Home महाराष्ट्र खळबळजनक घटना; 6 वर्षाच्या बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या

खळबळजनक घटना; 6 वर्षाच्या बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या

293

🔺धारूर तालुक्यातील घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.4जानेवारी):-जिल्ह्यात एका 6 वर्षाच्या बालकावर अज्ञात वन्यपशूने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र, सदरील प्रकार हा वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा नसून हत्येचा असल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासात समोर आली असून आता अज्ञात व्यक्ती विरोधात धारुर पोलिसांत रात्री उशिरा खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बीड जिल्ह्याच्या धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या होत्या.

ज्यानंतर नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडील दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय आहे.

सदरील प्रकाराची गावात अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला केल्याची चर्चा होती. त्यामुळे या प्रकारानंतर पोलीस प्रशासनासह वन विभागाने प्रकाराची सखोल चौकशी केली. केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळ पिंजून काढला. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारीही हजर होते. यात वन्यप्राण्याचे कसलेही ठसे अथवा खुणा आढळून आले नाहीत. बालकाचा गळा चिरला गेला असल्याने सदरील प्रकार हा खुनाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री उशिरा धारुर पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धारुर पोलीस ठाण्याचे प्रभारी नितिन पाटील सध्या रजेवर असल्यामुळे या घटनेचा तपास बीड येथील पोलीस निरिक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, सदरील बालकाची हत्या नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली आहे याचा शोध लावण्याचं मोठं आव्हान आता बीड पोलिसांसमोर असणार आहे.

या संपूर्ण घटनेनंतर यशराजच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. आपल्या बालकाची हत्या झाल्याची माहिती मिळताचं यशराजचं संपूर्ण कुटुंब हबकून गेलं आहे. अवघ्या सहा वर्षाच्या आपल्या चिमुकल्याची हत्या करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळून त्याला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी कुटुंबीय आणि सर्वच ग्रामस्थांनी केली आहे.

Previous articleपँथर केदार यांचा राजकीय बळी जातोय काय? पँथर डॉ. राजन माकणीकर
Next articleगडचिरोली: -नादुरुस्त ट्रक देतोय अपघाताला आमंत्रण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here