Home महाराष्ट्र भाषेतील बोलीचे रेशीमबंध आणि भाषिक आतंकवाद

भाषेतील बोलीचे रेशीमबंध आणि भाषिक आतंकवाद

310

भाषेने मानवी जीवन फुलवले . जीवनाच्या भावविश्वाला पैलू पाडत व्यवहाराच्या रथाचे सारथ्य भाषेने चोख बजावले आहे . मानवाच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक बनून , भाषा व्यक्तिमत्वाची जडणघडण घडवीत असते . अनन्य साधारण महत्व असलेल्या भाषेविना व्यवहार विकलांग होऊन बसते . त्यामुळे भाषा टिकवण्यासाठी , प्राचीन काळापासून आजतागायत प्रयत्नांची मालिका सुरू होती . आणि यापुढेही त्यात कसूर होणार नाही , हे तितकेच सत्य आहे . येनकेनप्रकारेण भाषेचे संगोपन करण्यासाठी मानवाची धडपड चाललेली असते . मानव जितका स्वतःवर प्रेम करतो , तितकाच आपल्या भाषेवर जीव जडवुन घेतो . जीवन आणि भाषा यापासून फारकत घेता येत नाही . सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोबत असणारी भाषा , जीवनसांगिनी बनून वावरत असते . जीवनसागरात भाषेच्या आधाराने व्यवहाराची नौका पार होत जाते . इतके मौल्यवान रत्न जोपासणे काळाची गरज आहे .

भाषा संवर्धनासाठी लिखित माध्यमाचा वापर केल्या जाते . या प्रवासात लिखित भाषेला सजवण्यासाठी , बोलली जाणारी बोली महत्वपूर्ण भूमिका बजावते . बोली असेल तशी भाषा फुलत जाते . भाषा हे फुल असेल तर बोली वेल आहे . वेल चांगला पसरला तरच फुलांचा ताटवा शोभून दिसते . भाषेचा मुकुट सजविण्यासाठी बोलीच्या मण्यांची आरास करावी लागते . मणी गळून पडले की मुकुटाचे मूल्य कमी होत असते . कदाचित दुर्लक्ष होण्याचा संभव टाळता येत नाही . बोलीमूळे भाषेला शोभा येते . बोलीचा इतिहास पुसल्यास , भाषेतील शब्दांच्या अर्थाला अवकळा येऊन भाषा मोडकळीस पडते . भाषा शरीर मानले तर बोली आत्मा आहे . बोलीचा आत्मा भाषेत प्राण भरून अर्थाचा श्वास फुकते . भाषेच्या मुळाशी जाऊन पहा , त्याला बोलीचाच ओलावा दिसून येईल . ओलावा नष्ट करण्याचा मूर्खपणा केल्यास , वाढलेला वृक्ष कोलमडून पडेल . मूल जन्माला आले की त्यावर वातावरणानुसार संस्कार घडत जातात , म्हणून ज्या उदरातून जन्म घेतला त्याला पोरका थोडाच होतो ? ज्या गर्भात वाढला त्या गर्भाची माया तोडून असंवेदनशीलतेची पायाभरणी घातल्यासारखे होईल .

मूल जन्माला आले की , त्याच्या मुखी उमटणारे स्वर , त्याच्या अस्तित्वाची सुरुवात करीत असते . कालांतराने परिस्थितीसापेक्ष जडणघडण होत असताना स्वरांवर संस्कार केले जातात . पण भावनेच्या मुळाशी असलेला अर्थ बदलत नाही . व्यक्त होण्यासाठी भाषा विकसित होताना ,संदर्भ बोलीचाच असतो . भाषा आणि बोली एका नाळेत जुडलेल्या असल्याने , वेगळेपण दाखविणे म्हणजे मूर्खाच्या बाजारात जाण्यासारखे । घट्ट जुळलेले बंध न ओळखता , श्रेष्ठतेच्या नावाखाली भाषेची वेगळी व्याख्या करण्याची स्पर्धा सुन्न करून जाते . ज्याला संधी मिळाली तो आपल्या परीने भाषा वाकवत गेला . पण त्यासाठी समाजजीवनातील घटना , रूढी ,परंपरा आणि चालीरीती याचा आधार घेतलेला आहे . याला कोणी नाकारू शकत नाही . आणि याचा उगम बोलीतूनच झालेला असतो . फक्त ज्याला गवसला , त्याने आपल्या पद्धतीने मांडला . बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले , तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही . संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत . पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला नाही . अर्थ तोच आहे . मग भाषेच्या नावाखाली बोलीची गळचेपी ही संस्कृतीची विटंबना आहे .
संत नामदेवांची ओवी गुरुग्रंथसाहिबमध्ये घेतली म्हणून धर्म बाटला नाही .

मग भाषेत बोलीचे शब्द आल्यास , भाषा अशुद्ध कशी होते ? हा संशोधनाचा विषय आहे . भाव आणि अर्थ एक असताना शब्दाला गावंढळ ठरवण्याचा भाषिक आतंकवाद ; कित्येकांच्या भावनिक दमनाला खतपाणी घालत , विचारस्वातंत्र्याची पायमल्ली करीत आहे . शालेय शिक्षणापासून कार्यालयीन कामकाजात सामान्यांची होणारी कुचंबणा या आतंकवादाचे ध्येयच बनले असावे . जरा का बोलीतील शब्द आला की , भाषिक आतंकवादी ताशेऱ्यांचा भडिमार करायला मोकळे । मग इतर नियोजित क्षेत्र तर सांगायची गोष्टच नाही . भाषिक आतंकवाद पसरवणारी टोळी गल्लोगल्ली पाहायला भेटेल . दगडाचा गोटा झाला तरी , हे आतंकवादी धोंडे फेकायला तयारच राहतात . बोलीच्या लकबीमुळे वेलांटी , उकारापासून ‘न’ आणि ‘ण’ च्या खलबती चालवून , व्याकरणाचा तर उन्माद घालायला सुरू . या तांडवात बोलीचा प्रेषित भाषेचा वापर करण्याआधीच कोंडमाऱ्याने गुदमरून जातो . हा आतांकवाद जणू विशिष्ट वर्गालाच भाषेची मक्तेदारी बहाल करीत जातो , आणि इतरांनी गुलामासारखे त्यात फरफटण्याचा प्रकार ।

भावना , विचार व्यक्त करायला बोलीची भाषा अस्पृश्य मानली तर विशिष्ट वर्गाची बोली भाषाप्रमाण मानणे , भाषिक आतंकवादाला बळकटी देण्यासारखे होईल . अभिव्यक्त होणारी प्रत्येक भाषा ही शुद्धच असते . फक्त श्रेष्ठत्वाची चढलेली काजळी पुसल्यास , सर्व स्वच्छ दिसते . पण मनात आधीच गढूळपणा असेल तर ? कावीळ झाला की जग पिवळे दिसते म्हणतात . आता या काविळीवर उतारा शोधावाच लागेल . ह्या रोगाने भाषेचा अंत व्हायला नको असेल तर , बोलीची प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे . बोलीतून पाझरणारे हार्मोन्स भाषेची ताकत वाढवणार आहेत . बोलीचा हात पकडून भाषेची भरभराट होणार , ही खूणगाठ सुटता कामा नये . भाषेच्या अस्मितेवरील भाषिक आतंकवादाचा डाग पुसायचा असेल तर , बोलीचा झरा वाहता ठेवणे काळाची गरज आहे .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here