




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 27डिसेंबर):-स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे सकाळ माध्यम समूहाच्या यंग इंस्पिरेटर नेटवर्क तर्फे आयोजित महाविद्यालयीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाद्वारे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी भूषविले होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे विचार मंचावर उपस्थित होत्या. अध्यक्ष म्हणून निवडून आलेला आदर्श अमृतकर आणि उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेला गोपाल दिघोरे विचार मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांचे आणि राजकीय पक्षांचे महत्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी नेतृत्व गुण विकसीत करून समाज आणि राष्ट्राची सेवा करावी असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी विजयी उमेदवार विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि जिल्हा आणि राज्य स्तरावरील पुढील निवडणुकांसाठी शुभेच्या दिल्या.महाविद्यालयीन यिन अध्यक्ष आदर्श अमृतकर आणि उपाध्यक्ष गोपाल दिघोरे यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे यांनी केले तर आभार रोशन रामटेके या विद्यार्थ्याने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.




