



✒️जालना,जिल्हा प्रतिनिधी(अतुल उनवणे)
जालना(दि.3जानेवारी):- शहरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांच्या हस्ते दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.या कार्यक्रमात महाविकास आघाडीत एकत्र असलेले जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर जोरदार टीका केली.
*खोतकरांचं नाव न घेता काय म्हणाले गोरंट्याल?*
आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले,की, ”ज्यांची ग्रामपंचायतचा सरपंच व्हायची आयपत नाही आणि ते खासदार व्हायची स्वप्न बघतात” असा टोला खोतकर यांना लगावला.
याआधीही महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमात कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांवर टीका केली होती.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम करत असलेल्या कान्ट्रॅक्टरला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांची यादी असून गडकरी यांनी यादीतील नावं जाहीर करावी. ही नावं जाहीर झाली तर आणखी एखादी टीम घरी येईल, असाही टोला त्यांनी खोतकरांना लगावला होता.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर खोतकर यांनी दानवे यांनाच या कारवाईसाठी जबाबदार धरले होते. तसेच दानवे यांनीच रस्त्याच्या कामात घोटाळे केल्याचा आरोप खोतकरांनी केला होता.
*काँग्रेसचे कट्टर नेते-कैलास गोरंट्याल*
जालन्यातील काँग्रेसचे बडे नेते आणि कट्टर काँग्रेसी अशी आमदार कैलास गोरंट्याल यांची ओळख आहे.
तीन वेळा आमदार राहिलेल्या गोरंट्याल यांना ठाकरे मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता होती.
परंतु त्यांची वर्णी लागली नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघातून शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा खुप मोठया मताधिक्याने पराभव केला होता.
जालन्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल ही नेहमीच चुरशीची लढत होत असते.


