्याला नियमित शिकविणे सुरू ठेवले.


