



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.19जानेवारी):-भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय व प्रादेशिक कार्यकारिणीच्या दिनांक 17 रोजी झालेल्या बैठकीत इ पीएफ पेन्शन किमान ५००० रु करावे या मागणीसाठी देशभरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयांसमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.खासगी क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना १९९५ पासून रु १००० इतकी भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन मिळत आहे, आज वाढत असलेली प्रचंड महागाई लक्षात घेता ही पेन्शन अत्यल्प असून त्यात भरीव वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय मजदूर संघ सातत्याने प्रयत्न करीत आहे. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात भविष्य निर्वाह निधी पेन्शन किमान ५००० रुपये करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने १९ डिसेंबर रोजी झालेल्या प्रिबजेट मिटिंग मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मा. ना. निर्मला सीतारामन यांचेकडे केली होती.
सदरची मागणी येत्या अर्थसंकल्पात मान्य व्हावी व याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील पी एफ कार्यालयांवर निदर्शने केली जाणार असून देशभरातील तब्बल ६५ लाख पेन्शनधारकांच्या न्याय मागणीचे निवेदन मा. ना. केंद्रीय अर्थमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे भारतीय मजदूर संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.भारतीय मजदूर संघ सातारा यांच्यावतीने या आंदोलनाची जबाबदारी जेष्ठ पदाधिकारी मा. डी. जी. देशपांडे, मा. साळवेकर फलटण यांचेवर सोपवल्याचे जिल्हाध्यक्ष मा. शामराव गोळे यांनी सांगितले.





