



🔸सत्यशोधक विवाह परंपरेत खंड पडू देणार नाही – आबासाहेब राजेंद्र वाघ.
✒️पी. डी पाटील सर(विशेष प्रतिनिधी)
धरणगाव(दि.19डिसेंबर):– प्र.डांगरी ता.अमळनेर येथील सेवानिवृत्त प्रा.शिक्षक रावण पंडित शिसोदे (गुरुजींचा) सत्यशोधकीय विवाह लावण्याचा वारसा धरणगाव ची मंडळी अखंड चालू ठेवणार, अशी माहिती सत्यशोधक पी.डी. पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन दशकांपासून तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांनी दिलेला सत्यशोधक विवाहांचा वारसा अविरतपणे चालवणारे सत्यशोधक रावण गुरुजींची सदिच्छा भेट धरणगाव च्या मंडळींनी घेतली. प्र.डांगरी ता. अमळनेर येथे रावण गुरुजींच्या राहत्या घरी धरणगावच्या मंडळींनी सदिच्छा भेट घेऊन बऱ्याच विषयांवर सादक बाधक चर्चा झाली. यावेळी रावण गुरुजींनी सत्यशोधक विवाह परंपरा याबाबत सविस्तर माहिती दिली.
गेल्या वीस वर्षांपासून मी हे कार्य अविरतपणे करत होतो परंतु आता वय झालं असल्याने धावपळ करणं शक्य होत नाही, असेही गुरुजी म्हणाले. रावण गुरुजींचा क्रांतिकार्याचा वारसा आम्ही सर्व जोपासणार अशी ग्वाही महात्मा फुले हायस्कूल धरणगावचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सरांनी धरणगाव च्या सत्यशोधक टीम च्या वतीने दिली. या आश्वासक शब्दांनी सत्यशोधक रावण गुरुजींच्या चेहऱ्यावर समाधान उमटले.
गुरुजी म्हणाले की, “खऱ्या अर्थाने क्रांतीचे दार होईल खुले, ज्या दिवशी बहुजनांना कळतील माई आणि तात्यासाहेब फुले” रावण गुरुजींनी सत्यशोधक विवाह परंपरा समजून घेण्यासाठी लेखक कै.रामसिंग दला शिसोदे (प्र.डांगरी) व विश्वासराव भिला शिसोदे लिखित सत्यशोधक समाजाचा ‘नवा पुरोहित’ हे पुस्तक धरणगावच्या मंडळींना भेट स्वरूप दिले. याप्रसंगी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी. पाटील सर, ओबीसी मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, बामसेफ चे महासचिव आकाश बिवाल, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


