Home Education आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

452

मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ रोजी पोंभुरले येथे झाला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासून अतिशय हुशार होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी संस्कृत आणि मराठी विषयाचे अध्ययन पूर्ण केले. नंतर ते मुंबईला गेले. तिथे त्यांनी इंग्रजी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी विषयात देखील त्यांनी नैपुण्य मिळवले. इंग्रजीतील त्यांचे नैपुण्य पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

त्या कॉलेजमध्ये एकूण सतरा प्राध्यापक होते त्यात बाळशास्त्री हे एकमेव मराठी प्राध्यापक होते. दादाभाई नौरोजी हे त्यांचेच विद्यार्थी होते. पुढे त्यांची नेमणूक शाळा तपासणीस म्हणून झाली. बोर्ड ऑफ एज्युकेशन ने चांगले अध्यापक निर्माण करावेत अशी सूचना त्यांनी इंग्रज सरकारला केली ती सूचना सरकारने मान्य करुन डीएड बीएड कॉलेजची निर्मिती केली. ते शिक्षणाबाबतीत जितके आग्रही होते तितकेच ते समाजसुधारणे बाबत आग्रही होते. केवळ शिक्षणाचा प्रसार करून चालणार नाही तर सनातनी आणि प्रतिगामी लोकांच्या मनावर बेगडी श्रद्धांचा जो कालबाह्य पगडा आहे तो हटवला पाहिजे. लोकांच्या भावना, संवेदना विशाल- उदार झाल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते त्याकरिता त्यांनी दर्पण नावाचे पहिले वर्तमान पत्र सुरू केले. दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ ला प्रसिद्ध झाला. ते द्विभाषिक वर्तमानपत्र होते. एकाच वेळी इंग्रजी व मराठीत निघणाऱ्या त्या पत्राच्या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजीत तर उजवीकडच्या स्तंभात मराठीत भाषांतर असे त्यात एकूण आठ पाने असत.

जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्याने दर्पण साप्ताहिक ४ मे १८३२ पासून सुरू केले. जांभेकर हे निर्भीड पत्रकार होते त्यांचे लेख विचारप्रवर्तक असत. इंग्रजांच्या नोकरीत असूनही ते इंग्रज सरकार विरुद्ध बेधडक लिहायचे. त्याचप्रमाणे जातपात, कर्मकांड, अनिष्ट प्रथा यावर ते आपल्या लेखणीतून सातत्याने प्रहार करीत. ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवस आणि योगायोगाने ६ जानेवारी या दिवशीच दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला असल्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. १८ मे १८४६ रोजी त्यांचे निधन झाले. जयंतीदिनी बाळशास्त्री जांभेकरांना विनम्र अभिवादन! तसेच पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधूंना मनापासून शुभेच्छा!!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here