



[मकर संक्रांती विशेष]
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच त्यात उखाण्यांची चलती असते. देवीपुराणातील हा श्लोक पहा-
“संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।
तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।”
(अर्थ- मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात- सुघटात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो. महाराष्ट्रात या दिवशी लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची एक प्रथा आहे. काही ठिकाणी आकाशात पतंग उडविण्याचा ‘पतंगमहोत्सव’ आयोजित करण्यात येत असतो. उखाणा-
“मकरसंक्रांतीला, लोक उडवतात पतंग!
… रावांची आवड आहे, करावा सत्संग!!”
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. महिला वर्ग उखाणे घेतात. हा सण इंग्रजी जानेवारी महिन्यात म्हणजेच हिंदू पंचांगाप्रमाणे तो पौष महिन्यात येतो. मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणत. संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. उतर भारतात हिमाचल प्रदेश व पंजाब- लोहडी अथवा लोहळी. पूर्व भारतात बिहार- संक्रान्ती, खिचडी. आसाम- भोगाली बिहू, पश्चिम बंगाल- मकर संक्रान्ती, ओरिसा- मकर संक्रान्ती. पश्चिम भारतात गुजरात व राजस्थान- उतरायण- पतंगनो तहेवार (पतंगांचा सण). दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश- संक्रान्ती, तमिळनाडू- पोंगल. तर भारताबाहेरील देशात नेपाळमध्ये थारू लोक- माघी,अन्य भागात माघ संक्रान्ती, थायलंड- सोंग्क्रान, लाओस- पि मा लाओ, म्यानमार- थिंगयान. उखाणा-
“तिळाची माया, गुळाची जोडी।
परमेश्वर सुखी ठेवो, …-…ची जोडी।।”
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण- प्रवेश करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढे पुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून ते सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. उखाणा सांगतो-
“नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून!
… रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून!!”
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक पितामह भीष्म हे बाणांच्या शय्येवर- शरशय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते, अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते. मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र नोंदविलेले दिसून येत नाही. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यातील उपसणास भोगी- सामान्यतः तारीख १४, संक्रांत- १५ व किंक्रांत- १६ जानेवारी अशी नावे आहेत.
“महालक्ष्मी देवीला, अलंकाराचा साज!
… रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज!!”
भोगी: संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरबऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरे, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.
“आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी!
… रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी!!”
संक्रांती: संक्रांतीस आप्तस्वकीयांना, मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळासह तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात.नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते. लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चाॅकलेटेही घालतात.याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
किंक्रांत: संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात, तेही उखाणे घेत-
“संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,
… रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.”
आहारदृष्ट्या महत्त्व: संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत जोडायचे असा हा कार्यक्रम असतो.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
✒️संकलन व सुलेखन :-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली(व्हा. नं. ९४२३७१४८८३)
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com


