



“मैं भी रोहित वेमुला”! नाटकाचे दोन प्रयोग पनवेल मध्ये संपन्न झाले
संजय कुंदन लिखित आणि मंजुल भारद्वाज दिग्दर्शित व अभिनित “मैं भी रोहित वेमुला!” हे नाटक एका 6 X 6 च्या जातीवादी कुव्यवस्थेत कैद झालेल्या भारत देशाचे प्रतिबिंब दर्शवते. याच जातीवादी शोषणातून, कैदेतून मुक्त होऊन संविधान संमत , न्याय संगत देशाच्या निर्माणाचे स्वप्नं पाहणारा एक तरुण “रोहित” जेल च्या चार भिंतींशी संवाद साधत, प्रेक्षकांच्या मेंदूत असलेल्या अनेक असंवैधानिक भिंतींना तोडून न्याय, समता आणि माणूस म्हणून जगण्याच्या मूळ प्रश्नांना समोर आणतो.आपण वर्ष 2022 मध्ये प्रवेश केला असला तरी एक भयाण वास्तव “मैं भी रोहित वेमुला” हे नाटक आपल्या समोर मांडते. जातीय संघर्षाची पाळंमुळं आपल्या आत किती घट्ट रुजली आहेत,याची जाणीव होते.
जाती – धर्माच्या भिंती ओलांडून एक व्यक्ती माणूस म्हणून जगू पाहतो तेव्हा समाज त्याला पुन्हा पुन्हा त्याच चौकटीत आणून बसवतो. नाटकाच्या सुरुवाती पासूनच ही चौकट आपल्याला दिसते. काळाकुट्ट अंधार असलेली जेलची कोठडी आणि त्या कोठडीत समाज व्यवस्थेच्या,कायदा सुव्यवस्थेच्या, शासन यंत्रणेच्या विरुद्ध संविधान संम्मत जगण्यासाठी सन्मान पूर्वक मनुष्य म्हणून जगण्यासाठी लढणारा युवक आपल्या समोर उभा राहतो. नाटकाची सुरवात चरित्राला एक स्वप्न पडते तिथून होते आणि पूर्ण नाटक पाहिल्यावर समाजाचे वाईट स्वप्न जे आपण वास्तविकतेत जगतोय हे जाणवते.
रोहित वेमुला या क्रांतिकारी युवाच्या कहाणीशी आपण परिचित आहोतच, सुरुवातीला ही त्याचीच जीवनकथा वाटते परंतु जसजसे नाटक पुढे जाते तसे समजते की ही कथा रोहित वेमुला ची नसून “रोहित सिंग” ची आहे. नावात फरक असला तरी व्यवस्थेने त्यांच्यावर केलेल्या शोषणात काही फरक आढळत नाही. आपल्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, न्यायासाठी,अन्यायाविरुद्ध लढा देण्यात काहीच गैर नाही आहे, परंतु ही व्यवस्था अश्याच बंड पुकारणाऱ्या क्रांतिकारांना एका चौकटीत कैद करत आली आहे, त्यांचा आवाज दाबत आली आहे.
संजय कुंदन यांच्या लेखणीतून साकारलेला “मैं भी रोहित वेमुला”शोषण, शोषित, अन्याय याही पलीकडे मानवीय संवेदना दाखवणारा प्रयोग आहे.सहानुभूती नाही तर हक्कांचे विश्लेषण दाखवणारा हा नाट्य प्रयोगआहे. जातीय मानसिकता उलगडत अनैसर्गिक विकृतींना आव्हान करते. मंजुल भारद्वाज यांचे दिग्दर्शन नाटकाला सर्वांगाने समृद्ध करते, प्रेक्षकांना अंतर्मुख करते.
“जय भीम” हा केवळ नारा नाही तर एक संकल्पना आहे . एक विचार आहे याची जाणीव झाली . आतापर्यंत केवळ नारे आणि घोषणांचा कर्कश आवाज ऐकत आलो, त्या नाऱ्यांची आर्तता या नाटकातून मिळाली.सम्राट अशोक ते रोहित सिंग हा ठळक फरक मंजुल भारद्वाज सरांच्या अभिनय चरित्रात दिसतो. क्रूर,हिंसक आणि आक्रमक सम्राट अशोक त्याची भव्य शरीरयष्टी आणि तारुण्याच्या उत्साहाने, उमेदीने व विवेकीदृष्टी असणारा तरुण ! आत्मबळ असलेला पण आत्महीन समाजाच्या व्यवस्थेला प्रश्नचिन्ह करणारा रोहित.
70 मिनिटांचा नाट्यप्रयोग एकपात्री परफॉर्मन्स रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी साकारला आहे, त्यांची ऊर्जा, सहजता आणि स्पंदन तरंग अद्वितीय आहे.सहज बोलणे आणि उत्कट भाव आपल्याला सतत चेतावतो. मनातला आक्रोश आणि तितकाच आईची आठवण आल्यावर येणार आर्त स्वर, गहिवरलेले भेदक डोळे या सगळयाचे दर्शन या नाट्यप्रयोगात पाहायला मिळाले.अभिनेता पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून, आपल्या स्वच्छ, निर्मळ आणि शांतीप्रिय समाज निर्माणाचे स्वप्न सांगत आहे, जेव्हाकी ते कपडे एका “कैदी”चे आहेत हा विरोधाभास त्रासदायक जाणवतो. अभिनयात भावनात्मक आवेग, आत्मीयता, वैचारिक स्पष्टता आणि प्रस्फुटीत होणारे सृजनात्मक तरंग प्रचंड जाणवतात. केवळ दलित, आदिवासी, वंचित वर्गच नाही तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तींमध्ये संविधानाची मूल्य जागृत करण्याची जाणीव आणि शोषणाविरुद्ध हिंसेने वाटचाल न करता अहिंसेच्या तत्वावर संतुलित विचार करणारा युवा संपूर्ण प्रवासात दिसून येतो.
निसर्गाच्या सानिध्यातील नैसर्गिक रंगमंच ही तर या प्रयोगाची पर्वणी आहे. पनवेल मधील ‘युसुफ मेहेरली सेंटर’ तेथील बापू कुटीचा ऐतिहासिक रंगमंच,या रंगमंचावर होणारा मंजुल सरांचा सहज वावर, दृश्य बदलतांना प्रेक्षक म्हणून आपल्या डोळ्यांसमोर तयार होणारे दृश्य जसे की कोर्ट रूम असो किंवा जेल, घर , क्लब, कॉलेज चे कॅम्पस हे डोळ्यांसमोर तयार होतात.आपल्या आसपास होणाऱ्या जातीय संघर्षाच्या आणि अनेक अन्यायाच्या घटनांचे संदर्भ या नाटकात आहेत जे मनाला अस्वस्थ करतात.
ज्यावेळी एक कलाकार अशा प्रकारच्या विषयांना हात घालतो तेव्हा तो समाजा सोबत स्वतः समोर ही आरसा उभा करतो. कारण शेवटी एक व्यक्ती म्हणून तो देखील याच समाजाच्या जडणघडणीतुन आलेला असतो,तेव्हा तो स्वतःच्या मानसिकतांना कसे खोडतो,कसे स्वतःला रिफ्लेक्ट करतो आणि समाजाच्या सर्व बिरुदांना बाजूला करत एकमाणूस म्हणून स्वतःला पाहतो आणि माणुसकीसाठी उभा राहतो.4 जानेवारी 2022 रोजी, सायंकाळी 5 वाजता. या नाटकाचा युसुफ मेहेरली सेंटर, पनवेल येथे शुभारंभ झाला आणि 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता.त्याची दुसरी प्रस्तुती YMC कॉलेज तारा गाव, पनवेल येथे संपन्न झाली.
आजच्या काळात या भयाण स्थितीत “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाटय सिद्धांत नवीन वर्षात नव विचारांची आणि पुरोगामी वैचारिक रंगसंकल्पनांची पेरणी करत आहे. प्रत्येक व्यक्तीला संविधान संम्मत जगण्यासाठी प्रेरित करत आहे.
थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी


