



🔹उत्कृष्ट लेखन करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल दै.झुंजारनेतामध्ये अजितदादांच्या शुभहस्ते सन्मान
✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)
आष्टी(दि.12जानेवारी):-सौंदर्य जसे पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते,तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो!’प्रत्येकाला आनंद हवाच असतो,परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय ?आणि तो कसा मिळवावा? हे उमजून येत नाही! खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो.आपण सकारात्मक दृष्टी,कर्तव्य,कार्य करत इतरांसाठी जगतो तेव्हा आपसूकच आपल्याला आनंद मिळतो! किंबहूना हेच कार्य आणि कर्तव्य बीड जिल्ह्याचा आवाज बनलेल्या दैनिक झुंजारनेताचे वरिष्ठ पत्रकार,अभ्यासू लेखक आणि नूतन उपसंपादक उत्तमराव बोडखे यांच्या बाबतीत दिसून येतो.गेल्या कित्येक दशकापूर्वी बीड जिल्ह्याच्या मातीत अत्यंत प्रतिकूल कठीण परिस्थितीमध्ये झुंजारनेताचे रोपटे स्व.मोतीरामजी वरपे दादा यांनी लावले.या सुगंधी रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर कधी झाले हे कळले नाही परंतु या जडणघडणीत स्व,मोतीरामजी (दादा),स्व.रत्नाकरभाऊ आणि गतवर्षी ज्यांना आपण मुकलो ते निवासी संपादक श्रीपती माने! यासारख्या दिलखुलास दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे जाणे हे झुंजारनेतासाठी नियतीचा क्रूरपणा असण्याचा भाग आहे.
अशा या महामहीम,स्वच्छ,सुंदर,सकारात्मक,विचार घेऊन जिल्ह्याच्या मातीत राजकीय,सामाजिक,आर्थिक,धार्मिक वैचारिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये झुंजार नेता आला,अलगद मिसळून सर्वांच्या ठायी प्रेम जिव्हाळा आस्था माया निर्माण करून झुंजारनेताची नवी क्षितिजापार वाटचाल झाली.या सर्वांच्या सोबतीला राहिलेले अर्थातच उत्तमराव बोडखे!काल सोमवारी बीड येथे दैनिक झुंजारनेताच्या मुख्य कार्यालयात वार्ताहर,एजंट आदीसह झुंजारनेताच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मेळावा कार्यक्रमात विविध विषयावर साधक बाधक चर्चा झाली.तत्पूर्वी झुंजारनेताच्या आधारवड राहिलेले मोतीरामजी वरपे दादा,रत्नाकरभाऊ आणि स्व.मानेसाहेबांना आदरांजली अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली.तत्पूर्वी या गत वर्षामध्ये उत्कृष्ट लेखन करून झुंजारनेताची मान उंचावली आणि दर्जेदार लेखणीतून समाज उपयोगी आणि समाजाभिमुख कर्तव्य केले.
गुणात्मक लेखणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला अशा आष्टी तालुक्याचे वरिष्ठ पत्रकार आणि दैनिक झुंजारनेताचे नूतन उपसंपादक उत्तमराव बोडखे यांचा मुख्य संपादक अजितदादा वरपे यांच्या शुभहस्ते आणि कार्यकारी संपादक आकाश वरपे,राम कुलकर्णी,सुभाष वाव्हळ,अक्षय केंडे यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे तीन दशकभर दैनिक झुंजारनेताच्या पायाभरणीत आणि जडणघडणीत महत्त्वाचा दुवा म्हणून राहिलेल्या उत्तमराव बोडखे यांचा एकमेवाद्वितीय उल्लेख करण्याजोगा आहे.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे,शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभांचे सडेतोड वार्तांकन करून झुंजारनेताची सममूल्य दृष्टी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अत्यंत दमदारपणे सुरु ठेवण्यात उत्तम नावांचा खारीचा वाटा नक्की आहे.पूर्णतः एकनिष्ठ राहून,सदैव,सर्व विषयांना घेऊन पूर्णवेळ कार्य करणारा अष्टपैलू पत्रकार अशी उत्तमराव यांची खासियत आहे.
वर्तमानपत्राचा दर्जा राखण्यासाठी सुंदर,दर्जेदार,गुणात्मक,अस्सल शब्दांची आणि साहित्याची गुंफण अन् पेरणी अर्थात सर्जनशील साहित्य,लेखन त्यातील सामाजिक भाव या सर्वांगाने भाषिक कौशल्य वापरून सर्जनशीलता जपण्यात त्यांनी हातभार लावला आहे.!
अशा या सर्वगुणसंपन्न पत्रकारिता क्षेत्रात स्वतःला वाहून घेत,सैनिका समान तेजस्वी कार्य करत..दीपस्तंभासारखे सदैव जनतेच्या सेवेत राहणाऱ्या..पत्रकार तथा उपसंपादक उत्तमराव बोडखे साहेब आपले अभिनंदन..!
आपला आम्हांला अभिमान वाटतोय..!!
प्रा.बिभिषण चाटे(पाटोदा)


