Home चंद्रपूर आवश्यक तिथेच बोलले पाहिजे

आवश्यक तिथेच बोलले पाहिजे

340

ज्ञानी जास्त बोलत नाही आणि अज्ञानी बोलल्याशिवाय राहत नाही . खूप बोलतो म्हणजे बुद्धिमान असतो , हा भ्रम आहे . जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो हुशार असतोच . पण दुसऱ्याच्या अनुभवातून ज्ञान मिळवीत शिकुन स्वतःला सिद्ध करतो तो सर्वात बुद्धिमान समजायला हवा . एखाद्याचे अनुभव आकलन करणे म्हणजे त्याच्या वयाईतके अधिक ज्ञान अवगत करणे . बुद्धिमान दुसऱ्याच्या ज्ञानाला समजून घेण्यासाठी जिज्ञासू असतो . स्वतः संयम बाळगतो . रोमांचक रहस्यकारी ज्ञानासाठी उतावळा असला तरी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही . जेवढे घेता येईल तेवढे घेण्यासाठी तथ्यांशिवाय कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करीत नाही . कमी बोलून जास्त विचार करण्यात त्यांना स्वारस्य असते . दुनियेहून वेगवेगळ्या कल्पना मांडत स्वतःशी बोलायला आवडते .दुसऱ्यांच्या चुका दाखविण्यापेक्षा आपल्या हातून फारच कमी चुका होतील याकडे लक्ष देऊन असतात . चुका झाल्या तरी प्रत्येक चुकामधून काहीतरी शिकवण घेतात .

प्रधानाचा मुलगा असतो . शाळेत जाताना वाटेत अडवून गंमत करायची म्हणून राजा एका हातात चांदीचे नाणे व दुसऱ्या हातात सोन्याचे नाणे ठेवून प्रधानाच्या मुलाला सोन्याचे नाणे ओळखायला सांगतो . मुलगा चांदीचे नाणे उचलतो . राजाला हसू येते . एवढ्या हुशार प्रधानाचा मुलगा आणि सोने ओळखता येत नाही . मजा घ्यायची म्हणून राजा रोज सोन्याचे नाणे ओळखायला सांगतो . मुलगा चांदीचे नाणे उचलून निघून जात असते . हा खेळ एक महिना चालतो . एक दिवस राजा प्रधानाला म्हणतो , ‘तू इतका हुशार आणि तुझ्या मुलाला साधे सोने ओळखता येत नाही . मी त्याला रोज दोन नाणे दाखवून सोन्याचे नाणे उचल म्हटले की चांदीचे नाणे उचलून निघून जातो ‘. प्रधानाला नवल वाटते . मुलगा तर हुशार आहे मग असा का वागतो ? घरी आल्यावर रागारागात मुलाला विचारतो , ‘तू राजासमोर असा का वागतोस ? माझी बदनामी होत आहे ‘. मुलगा काही न बोलता आतून चांदीचे नाणे भरलेली पिशवी घेऊन येतो .वडिलांना दाखवत म्हणतो , ‘ तुम्हाला काय वाटले , राजा मला खेळवतो . मला सोने आणि चांदी यातील फरक कळत नाही . ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलीन त्या दिवशी हा खेळ बंद होईल . मी दाखवलेल्या मुर्खपणामुळे मला रोज चांदीचे नाणे मिळत आहे ‘. बुद्धिमान व्यक्ती अज्ञान दाखवून हित शोधत असते . न बोलता फायदेशीर कृती करीत जाते .

व्यर्थ बडबड कधीच कामी येत नसते . बडबडीतून घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची वृत्ती डगमगते . पेचातुन सुटण्यासाठी कृतीचे समर्थन करावेच लागेल . शांतपणे सहज कोडी सोडवता येतात . बुद्धिमत्तेचे स्वरूप कोणत्याही एका घटकाच्या किंवा क्षमतेच्या आधारे समजू शकत नाही . वेगवेगळे आठ नैसर्गिक प्रकार एकमेकांशी जोडलेले असतात . वाचाळ बडबड करण्यापेक्षा अनुभवातून आणि संबंधातून शिकले जाते . युक्तिवादानुसार गृहीतक तयार करता आले पाहिजे . आपल्याला काय आवडत , आपला कल कशात आहे ? याचा शोध घेऊन न्यूरॉन्सच्या गतीनुसार समन्वय साधत स्वतःला अभिमुख करायला हवे . शिक्षण आणि विद्वतेने सिद्ध व्हायचे असेल तर चूप राहून जगाला सहन करण्याचा संग्राम करावा लागेल . नको तिथे डोके चालवणे बंद करून आवडीनुसार कौशल्य विकसित केले पाहिजे .इतर वादात न पडता नैसर्गिक हाक ऐकायला शिका . स्वतःच्या मनात डोकावत स्वतःशी संवाद साधणे हिताचे ठरेल . स्वतःला केंद्रित करून प्रयोग करत निष्कर्ष काढता आले पाहिजे . स्वतःवर नियंत्रण ठेवणारा बोलून खपवत नाही , कृतीत उतरतो . अशिक्षित बहिणाबाई चौधरी स्वयंप्रेरणेने काव्यातून जगाला मोठा तत्वज्ञान देऊन गेल्या .

नैसर्गिकरित्या उत्तम करता येईल ,याचा शोध घ्यावा लागेल . नको तिथे शहाणपण पाजळण्यापेक्षा ध्येय निश्चित करून साध्य करण्याची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे . म्हणजे समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वतःचे ज्ञान वापरून चिकित्सा करता येईल . माहिती जमा होत गेली की कार्यक्षमता वाढते व चैतन्य पसरत जाते . मिळवता येईल तिथून शांतपणे ज्ञान मिळवण्यात अर्थ आहे . वाचनातून लेखकाच्या अनुभवाचे ज्ञान अधिक ऊर्जा साठवत जाते .जिथे जेवढं आवश्यक आहे तिथे तेवढेच बोला . अधिक बोलल्याने कधी कधी चुकीच्या गोष्टी बाहेर पडतात . म्हणून शक्य आणि आवश्यक तेवढेच बोला . वैयक्तिक आयुष्यातील तणावाची चर्चा टाळली पाहिजे . त्याऐवजी सुप्त गुण शोधा . शक्य नाही त्याचा उल्लेख नकोच . उद्दिष्टांचा शोध घ्या . अतिशयोक्ती करण्यात अर्थ नाही . खोटं बोलण्यापेक्षा स्पष्टपणे खरे बोलता आले पाहिजे . स्वतःचा आढावा घेत जीवनात चांगले होता आले की कुणीतरी तुम्हाला शोधत येईल . मनुष्यामध्ये संयम असला की तो यशस्वी होतो .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल ,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here