Home Education अंधारातून उजेडात नेणारा पथदर्शक!

अंधारातून उजेडात नेणारा पथदर्शक!

328

(संत भगवानबाबा पुण्यतिथी विशेष)

संतश्रेष्ठ भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी संप्रदायाला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली.
आबाजींचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. तेथील महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते व तत्कालीन गादीवर माणिकबाबा होते. आबाजींचे आईवडील नेमाने माणिकबाबांच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत. एकदा आईवडील त्यांना घेऊन विजयादशमीच्या दिवशी तेथे आले. आबाजींनी माणिकबाबांना “गुरूपदेश द्या” असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरूपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले. पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले. म्हणून माणिकबाबांनी त्यांना अनुग्रह दिला आणि गुरूपदेश केला. नंतर गुरूजींनी त्यांचे नाव ‘भगवान’ ठेवले. असे म्हटले जाते, की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले.

माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांत सुपेघाट सावरगाव येथे श्रावण वद्य पंचमी शके १८१८ म्हणजेच दि.२९ जुलै १८९६ रोजी संतशिरोमणी भगवानबाबा यांचा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव आबा किंवा आबाजी ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप होते. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते. सावरगावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरुन पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता.शिरूर, जि.बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आले. ग्रामीण भागात रीती रिवाजानुसार गुरेढोरे राखायला ते जात असत. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच त्यांना अध्यात्माची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. ते घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करत असत. त्यांनी पंढरपूर दिंडीत जाण्यास सुरुवात केली. दिघूळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबांसोबत ते प्रथम दिंडीस गेले.

पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते, अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत होती. त्यामुळे त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत गेले. पहिल्या वारीच्या शेवटीच तेथे पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण केले. त्यांनी गीतेबाबांनाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरून गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेले नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसले. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा त्यांनी तुळशीमाळ घालण्याचा आग्रह केला. लहान आबाजींचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला. तेव्हाच ते घरी परत आले.
अनेक वर्षे बाबांची कीर्तन कारणाने भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला. समाजाचे विदारक चित्र पाहून त्यावर बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा व चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते.

त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे औषधपाण्याकरिता दाखल केले. संतश्रेष्ठ भगवानबाबा हृदयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक इस्पितळातील डॉ.के. बी.ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हे ज्ञानेश्वरीचे पारायण करत असत. तेथेच दि.१८ जानेवारी १९६५ रोजी वयाच्या ६९व्या वर्षी समाधीस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा त्यांनी “पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय!” असा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे भगवान बाबांना त्यांच्या पावन पुण्यस्मरण पर्वावर विनम्र अभिवादन !!

✒️संत चरणधूळ:-श्रीकृष्णदास निरंकारी- ‘बापू’.मु. पोटेगावरोड, पॉवर हाऊसच्या मागे, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली, भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here