Home चंद्रपूर ‘मिशन वात्सल्य’ योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

‘मिशन वात्सल्य’ योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

68

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.23डिसेंबर):- कोव्हीड मुळे दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल / विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ वर्षा जामदार, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. जी.एल.दुधे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा अग्रणी बँकेचे स्वप्नील कुथे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले की, कोव्हीडमध्ये दोन्ही किंवा एक पालक गमाविलेल्या बालकांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत त्वरीत लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच ज्या प्रकरणामध्ये कोव्हीडमुळे मृत्यु असा उल्लेख नाही व ती कुटुंबे या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, अशा प्रकरणात आयसीएमआर कडे पाठविण्यात आलेली यादी आरोग्य विभागाकडून प्राप्त करून घ्यावी. विधवा झालेल्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात कोविड मुळे एक / दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांची (18 वर्षांखालील) एकूण संख्या 527 आहे. 13 बालकांनी दोन्ही पालक गमाविले असून यात 18 वर्षांवरील दोन बालके आहेत. तर दोन जणांना सावत्र आई आहे. नऊ बालकांच्या प्रकरणांपैकी पाच प्रकरणात शासनाकडून पाच लाखांची एफडी बँकेत काढण्यात आली आहे. तसेच उर्वरीत चार प्रकरणात प्रक्रिया सुरू आहे. पीएम केअर फंड अंतर्गत अशा बालकांना 10 लाखांची मदत करण्यात येते. दोन्ही पालक गमविलेल्या नऊही बालकांचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्यात आले आहेत. 527 पैकी 464 मुले बालसंगोपन योजनेसाठी पात्र असून सप्टेंबर अखेर पर्यंत 334 मुलांना प्रतिमाह 1100 रुपये याप्रमाणे लाभ देण्यात आला आहे. तसेच अनाथ बालकांच्या शैक्षणिक फी माफी संदर्भात 140 जणांपैकी 82 मुलांना लाभ देण्यात आला असून उर्वरीत मुलांची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी सांगितले.

 

Previous articleनागपूरात दुसरे अ.भा. पोवारी बोली साहित्य संमेलन थाटात संपन्न
Next articleआरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा ; महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here