



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.7जानेवारी):-मुंबई महानगर पालिकेचे बजेट ४० हजार कोटी रुपयांचे आहे. मात्र, त्यांना अद्याप महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल उघडता आला नाही. मात्र, बीड नगर पालिकेने मात्र हे करुन दाखविले, असे कौतुक भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या क्षीरसागर बंधूचे केले. बीड नगर पालिकेच्या सौ. केशरकाकु महिला बचतगट मॉलचे उद्घाटन शुक्रवारी चित्रा वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर उपस्थित होत्या. बीडमध्ये नगर पालिकेच्या माध्यमातून महिला बचतगटांची चळवळ जोमात सुरु आहे. पालिकेने बचत गटांचा मॉलही उभारला आहे. दरम्यान, क्षीरसागर बंधू सध्या शिवसेनेत कार्यरत असताना उद॒घाटनासाठी भाजपच्या चित्रा वाघ आणि प्रमुख पाहुण्या म्हणून काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना निमंत्रित केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया अगोदरच उंचावल्या होत्या.
दरम्यान, सव्वालाखे उपस्थित राहील्या नाहीत. मागच्या काळात क्षीरसागर बंधू राष्ट्रवादीत असताना पालिकेच्या कार्यक्रमांना राष्ट्रवादी नेत्यांना बायपास करत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडेंना बोलविले होते. तेव्हाच क्षीरसागर भाजपमध्ये जातील असे आडाखे बांधले जात होते. मात्र, क्षीरसागरांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. सहा महिन्यांसाठी जयदत्त क्षीरसागर शिवसेनेने कॅबीनेट मंत्रीपदही दिले होते. अलिकडे शिवसेनेच्या मेन स्ट्रीमध्ये क्षीरसागर फारसे दिसत नाहीत. पालिकेच्या अनेक उपक्रमांत सध्या शिवसेनेचा नामोल्लेख देखील दिसत नाही. त्यामुळे आताही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
चित्रा वाघ म्हणाल्या, क्षीरसागर फॅमिलीला आपण चांगले ओळखत असून त्यांची ताकद जाणून आहोत. राजकारणाच्या पलिकडे समाजकारण करणारे हे कुटूंब आहे. या कार्यक्रमासाठी येण्याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कल्पना दिल्यानंतर त्यांनीही कौतुक केल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले. सरकार इतर उद्योगांतच व्यस्त असून त्यांचे महिला उद्योगाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रतिकुल परिस्थितीत दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी राजकारणात ठसा उमटवित जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळविला. साखर कारखाना काढणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या होत्या. महिला बचत गटांबरोबरच महिलांचा दबावगट तयार व्हावा, असे आवाहन करत महिला भागीदारीची टक्का वाढला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.


