



🔸कोरोणामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालुका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.12जानेवारी):-तब्बल पावनेदोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात प्राथमिक शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. विद्यार्थी आणि पालकांसह विद्यार्थ्याविना कंटाळलेल्या शिक्षकांच्या चेहर्यावरही आनंद फुलला. मात्र , गेल्या दहा दिवसांपासून पुन्हा कोरोनाचे मळभ दाटल्याने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज 11 जानेवारीपासून शहरी आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने चिमुकल्यांचा आनंद औट घटकेचा ठरला आहे.
तब्बल पावणे दोन वर्षानंतर 1 डिसेंबरपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू होऊन रविवार आणि सुट्टीचे दिवस सोडून केवळ 32 दिवस झाले अन् आजपासून 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.कोरोनाच्या दोन लाटांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक विद्यार्थी शिक्षणात मागे पडले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लाँकडाउन दरम्यान ऑनलाइन शिक्षण सुरू होते.
परंतु, त्याचा पाहिजे तसा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. गेल्या सहा महिन्यांपूर्वी कोविडचा जोर ओसरताच टप्प्याटप्प्याने शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आली तर 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू केल्याने करण्यात आल्याने शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांत आनंद संचारला.सर्व अटी व शर्ती शिथील होत असताना अचानकपणे ब्रेक के बाद परत झालेल्या या कोरोणाच्या रिएटिंमुळे गेल्या दहा बारा दिवसा पासून कोरोणा रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोणाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने चिमुकल्याचा आनंद औटघटकेचा ठरला आहे. जिल्ह्यातील शाळा पंधरा फेबुरवारी पर्यत बंद करण्यात असल्या तरी विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाईन शिक्षण देण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा ससेमिरा लागणार आहे.


