




✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.5जानेवारी):- ज्येष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत डॉ. सतीशकुमार पाटील यांची 30 जानेवारी 2022 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या चौथ्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक प्रा. करुणा मिणचेकर यांनी डॉ. सतीशकुमार पाटील यांना दिले.डॉ. सतीशकुमार पाटील कादंबरीकार म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. मृत्यूस्पर्श, परतायचे रस्ते केव्हाच बंद झाले!
अभिमन्यू यासह दहा हुन अधिक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. जैन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. बालसाहित्यिक म्हणूनही त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. साहित्य क्षेत्रातील मनाचे सन्मानाचे 50 हुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. डॉ. सतीशकुमार पाटील हे संवेदनशील, मानवी मनाचे, आणि ऐतिहासिक लेखन करणारे साहित्यिक म्हणून ओळखले जातात.डॉ. सतीशकुमार पाटील हे पेशाने वैद्यकीय डॉक्टर असून जयसिंगपूर येथे त्यांचे पायस हे सुप्रसिद्ध हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना ते नेहमीच सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करीत असतात.
सामाजिक क्षेत्राबरोबर आरोग्यच्या क्षेत्रामध्येही डॉ. सतीशकुमार पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. कोरोना काळामध्ये आपल्या व्यवसायाच्या पुढे जाऊन त्यांनी सामाजिक भान जपत अनेक गोरगरीब लोकांना मोफत सेवा-सुविधा पुरविल्या आहेत.वास्तववादी लेखन करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे.धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आयोजित धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. सतीशकुमार पाटील यांची निवड झाल्याबद्दल साहित्यक्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.




