Home चंद्रपूर चालले की अंतर संपते

चालले की अंतर संपते

331

थांबला तो संपला. झरा वाहता असेल तर काडीकचरा साचत नाही . प्रवाह थांबून एखादा डबका बनला की, शेवाळ वाढून जंतू पडतात. रोगराईला आमंत्रण भेटते. पाण्याच्या झऱ्याप्रमाणे जीवनाचा झरा प्रवाहित हवा. वाहण्यात अंतर कापण्याचे सामर्थ्य असते. अंतर कापून ध्येयाच्या अंतिम टोकाला गवसणी घालता येते. यशाचा गाडा हाकायचा असेल तर प्रयत्नांच्या बैलाचे कासरे आवरून चालणार नाही. यशाची मजल धूर ओढण्यात आहे. चाकाचा आस फिरवावा लागेल. ठरवले आणि पोहोचलो असे कधी होत नाही. पोहचण्यासाठी चालायला सुरुवात करावी लागेल. विहिरीत पडलेली कुऱ्हाड कोणी देवदूत काढणार नाही, पाण्यात स्वतः डुबकी मारावी लागते. ‘करतो धावा, सुखी ठेवा. कधीच शक्य नाही.मनगट झिजवावेच लागेल.

रात्रीच्या वेळेला लांबचे अंतर पार करायचे म्हणून हातात कंदील दिला. छोटासा कंदील आणि लांब अंतर कसे जमणार ? चालायला तर सुरुवात झाली पाहिजे. जसे पुढे जाणार तसे पुढचे स्पष्ट दिसेल. पाऊल टाकण्याआधी घाबरण्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. अंतर मोजण्याची परंपरा. एक एक पावलाने अंतर संपते, याचा विचार मनात ठासून भरता आला पाहिजे. आवश्यक तेवढे असले तरी ध्येय गाठता येते. कुसर कामी तिथे मुसराची अपेक्षा करत बसतो . स्वप्न , ध्येय कितीही मोठे असोत , फक्त सुरुवात झाली पाहिजे . सिद्धीसाठी दूरचे दिसते , जवळचा प्रयत्न दडपला जातो . अशी गत विचारातच जीवन संपवून टाकते . काल काय झालं , उद्या काय होईल ; यात न गुरफटता आज काय करता येते , यावर लक्ष केंद्रित करून साध्य मिळवता येते . वर्षभराचे नियोजन करतो , पण आज काय करायला हवे , याची दिशा हवी . वर्षभराचे दूर आज काय होईल याचा भरवसा नसते . आज , आता जे करायचे ते केल्यानेच जीवनाची दिशा ठरत जाते .

प्रवास किती मोठा आहे , यापेक्षा चालत राहणे आपल्या हाती असते . दातओठ खाऊन चंग बांधणारे कृतीत कधी उतरतील . त्यांचा उद्या कधी येतच नाही . हातचे सोडून पळत्याच्या मागे पळणारे सपशेल आदडले आहेत . हातातले पाठीशी घेऊन मार्गक्रमणाचा प्रारंभ करणे गरजेचे . ध्येय चालत जवळ येत नसते , त्याचा पाठलाग करावा लागतो . कैरी खायची तर आंबा पिकून पडेपर्यंत वाट पाहत ताटकळणे योग्य नाही . कैरीसाठी झाडावर चढावे लागेल , दगड भिरकवण्याची तसदी घ्यावीच लागेल . निसर्ग आणि वेळ कोणासाठी थांबत नाही . वेळेच्या काट्याबरोबर भविष्याचा वेध घेताना वर्तमानाच्या प्रत्येक क्षणावर कर्तृत्व चमकले पाहिजे .

शर्यतीत अव्वल येणाऱ्याच्या यशाचे रहस्य काय असेल ? तो थांबला नाही . धावत राहिला . थांबला नाही , हेच अव्वल येण्याचे कारण . थांबतो तिथेच सारे संपते . चालत राहू तसे यश दृष्टिपथात येत जाते . अंतर यशातील आडकाठी होऊच शकत नाही . ध्येयाकडे वाटचाल करायला सुरुवात न करणे अपयश खेचून आणते . मुंगी कधी थांबत नाही . अडथळा आला तर वळसा घालून पुढे जाते . इवल्याशा मुंगीने अजून किती मोठा धडा द्यावा ? पाऊल पुढे पडले की नवनव्या वाटा गवसत जातात . त्या वाटेवर ध्येयाचे निखळ यश वाट पाहत उभे असते . काटे रूतण्याच्या भयाने पाऊल थांबले की ; काटे उचलून फेकून देता येतात , हा साधा विचारही शिवत नाही . कुत्रे भुंकतात म्हणून हत्ती चालणे सोडत नाही . चालण्याआधी पडण्याची भीती नाकर्तेपणाला खतपाणी देत असते . ‘करणी करेगा तो नर का नारायण बनेगा .’ हरीने खाटल्यावरच दिले असते , तर करणीला फारकत देणाऱ्यांची गणती करता करता दमछाक झाली असती . करणीचा श्रीगणेशा होतो तिथे यशाचा उगम होतो . पाऊल ठेचाळले तरी चालेल . त्या ठेचाळण्यातून आलेली कळ नव्या वाटेचा अवलंब करायला शिकवेल .

कुणी अडवावे कुणास भ्यावे .’ एक नितांत सुंदर गाणं आहे . मनाची अशी वेडी राधा कधी होणार . कृष्णभेटीची ओढ निद्रिस्त गोकुळाला मागे टाकत पावलांना खेचून नेतात . प्रेम आहे म्हणून वाट चालायला सुरुवात केली . ध्येयावर अचाट प्रेम ठेवलं की , पावले आपोआप चालू लागतात . विकाराचा पाऊस पडला तरी विचाराचे वाबळ मागे खेचू शकत नाही . ताकत पावलात असते , वादळात नाही . ‘जायचे पोचायचे इतके मज ठावे .’ फक्त ध्येयासाठी जायचे आहे . त्या क्षणासाठी वाट चालायची आहे . ध्येयमय होऊन गेले की , यशाचा सूर सातत्याने कानावर घुमत राहतो . भवसागराच्या लाटा पण वाट अडवू शकत नाही . कविश्रेष्ठ सुरेश भट लिहितात –
रोखण्यास वाट माझी , वादळे होती आतुर ,
डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही .
येतील वादळे , खेटेल तुफान , तरी वाट चालतो ,
अडथळ्यांना भिवून अडखळणे , पावलांना पसंत नाही .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता. मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here