Home महाराष्ट्र तहसिल कार्यालय धरणगाव येथे ग्राहक दिन साजरा…

तहसिल कार्यालय धरणगाव येथे ग्राहक दिन साजरा…

64

🔹प्रत्येक व्यक्तीचे समाधान हीच आमच्या कार्याची पावती – नितीनकुमार देवरे

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.24डिसेंबर):– येथील तहसिल कार्यालय येथे आज २४ डिसेंबर २०२१ रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज २४ डिसेंबर म्हणजेच “राष्ट्रीय ग्राहक दिनाचे” औचित्य साधून तहसिल कार्यालय धरणगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचा तहसिल प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्राहक कल्याण फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक दिनाची पार्श्वभूमी सांगून “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. तद्नंतर अ.भा. ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटक शांताराम बडगुजर यांनी ग्राहक दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन केले.

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष आर.डी.पाटील यांनी दुकानदारांच्या समस्या मांडून ग्राहक व दुकानदार यांच्यात सुसंवाद असावा, असे सांगितले. याप्रसंगी काही नागरिकांनी ग्राहक म्हणून आलेले त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले. याप्रसंगी काही व्यक्तींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्वांना ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती करून दिली. तहसिल प्रशासनाच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून कामात विनाकारण टाळाटाळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. स्वस्त धान्य दुकानदारांनी जनतेशी सुसंवाद ठेवावा, तहसिल प्रशासनातील व्यक्तींनी जनतेच्या समस्या प्राध्यान्यक्रमाने सोडवाव्यात. शेतकरी, विद्यार्थी, महिला, आबालवृद्ध, दिव्यांग यांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठीच आपण अधिकारी झालो आहोत, असेही तहसिलदार देवरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार नितीनकुमार देवरे होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक शांताराम बडगुजर सर, तालुकाध्यक्ष विनायक महाजन, प्रसिध्दी प्रमुख बाबुलाल बडगुजर, ग्राहक कल्याण फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, शहर दक्षता समितीचे पदाधिकारी, तहसिल प्रशासनाचे कर्मचारी वृंद, गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन विनायक महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here