




🔸ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती.
स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पाचवे पर्यावरण संमेलन राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली २५ व २६ डिसेंबर २०२१ या दोन दिवसांत संपन्न होत आहे.या संमेलनात सहभागी होणाऱ्या कृतिशील पर्यावरण शिक्षक आणि कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धी क्षेत्र भेट संधी उपलब्ध होणार आहे. राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधविषयक सर्व नियम पाळून संपन्न होणाऱ्या या संमेलनामध्ये मर्यादित प्रवेश असणार आहेत. मंडळाची यापूर्वीची संमेलने राळेगण-सिद्धी सह चिपळून आणि भूतानला संपन्न झालेली आहेत.
*पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन*
शनिवार २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी दहा वाजता संमेलनाध्यक्ष पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत धिवरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी ‘वुई सिटीझन्स’ चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सामाजिक वनीकरण अहमदनगरच्या विभागीय वन अधिकारी कीर्ती जमदाडे- कोकाटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणार आहेत.
*संमेलनाच्या पहिल्या दिवशी दिवसभरातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे*
उद्घाटन कार्यक्रमात पर्यावरण मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन होईल. या वेबसाईटची निर्मिती चिपळूणचे वेब डिझायनर अँड डेव्हलपर कुंदन श्येटे यांनी केलेली आहे. वेबसाईटचे संपादन मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले आहे.
दुपारच्या भोजनानंतर २.०० ते ३.०० वाजेपर्यंत वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांचे ‘पाणी व जल व्यवस्थापन’
३.०० ते ४.०० वाजेपर्यंत प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते यांचे ‘सौरऊर्जा व्यवस्थापन’, सायंकाळी ४.१५ ते ५.१५ पर्यंत स्वच्छ भारत मिशनच्या प्रभाकर तावरे यांचे ‘प्लास्टिक निर्मूलन आणि घनकचरा व्यवस्थापन’ आज ५.१५ ते ५.४५ वाजेपर्यंत पक्षीमित्र अनिल माळी यांचे ‘महाराष्ट्रातील पक्षी विविधता आणि अधिवास संवर्धन’, ५.४५ ते ७.०० वाजेपर्यंत पर्यावरण कार्यकर्त्यांचे अनुभवकथन, ७.०० ते ७.३० वाजेपर्यंत अमेरिकेतील पर्यावरण अभ्यासक संगीता तोडमल यांचे ऑनलाईन पद्धतीने ‘पर्यावरणाचे वेगळेपण’, रात्री भोजनानंतर ८.३० ते ९.३० विलास हासबे यांचा ‘हा खेळ बाहुल्यांचा’ असे कार्यक्रम होतील.
*संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे*
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी २६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी चहापानानंतर ८ ते १०.४५ वाजेपर्यंत राळेगणसिद्धी क्षेत्रभेट संपन्न होईल. ११ ते १२.३० अण्णा हजारे यांच्यासोबत संमेलन प्रतिनिधींचे विचारमंथन आणि चर्चा होईल. दुपारी १२.३० ते १.०० वाजेपर्यंत जगात कोठेही उपलब्ध नसलेल्या पारंपारिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक, संवर्धक बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे ‘देशी बियाणे बँक’ या विषयावर मार्गदर्शन असेल. दुपारच्या भोजनानंतर २.०० ते ४.०० वाजेपर्यंत संमेलनाध्यक्ष अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यादत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन संजय चोरडीया, राज देशमुख, पुण्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, अहमदनगरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी उपस्थित असतील.
*संमेलनाला येताना कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आवश्यक आहे.* मर्यादित प्रवेश असलेल्या संमेलनाला येऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे, पर्यावरण महिला सखी मंचच्या अध्यक्षा प्रियवंदा तांबोटकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी वरिष्ठ राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक ९४२२३७६४३५ येथे संपर्क साधावा.




