



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.24डिसेंबर):-शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दिनांक 20 डिसेंबर रोजी भाजपा शिक्षक आघाडी , आमदार मेघनाताई बोर्डीकर व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मेघनाताई बोर्डीकर यांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडत लवकरात लवकर शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या संदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यामध्ये राज्यातील सर्व विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळांना प्रचलित नियमानुसारच 100 टक्के अनुदान देण्यात यावे यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये आग्रही भूमिका सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले.
यावेळी सहविचार सभेत मराठवाडा विभाग भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी हे उपस्थित होते. गेल्या पंधरा वर्षापासून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक-शिक्षकेतर बांधव अपुऱ्या निधीवर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षरत राहण्याची भूमिका आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी मांडली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या पण अंशतः अनुदानित असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करत असून 1 नोव्हेंबर 2005 नंतर
लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही भूमिका आघाडीची आहे असे प्रतिपादन मराठवाडा विभाग संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी केले.
या सहविचार सभेत विषय पत्रिकेचे वाचन परभणी जिल्हा संयोजक अरविंद वडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाळ मंत्री, महानगर जिल्हा संयोजक लखनसिंह जाधव, महानगर सहसंयोजक लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी केले. विषय पत्रिकेतील विषयानुसार “नागरिकांची सनद”चा फ्लेक्स कार्यालयासमोर लावून वेळेत सर्व फाईल्सचा निपटारा करण्याचे उपशिक्षणाधिकारी भुसारे यांनी आमदार मेघनाताई बोर्डीकर यांना सांगितले . तसेच दर दोन महिन्यांनी भाजपा शिक्षक आघाडीची सहविचार सभा घेण्याचे ठरले. यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे पदाधिकारी हनुमंत साळवे, एन एम निळे, किसन काळे , तुषार पाटील , दिनकर ठोंबरे , कृष्णा कवडी, वसंत तळेकर आदींची उपस्थिती होती. शिक्षक आघाडीच्या वतीने जिल्हा संयोजक अरविंदकुमार वडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.





