



✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)
खटाव(दि.18डिसेंबर):-मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या बैलगाडी शर्यत बंदी ला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र सह खटाव-माण तालुक्यात या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले डिजे ,फटाके,गुलाल,भंडारा, च्या उधळीत बैल, बैलगाड्या चे चालक, मालक, व शेतकरी यांनी जल्लोष केला.शेतीप्रधान देशांमध्ये पूर्वीपासून बैलाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने, शेतकऱ्यांची दैवतच असलेल्या बैलाच्या महाराष्ट्रातील खिलार जातीचे बैलगाय नामशेष होण्याच्या मार्गावर असताना महाराष्ट्रातील पारंपारिक सण, उत्सव, यात्रा,जत्रा, उरूस यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हा ग्रामीण भागासह शहरी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय होता व आहे.
प् शेतकऱ्यांसह इतर छोटे मोठे उद्योग या शर्यतीच्या निमित्ताने आपले पोट भरत असत. संघटना व न्यायालयीन कारणामुळे या शर्यतींवर बंदी घालण्यात आल्याने मागील सात वर्षात खिलार गाई व बैल या नामशेष होण्याच्या मार्गावर असताना खऱ्या अर्थाने शर्यत चालू करून त्या जातीच्या जनावरांना जीवदान दिल्याचे मत प्रगतशील शेतकरी व पुसेगाव चे माजी उपसरपंच प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.
पारंपरिक शेती मध्ये यांत्रिकीकरण आले असले तरी गाई व बैलाचे महत्त्व आजही कायम शेतीत कायम असल्याने अनेक शेतकरी आपल्या जीवापाड बैलाची संगोपन करत आहेत.
शर्यतीला सशर्त मान्यता मिळाल्याने शेतकरी अजून जोमाने खिलार बैल व गाईचे संगोपन करून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकेल असे मत प्रगतशील शेतकरी निलेश पवार विटेकर यांनी व्यक्त केले, तर शेतकरी,गाडी चालक, गाडी मालक, गाडी शौकीन यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आज बघावयास मिळाला त्यामुळे अखेर *शर्यत* जिंकली ची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहे.


